‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मालगुडी डेज: मालिकेची आठवण म्हणून चक्क रेल्वे स्टेशन बदललं म्युझिअममध्ये!
साधारणतः ९०चं दशक हे उंबरठ्यावरचं दशक मानलं जातं. कारण यानंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीला वेग आला आणि जगात झपाट्यानं बदल होत गेले. हे बदल केवळ तांत्रिकच नव्हते, तर वैयक्तिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवरही बरीच उलथापालथ झाली.
ऐशी-नव्वदच्या दशकातील आयुष्य तसं साधं सरळ होतं. शहरीकरणाचं जाळ फारसं पसरलं नव्हतं. ‘नाईट लाईफ’ हा प्रकार तर तेव्हा अस्तित्वातच नव्हता. समाजात मध्यमवयीन साधं सरळ आयुष्य जगणाऱ्यांची संख्या जास्त होती. त्याच काळात मध्यमवर्गीयांच्या साध्या सरळ आयुष्यासारख्या हलक्या फुलक्या कथांची दर्जेदार मालिका दूरदर्शनवर सुरू झाली; ती मालिका म्हणजे, ‘मालगुडी डेज (Malgudi Days)’.
‘मालगुडी डेज’ ही मालिका सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या १९४३ साली प्रसिद्ध झालेल्या ‘मालगुडी डेज’ नावाच्या लघुकथा संग्रहावर आधारित होती. या मालिकेचे दिग्दर्शन कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी केलं होत, तर निर्माते होते टी.एस. नरसिंहन. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि आर के नारायण यांचे धाकटे भाऊ आर.के. लक्ष्मण यांनी या मालिकेसाठी व्यंगचित्र काढून दिली होती. कन्नड अभिनेते गिरीश कर्नाड यांनीही या मालिकेमध्ये काम केलं होतं.
या मालिकेत दक्षिण भारतातील ‘मालगुडी’ नावाचं एक काल्पनिक शहर दाखवण्यात आलं होतं. हे नाव मल्लेश्वरम आणि बसवनगुडी या दोन शहरांच्या नावांवरुन घेण्यात आलं होतं. या छोट्याशा काल्पनिक शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं आयुष्यही अगदी सामान्य होतं.
कोणताही बडेजाव नाही. मोठमोठे बंगले नाहीत की, दागदागिने घालून महागड्या साड्या नेसून मुळूमुळू रडणाऱ्या नायिका नाहीत आणि विचित्र मेकअप केलेल्या खलनायिकाही नाहीत. मुळात नायक, नायिका, खलनायिका, प्रेम या सर्व गोष्टींच्या पलीकडे असणाऱ्या त्यावेळच्या वास्तववादी आयुष्याचं चित्रण यामध्ये करण्यात आलं होतं.
‘मालगुडी डेज’मधल्या (पहिला सिझन) बहुतांश कथा स्वामी नावाचा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरतात. दक्षिण भारतामधलं साधं सरळ मध्यमवर्गीय आयुष्य बघताना अगदी संपूर्ण भारतातील व्यक्तींना आपल्याशा वाटाव्यात अशा सहज सामान्य आयुष्यातल्या कथांनी त्यावेळी रसिकांच्या मनात घर केलं.
स्वामीचं कुटुंब, त्याचं त्याच्या आजीशी असलेलं घट्ट नातं, ख्रिश्चन शाळेतल्या शिक्षकांची हिंदूं धर्माबद्दलची मते, शालेय जीवनातली मैत्री, शाळेतली चिडवाचिडवी आणि लुटुपुटुची भांडणं, स्वामींच्या वडिलांचा अभ्यासासाठीचा आग्रह या सर्व गोष्टी काही प्रमाणात थोड्याफार फरकाने आजच्या काळातील सर्वसामान्य कुटुंबातही लागू पडतात. आणि आजही ही मालिका बघताना त्यातल्या काही कथा थोड्याफार फरकाने अगदी आपल्या आजूबाजूला घडतात असं वाटतं.
