बॉलिवूडमध्ये रिमेक झालेले टॉप १० मराठी चित्रपट
बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे ‘रिमेक’ बनतात ही गोष्ट काही नवीन नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, कित्येक मराठी चित्रपटांचेही बॉलिवूडमध्ये रिमेक बनले आहेत. आज आपण बॉलिवूडमध्ये रिमेक होऊन प्रदर्शित झालेल्या अशाच टॉप ५ मराठी चित्रपटांबद्दल माहिती घेणार आहोत. (Marathi movies remade in Bollywood)
१. अंतिम: द फायनल ट्रुथ (२०२१)
महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्स निर्मित हा चित्रपट ॲक्शन थ्रिलर असून, यामध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न‘ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे समीक्षकांकडून कौतुक झालंच शिवाय २०२१ सालात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा तिसरा हिट चित्रपट ठरला.
२. छोरी (२०२१)
हा चित्रपट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. विशाल फुरिया दिग्दर्शित हा एक हॉरर चित्रपट असून २०१७ सालच्या ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्यासोबत नुश्रत भरुच्चा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे समीक्षकांकडून भरपूर कौतुक झाले होते. (Marathi movies remade in Bollywood)
३. धडक (२०१८)
२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘धडक’ हा चित्रपट मराठीमधील सुपरहिट ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. शशांक खेतान लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत इशान खट्टर, आशुतोष राणा, अंकित बिश्त, श्रीधर वत्सर, क्षितिज कुमार आणि ऐश्वर्या नारकर प्रमुख भूमिकेत आहेत. सैराटच्या तुलनेत या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही.
४. दम लगा के हैशा (२०१५)
आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट आठवतोय का? ‘रोमँटिक कॉमेडी’ असा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर यशस्वी ठरलाच शिवाय समीक्षकांनीही याचं खूप कौतुक केलं.
या चित्रपटामुळे भूमी पेडणेकरसाख्या गुणी अभिनेत्रीला बॉलीवूडचे दरवाजे मोकळे झाले. पुढे जाऊन भूमीने आपलं वजन कमी केलं आणि त्याच्याही चर्चा झाल्या. या चित्रपटाला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. पण फार कमी जणांना माहिती आहे की, ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट ‘अगडबंब’ या मराठी चित्रपटावरून घेण्यात आला होता. (Marathi movies remade in Bollywood)
५. मुंबई दिल्ली मुंबई (२०१४)
मराठीमधील काही उत्तम प्रयोगांपैकी एक म्हणजे २०११ साली आलेला सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. यानंतर २०१४ साली या चित्रपटाचा रिमेक ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये शिव पंडित आणि पिया बाजपायमाडे मुख्य भूमिकेमध्ये होते. दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही.
६. गोलमाल रिटर्न्स (२००८)
रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’च्या सिक्वल मधला ‘गोलमाल रिटर्न्स’ हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर-खान, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट १९८९ साली आलेल्या ‘फेका फेकी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. (Marathi movies remade in Bollywood)
७. जिस देश में गंगा रहता है (२०००)
महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि गोविंदा, सोनाली बेंद्रे अभिनित ‘जिस देश में गंगा रहता है’ हा २००० साली आलेला कॉमेडी चित्रपट १९७२ साली आलेल्या ‘एकटा जीव सदाशिव’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर माफक यशस्वी ठरला.
८. मासूम (१९९६)
“छोटा बच्चा जान के हम को ना आँख दिखाना रे…” हे गाणं आठवतंय का? दिग्दर्शक महेश कोठारे यांचा हिंदी चित्रपट हा त्यांच्याच १९९४ साली आलेल्या ‘माझा छकुला’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. त्या काळात बॉक्स ऑफिसवर ५ कोटी रुपयांची कमाई करत हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत विराजमान झाला होता.
९. हनिमून (१९९२)
ऋषी कपूर, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, कादर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हनिमून’ हा चित्रपट १९८८ सालच्या ‘किस बाई किस’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ॲव्हरेज हिट ठरला होता.
१०. मेरा साया (१९६६)
राज खोसला दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट ‘मेरा साया’ हा ‘पाठलाग’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये सुनील दत्त आणि साधना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला होता. (Marathi movies remade in Bollywood)
=====
हे देखील वाचा –मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यावर आधारित टॉप ५ बायोपिक
=====
तसं पाहायला गेलं तर ‘पेइंग गेस्ट’ (अशी ही बनवाबनवी), ‘हे बेबी’ (बाळाचे बाप ब्रह्मचारी), ‘टारझन द वंडर कार’ (एक गाडी बाकी अनाडी), ‘क्यों कि मै झूठ नही बोलता’ (धागडधिंगा) हे चित्रपट देखील वरच्या यादीत घेता आले असते. परंतु, हे सर्व मराठी चित्रपट मूळ इंग्रजी चित्रपटांवरून प्रेरित असल्यामुळे त्यांचे नाव यामध्ये समाविष्ट केलेलं नाही.