दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अफझलखान वध: केवळ युद्ध नव्हे, तर एक सायकॉलॉजिकल वॉर
शेर शिवराज! केवळ युद्ध नाही तर युद्धासाठी आवश्यक असणारी मानसिकता! अफझल खान वधाची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण हा वध सहज शक्य नव्हता. या वधामागे महाराजांचा खूप मोठा अभ्यास होता. हा अभ्यास अफझलखान भेटीच्या निश्चितीपासूनच सुरु करण्यात आला होता. हा अभ्यास कसा केला, कोणत्या प्रकारे केला हे सर्वकाही तपशीलवार दाखवण्यात आलं आहे, शेर शिवराज या चित्रपटामध्ये! (sher shivraj movie review)
दिग्पाल लांजेकर यांच्या अष्टकामधला चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ सुरु होतो एका गाण्यापासून ज्यामध्ये महाराजांच्या सर्व शिलेदारांची ओळख करून देण्यात आली आहे. हे गाणं पाहणं हा नितांतसुंदर अनुभव आहे. या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बहिर्जी नाईक यांची महत्वपूर्ण भूमिका दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ठळकपणे जाणवतेय. (sher shivraj movie review)
चित्रपटामध्ये अफझलखान वधाची कथा ज्या पद्धतीने दाखविण्यात आली आहे त्याला तोड नाही. त्यावेळी या वधाचं प्लॅनिंग करताना महाराजांनी किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला होता हे पाहून थक्क व्हायला होतं. “आईच्या वात्सल्यापेक्षा स्वराज्य महत्वाचं!” जिजाऊंच्या तोंडचे हे उद्गार पाहून त्या माऊलीबद्दल मनामध्ये असणारा आदर अधिकच दुणावतो.
कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर मृणाल कुलकर्णी (जिजाऊ) नेहमीप्रमाणे उत्तम. समीर धर्माधिकारी (कान्होजीराव जेधे), मृण्मयी देशपांडे (केसर), इशा केसकर (मातोश्री सईबाई) या सर्वांच्या भूमिकाही चांगल्या जमून आल्या आहेत. चिन्मय मांडलेकर नेहमीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे आणि त्याचं काम त्याने चोख केलं आहे. परंतु, यावेळी मात्र मुकेश ऋषीने साकारलेल्या अफझलखान त्याच्यासमोर जास्त भाव खाऊन गेला आहे. मुकेश ऋषीचा अभिनय, डोळ्यातले भाव आणि शब्दांवरची पकड एवढी जबरदस्त आहे की, क्षणभर समोर खरोखरच अफझलखान उभा आहे, असं वाटत राहतं. (sher shivraj movie review)
चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे. पण त्यानंतर मात्र चित्रपट चांगली पकड घेतो. चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे पार्श्वसंगीत. शेवटच्या २० मिनिटांमध्ये तर या पार्श्वसंगीताची कमाल केली आहे. यामध्ये अफझलखान वधाचा प्रसंग बघताना अंगावर रोमांच उभे राहतात.
=====
हे देखील वाचा – Exclusive Interview: दिग्पाल लांजेकर सांगतायत शेर शिवराज चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे भन्नाट किस्से
=====
या प्रसंगादरम्यान चिन्मय मांडलेकर आणि मुकेश ऋषी यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. दोघांच्या डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेक आणि यावर कडी म्हणजे त्याला साजेसं पार्श्वसंगीत; हा प्रसंग कमाल जमून आला आहे. (sher shivraj movie review)
या चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे अफझलखान वधासाठी छत्रपतींनी लढलेलं ‘सायकॉलॉजिकल वॉर’ आजवर कधीही विचारात घेतलं गेलं नव्हतं. शेर शिवराजच्या निमित्ताने ही महत्वाची गोष्ट अधोरेखित करण्यात आली. एकुणातच चित्रपट उत्तम जमून आला आहे. या निमित्ताने महाराजांचा गनिमी कावा म्हणजे नक्की काय, हे आपल्या ठळकपणे लक्षात येईल.
चित्रपट: शेर शिवराज
दिग्दर्शक: दिग्पाल लांजेकर
कलाकार: चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी, दिग्पाल लांजेकर, मुकेश ऋषी, विक्रम गायकवाड, दिप्ती केतकर, अजय पुरकर, वैभव मांगले इ.
निर्माता: नितीन केणी, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे
छायांकन – रेशमी सरकार
संकलन – विनोद राजे
स्टार रेटिंग: चार स्टार
– भूषण पत्की