क्रिकेट टीम, मिठाईवाल्याची गोष्ट, या गोष्टी तर काही प्रमाणात आजच्या काळातही लागू पडतील. पुढच्या सीझनमधली कंजूस माणसाची गोष्ट तर, आजही अनेकांची आवडती कथा आहे.
या मालिकेतील रेल्वे स्टेशन अनेकांना आठवत असेल. स्टेशनवर छोटेसे पण मनाला चटका लावणारे अनेक भावनिक प्रसंग घडताना दाखवले आहेत. ही सर्व दृश्य कर्नाटकमधील ‘अरसालू’ रेल्वे स्थानकावर चित्रित करण्यात आली होती. मालिकेचं चित्रीकरण चालू असताना अरसालू रेल्वे स्थानकावरून दोनच गाड्या जात असत.
‘मालगुडी डेज (Malgudi Days)’ ही मालिका इतकी लोकप्रिय झाली होती की, ‘अरसालू’ रेल्वे स्थानकावर झालेल्या चित्रीकरणाची आठवण म्हणून या रेल्वे स्थानकाला ‘मालगुडी’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी मालिकाप्रेमींकडून करण्यात आली. या मागणीचा मान ठेवून, भारतीय रेल्वेने ‘अरसालू’ रेल्वे स्थानकावर मालगुडी नावाचे म्युझिअम बांधून स्टेशन दुसऱ्या जागेवर स्थलांतरित केलं.
Come and take a walk down the memory lane!
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 8, 2020
Railways has developed Arasalu Station in Karnataka as ‘Malgudi Museum’, showcasing the fictional town from the iconic show, ‘Malgudi Days’. pic.twitter.com/Jk5BJupxph
२०११ साली रेल्वे मंत्रालयाने यशवंतपूर – म्हैसूर एक्सप्रेसचे नाव बदलून मालगुडी एक्सप्रेस करण्यात आलं. यामधून एकप्रकारे भारतीय रेल्वेमार्फत मालगुडी डेजच्या दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहण्यात आली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
फायनान्शिअल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मूळ वास्तुकला न बदलता जुने अरसालू रेल्वे स्थानक मालगुडी संग्रहालय म्हणून विकसित करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला. याशिवाय नवीन स्थानकाच्या विकासासाठी विभागाने एक कोटी रुपये खर्च केले आहेत.
सध्याच्या जमान्यात वेबसिरीजचे सीझन सुरू झाले आहेत. परंतु १९८६ पासून २००६ पर्यंत दूरदर्शनने ‘मालगुडी डेज’ या मालिकेचं एकूण ४ सीझन प्रसारित केले होते. पहिल्या भागातले १३ भाग इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रसारित करण्यात आले होते. ‘मालगुडी डेज’चे सर्व सीझन्स युट्यूबवर उपलब्ध आहेत.
=====
हे देखील वाचा – कोर्ट रूम ड्रामावर आधारित ‘हे’ ८ चित्रपट आवर्जून पाहायलाच हवेत
=====
नव्याने ‘मालगुडी डेज’ बघताना कळत-नकळत आपण आपल्या शालेय दिवसात जातो. मोबाईल, टीव्ही शिवाय असणारं साधं सोपं आयुष्य, शाळेतल्या मित्रांची धमाल, ती भांडणं, सारं काही डोळ्यासमोर येतं. हे अगदी काल परवाच घडलंय असं वाटत राहतं.
अखेर, “काय दिवस होते ते…” असं म्हणत नाईलाजानेच आपण भूतकाळातून वर्तमानात येतो आणि नकळत हातात मोबाईल घेऊन शाळेतल्या खास मित्राला फोन करतो. हेच आहे या मालिकेचं यश! ३५ वर्ष होऊन गेल्यावरही तितकीच वास्तववादी आणि लोकप्रिय असणारी ही मालिका म्हणजे दूरदर्शनच्या मालिकाविश्वामधलं एक अनमोल रत्न आहे.