Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग चुकीचंच!
सोशल मीडिया आणि कलाकारांचे ट्रोलिंग हा विषय काही नवीन नाही. सध्या कोणत्याही गोष्टीवरुन कलाकारांना आणि चित्रपटांनाही ट्रोल केलं जातं. काही दिवसांपूर्वीच ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सोशल मीडियावर विवादित मुद्दा होता. या मुद्द्यावरुन दोन विरुद्ध गट निर्माण झाले होते.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या आधीही सोशल मीडियावर दोन चित्रपटांवरुन वाद चालू होते. ते चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’ आणि ‘झुंड’. या दोन चित्रपटांमध्ये विवादित असं काहीच नव्हतं. परंतु, तरीही यावरुन वाद होऊन अकारण दोन गट निर्माण झाले. यासंदर्भात चित्रपटातील कलाकारांसह त्यांच्या दिग्दर्शकांनीही नाराजी व्यक्त केली. मुळात एकमेकांपासून अत्यंत वेगळ्या असणाऱ्या दोन चित्रपटांमध्ये तुलना आणि त्यावरून होणारं ‘गटीकरण’ ही गोष्ट कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला न पटणारीच आहे.

या सर्व प्रकाराबद्दल आणि एकूणच ट्रोलिंगच्या मुद्द्यावरून मत व्यक्त करताना ‘पावनखिंड’ आणि आता प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी कलाकृती मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं.
“मुळात ट्रोलिंग हा प्रकारच चुकीचा आहे. सोशल मीडियाच्या रुपाने लोकांना खूप चांगलं माध्यम आणि मंच मिळाला आहे. त्यामुळे त्यावर मत व्यक्त करणं ठीक आहे. पण बरेचदा त्याचा दुरुपयोग होताना दिसतो. कुठलाही चित्रपट असो, त्यासाठी कलाकारांनी खूप कष्ट घेतलेले असतात. त्या कष्टाचा आदर राखला गेला पाहिजे, असं मला वाटतं. आता हे सर्वांनाच माहिती आहे की, मी काय किंवा नागराज मंजुळे काय, आम्ही मेहनत करून इथवर आलोय.”

“चित्रपटामध्ये त्रुटी असतील, चुका असतील, तर त्या समजून घ्या असंही म्हणणं नाही. त्याबद्दल अवश्य बोला. पण हे सर्व योग्य रितीने मांडलं गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे दोन संपूर्णपणे विभिन्न कलाकृतींची म्हणजेच ज्या कलाकृतींचा गाभा, सादरीकरण सारंच एकमेकांपासून संपूर्णपणे वेगळं होतं. त्या कलाकृतींची जी काही सरमिसळ झाली ती अजिबात योग्य नव्हती. अकारण या प्रकाराला वेगळा रंग देण्यात आला, असं मला वाटतंय.”
“त्या दरम्यान मी नागराज मंजुळे यांच्या काही मुलाखती बघितल्या, तर त्यांनीही हेच सांगितलं की, दोन्ही चित्रपट बघा आणि मग त्याबद्दल तुमचं मत ठरवा, पण दोन चित्रपटांमध्ये अकारण तुलना व्हायला नको. दोन्ही चित्रपट बघून तुलनात्मकदृष्ट्या मत ठरवून ते योग्य पद्धतीने मांडायला हरकत नाही.”
=====
हे देखील वाचा – Exclusive Interview: दिग्पाल लांजेकर सांगतायत शेर शिवराज चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे भन्नाट किस्से
=====
“या दोन्ही चित्रपटाबाबत सोशल मिडीयावर जे मत मांडलं गेलं की, हे अमुकच वर्गाचं आहे किंवा अमुकच गटाचं आहे, तसं न करता सर्वांकुश पद्धतीने विचार करून मत मांडायला हवं. मुळात प्रेक्षकांनी कलाकृतीबद्दल आवर्जून बोलावं पण अकारण चित्रपटाला कोणत्याही गटामध्ये बसवू नये. कारण प्रेक्षक हा अंतिम निर्णयकर्ता असतो. त्यामुळे प्रेक्षकांचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खरंतर प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहायला हवेत. जेणेकरून त्या इंडस्ट्रीला मदत होईल.”
एकंदरीतच सोशल मीडियावर चित्रपटांसंदर्भात रंगणाऱ्या चर्चा, ट्रोलिंग, होणाऱ्या तुलना, गटीकरण, या गोष्टी कलाकारांप्रमाणे दिग्दर्शकांनाही खटकत आहेत. अर्थात सोशल मीडियावर रंगणाऱ्या या चर्चा, वाद का आणि कसे सुरू होतात? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तरीही आपण या वादाचा भाग बनत नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे.