दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शेर शिवराज: ‘या’ कारणांसाठी अष्टकामधल्या सर्वच चित्रपटांच्या सेटवर शुटिंगपूर्वी म्हटली जाते शिववंदना!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राने भारवलेल्या दिक्पाल लांजेकर यांनी त्यांच्या चरित्रावर आधारित आठ चित्रपट (अष्टक) तयार करण्याचं ध्येय आता मध्यावर आलं आहे. कारण या अष्टकातला चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अष्टक तयार करण्याचं स्वप्न उराशी बाळगणं आणि ते सत्यात उतरवणं हे एक मोठं आव्हानच आहे आणि ते आव्हान दिक्पाल लांजेकरांसह अनेक कलाकार समर्थपणे पेलताना दिसत आहेत.
हे चित्रपट दिक्पाल लांजेकर आणि कलाकार करिअर म्हणून करत नाहीत. चित्रपट बनवताना अनेक आव्हाने येत असतात. काळ, काम आणि वेग यांचं गणित कसं आणि किती वेळा जमेल हे नेहमीच अशाश्वत असतं. त्यामुळे कलाकारांची निवड करतानाही या गोष्टी मान्य करणाऱ्या कलाकारांचीच निवड केली जाते.
कलाकार निवडीच्या बाबतीत बोलायचं तर, आठही चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ या दोन भूमिकांसाठीचे कलाकार (चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी) कायम राहणार, हे तर आधीपासूनच निश्चित होतं.
इतर कलाकारांची निवड करताना दिक्पाल यांची पहिली अट असते ती म्हणजे त्या कलाकाराने ‘शिवभक्त’ असायलाच हवं. तसंच याकडे एक ‘मिशन’ म्हणून बघायला हवं. या गोष्टी पाळतील, तेच पुढे टीममध्ये राहतील, हा निर्णयही त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या या मिशनमध्ये अनेक कलाकार त्यांना साथ देताना दिसतायत आणि नवनवीन उत्तोमोत्तम कलाकार या टीमशी जोडलेही जातायत.
दिक्पाल लांजेकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या भक्तीची अजून एक प्रचिती देणारी गोष्ट म्हणजे या अष्टकामधल्या चित्रपटांच्या शूटिंगच्या वेळी सेटवर म्हटल्या जाणाऱ्या शिववंदनेची. यासंदर्भात कलाकृती मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिक्पाल लांजेकर यांनी सांगितलं की,
“सेटवर शूटिंग सुरू करण्यापूर्वी आणि शूटिंग संपल्यावर आम्ही सर्वजण मिळून शिववंदना म्हणतो आणि ती सगळ्यांची पाठ आहे. कारण मी पाठ करून घेतली. ही एक शिस्त आहे जी प्रत्येकाला लागायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज आपली प्रेरणाशक्ती आहेत. ही शक्ती कायम आपल्याला संघटन शिकवते. या संघटनातूनच त्यांनी मावळे गोळा केले आणि स्वराज्य स्थापन केलं. आपल्या कामालाही ती प्रेरणा मिळत रहावी, ते संघटन, तो उत्साह, ती झोकून देऊन काम करण्याची मानसिकता तयार व्हायला व्हावी, असं मला मनापासून वाटतं.”
“सुरुवातीला मनात सतत महाराजांचं समरण रहावं, या विचारातून अगदी पहिल्या चित्रपटाच्या वेळी मी ही कल्पना सर्वांसमोर मांडली आणि सर्व कलाकार आणि सहकाऱ्यांनाही ती आवडली. आता महाराजांची मूर्ती सेटवर आली की, शिववंदना म्हटली जाते. याचा परिणाम म्हणजे सेटवर सकारात्मकता आणि शिस्त कायम राहते.”
======
हे देखील वाचा – Exclusive Interview: दिग्पाल लांजेकर सांगतायत शेर शिवराज चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे भन्नाट किस्से
======
या अष्टकाचा क्रम निश्चित करतानाही दिक्पाल लांजेकर यांना एक अनोखी संकल्पना सुचली ती म्हणजे एक चित्रपट मावळ्याच्या पराक्रमावर आधारित आणि मग दुसरा महाराजांचा पराक्रम. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे चित्रपट याच संकल्पनेच्या क्रमानुसार बनवण्यात आले आहेत. आता पुढचे चित्रपट कसे असणार याची मात्र शिवप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे.