दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
कित्येक गुणांचं ‘पॅकेज’ असलेली संवेदनशील अभिनेत्री: ऋचा इनामदार
एखाद्या व्यक्तीमध्ये कला किती ठासून भरलेल्या असाव्यात? ऋचा इनामदार (Rucha Inamdar) या गुणी कलावंताकडे पाहिलं की, थक्क व्हायला होतं. ती डेंटिस्ट आहे, चित्रकार आहे, छायाचित्रकार आहे, शास्त्रीय नृत्यांगना आहे, चांगली लेखकही आहे अन् यांसोबतच ती उत्तम जाण असलेली संवेदनशील अभिनेत्री आहे.
हॉटस्टारवरच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमधून तिची प्रेक्षकांना प्रकर्षानं ओळख झाली. अलीकडेच प्रदर्शित ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ या वेबसीरिजमध्येही तिनं कमाल केलीय. मुळात चिकित्सक आणि अभ्यासू असलेल्या ऋचानं प्रवासातले प्रत्येक टप्पे जिंकलेले आहेत.
ऋचाला पडद्यावर पाहिलं की, ती कुणालाही आपल्यातीलच वाटावी. वैयक्तिक आयुष्यातही ती कमालीची नम्र आहे. घरातून मिळालेली शिकवण, संस्कार इथं ठळकपणे दिसतात. ऋचाला तुम्ही कित्येक जाहिरातींमधून पाहिलं असेल. मात्र, ‘क्रिमिनल जस्टिस’मधून ती रसिकांच्या अधिक परिचयाची झाली. अभिनयक्षेत्रात तिनं मिळविलेल्या यशामागे तिची मेहनतही तेवढीच मोठी आहे. दिल को जीत ले, असं हे व्यक्तिमत्त्व आहे.
ऋचाचं कुटुंब मुळातच उच्चशिक्षित अन् कलावंत असलेलं. आजोबा श्री. दि. इनामदार प्रसिद्ध कवी होते. ‘मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर’, अशी त्यांची ख्याती होती. वडील डॉ. रवींद्र इनामदार कवी, चित्रकार, आई डॉ. ऋता इनामदार या चित्रकार, तर इंजिनिअर असलेला भाऊ राहुल हाही चित्रकार. कालांतरानं त्यानं नोकरी सोडली अन् चित्रकलेलाच सर्वस्व मानलं. आज त्याच्या चित्रांचं प्रदर्शन देशविदेशांत भरतं. अशा कलेच्या वातावरणात ऋचा वाढली. त्यामुळे कलांचे संस्कार तिच्यात झिरपणं स्वाभाविकच होतं. (Rucha Inamdar)
तीन वर्षांची असतानापासूनच ऋचा स्टेजवर वावरायला लागली. स्टेजवर असली की तिचा आत्मविश्वास वेगळाच असायचा. तिथं ती अधिक खुलायची. आता कॅमेऱ्यासमोर ती बहरते. अभ्यासातही ती कमालीची हुशार. तिनं बीडीएसला प्रवेश घेतला, डेंटिस्ट झाली. मात्र, अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती.
रंगमंचावर वावरणं सुरू झालं. या क्षेत्रात येण्याची महत्त्वाकांक्षा तिनं आधीच आई-बाबांकडे जाहीर करून टाकली होती. बाबांना काळजी होती. शिवाय, या क्षेत्राविषयी ते बरंच काही बरंवाईट ऐकून होते. “छंद म्हणून त्या क्षेत्रात जा. मात्र, उपजीविकेसाठी आपली नोकरीच बरी”, असं त्यांनी सांगून पाहिलं. मात्र, ऋचा ठाम होती. अशावेळी आईनं पाठिंबा दिला.
या दरम्यान ऋचानं एक फिल्म वर्कशॉप केला. थिएटर आणि स्क्रीनमध्ये खूप फरक असतो, हे तिथं कळलं. फिल्ममेकिंग, डायरेक्शन या बाबींची तोंडओळख झाली. मूळची मुंबईची असली तरी फिल्म इंडस्ट्री कुठे, कशी असते, याची तिला कल्पना नव्हती. कुठून सुरुवात करावी, हेही माहिती नव्हतं. अशावेळी प्रवासात चांगली माणसं भेटली अन् बरंच काही सुकर झालं, असं ऋचा सांगते. (Rucha Inamdar)
सतीश राजवाडे तेव्हा एक चित्रपट करीत होते. त्यांनी ऋचाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी दिली. ऋचानं यातून चित्रपटाचं तंत्र शिकावं, हा त्यामागचा उद्देश. यादरम्यान ऋचा स्वत:ला शोधत होती. यादरम्यान अभिनेते आनंद अभ्यंकर तसेच आशुतोष कुलकर्णी यांनी तिला ॲक्टर्स कोऑर्डिनेटर्सचे नंबर दिले. “स्वत:चे फोटोशूट करून आधीच्या कामांचा अनुभव मेल कर”, असा सल्ला तिला देण्यात आला.
सगळं काही नवीन होतं. नव्या जगाचा शोध सुरू होता. मग सुरू झाल्या ऑडिशन्स. रोज ऑडिशन्ससाठी किमान दोन हजार कलाकार येत असतात. त्यात आपला टिकाव कसा लागणार, ही धाकधूक तिला होतीच. मात्र, शाळकरी वयापासून फक्त जिंकणंच माहिती असलेल्या ऋचानं इथंही बाजी मारली. चौथ्या ऑडिशनलाच तिची निवड झाली. (Rucha Inamdar)
पहिलीच जाहिरात शूजित सरकार या दिग्गज दिग्दर्शकाची होती. सुरुवात दमदार झाली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अनुराग कश्यप, आमिर खान, जॉन अब्राहम, प्रदीप सरकार, गौरी शिंदे, विनिल मॅथ्यू, राम माधवानी, प्रसून पांडेय आदींसोबत जाहिरातींमधून काम करण्याची संधी मिळाली. हे सर्व सुरू असताना सिनेमांसाठी ऑडिशन देणंही सुरू होतं.
या दरम्यान तिला ‘अंडर द सेम सन’ हा तिचा पहिला चित्रपट मिळाला. स्फोट घडवू पाहणाऱ्या अतिरेक्याचं मन बदलणाऱ्या मुलीची भूमिका तिनं यात साकारली. अद्याप अप्रदर्शित या चित्रपटानं विविध महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. त्यानंतर ‘चिल्ड्रेन ऑफ वॉर’, ‘नॉट टूडे’, ‘ऑपरेशन परिंदे’, मराठीतील ‘भिकारी’, ‘वेडिंगचा शिनेमा’, असा चित्रपटांचा सिलसिला सुरू झाला. यातील ‘नॉट टूडे’ ही बेस्ट एशियन फिल्म ठरली. या चित्रपटानं कॅनडात ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’ मिळवून दिला. ‘मोह दिया तंदा’ या पंजाबी शॉर्टफिल्ममधील भूमिकेसाठी तिला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला आहे.
‘भिकारी’नंतर ‘क्रिमिनल जस्टिस’साठी ऑडिशन दिलं. त्यातील विक्रांत मेस्सीच्या बहिणीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या ती पसंतीस उतरली. मात्र, विक्रांतपेक्षा ती एक वर्षानं लहान. त्याच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत ती फिट बसेल की नाही, यावर शंका उपस्थित झाली. मात्र, ऋचा ठाम होती. शूटिंगसाठी चार महिने शिल्लक होते. तिनं आग्रहानं तेवढा वेळ मागितला. या कालावधीत तिनं वजन वाढविलं, देहबोलीतही फरक आणला अन् ती सीरिजमध्ये विक्रांतची मोठी बहीण म्हणून दिसली.
नाटकं, जाहिराती, चित्रपट अन् आता वेबसीरिज असे तिचे हे यशस्वी टप्पे. या चारही माध्यमांत काय फरक वाटतो, असे विचारताच ती सांगते, “चारही माध्यमं आपापल्या जागी उत्तम आहेत. नाटक लाइव्ह सादर करावे लागते. जाहिरातींत कमी वेळात, काहीच सेकंदांत बरंच काही सांगून जायचं असतं. सिनेमात लागणारा कस वेगळा आहे, तर वेबसीरिजमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही अधिक प्रभावीपणे करू शकता, पात्र अधिक खुलवू शकता. कारण, सीरिजचा आकार मोठा असतो. ‘क्रिमिनल जस्टिस’च्यावेळी मला देश-विदेशांतून मेसेज आले, माझ्या कामाचं कौतुक झालं. कारण, हा कॅन्व्हॉस मोठा आहे.
‘क्रिमिनल जस्टिस’नंतर आणखी काही कामं सुरूच होती. त्याच्या दोन-अडीच वर्षांनंतर तिग्मांशू धुलिया यांचा फोन आला. त्यांनी ‘द ग्रेट इंडियन मर्डर’साठी बोलवलं. ‘तू खूप छान काम करतेस’, अशी पावतीही दिली. एका कलावंताला अशी दाद मिळाल्यावर आणखी काय हवं?”
“सिनेमा तुमच्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडतो”, असं ऋचाचं म्हणणं आहे. हृषिकेश मुखर्जी यांचे हलकेफुलके, संदेश देणारे चित्रपट तिला खूप आवडतात. ‘आनंद’ तर ऑल टाइम फेव्हरेट. ‘रोजा’ तिनं पन्नास एकक वेळा पाहिला असेल. तो पाहात असतानाच अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न फुललं होतं. याशिवाय, मूडनुसार कित्येक कमर्शियल चित्रपटही तिला आवडतात.
‘पेज थ्री’ पाहिल्यानंतर तर दोन दिवस कुणाशी बोललेच नाही, अशी आठवणही तिनं सांगितली. “कारकिर्दीत चांगल्या दिग्दर्शकांसोबत कामं करण्याची संधी मिळाली. भविष्यात झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची तिची इच्छा आहे. पात्राकडे बघण्याची त्यांची पद्धत उत्तम आहे, भविष्यात ‘इन ॲण्ड ॲज’ भूमिका साकारायची आहे, जिथं ऋचा आणखी सिद्ध होईल’, असं असं ऋचा सांगते.” सध्या तिच्याकडे काही वेबसीरिज आणि चित्रपट आहेत. जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्यांचे शूट सुरू होईल. त्यात एक कन्नड वेबसीरिजही आहे. एका अभिनेत्रीचा उदय आणि अस्त त्यातून दिसणार आहे. (Rucha Inamdar)
गरज नसताना ‘नको ते’ नकोच…
हल्ली वेबसीरिज किंवा वेबफिल्म्समधून शिव्या, हिंसक दृश्ये, अश्लीलता यांचा भडीमार दिसतो. हे खरंच योग्य आहे का, असं विचारल्यानंतर ऋचा म्हणते, “प्रेक्षकसंख्या वाढविण्यासाठी हे केलं जात असावं. जिथं गरज नाही, तिथंही असा कंटेंट टाकला जातो, असं बरेचदा दिसतं. मात्र, प्रेक्षकांनाच हे आवडत असेल, त्यातून प्रेक्षकसंख्या वाढत असेल, तर दिग्दर्शक तेच करणार. गरज नसताना असे कंटेंट नकोतच. मात्र, प्रेक्षकांचीही काही जबाबदारी आहेच.”
इथं स्पर्धा जरुर, पण कठीण काही नाही…
या क्षेत्राविषयी विचारलं असता ऋचा सांगते, “इतकं घाबरण्यासारखी ही जागा निश्चितच नाही. आपण आपल्या तत्त्वांशी ठाम असलं, तर सगळं ठीक होतं. इथं स्पर्धा जरुर आहे. मात्र, कठोर मेहनतीची तयारी असली, तर कठीण काहीच नाही. स्वत:ला सिद्ध मात्र करावे लागेल.”
या क्षेत्रानं तुला काय दिलं, यावर ती म्हणाली, “या माध्यमातून वेगळं जग बघायला मिळतं. यातून ऋचा अधिकच समृद्ध होत जाते. पुढंही माझं आयुष्य मला रंगीबेरंगी वाटावं, माझ्या वयानुसार भूमिका मिळाव्यात, ही महत्त्वाकांक्षा आहे. माझ्या दादाची छोटी मुलगी माझी फिल्म पाहू शकेल, असं फिलगुड काहीतरी करायचं आहे, हीसुद्धा तिची एक हळवी इच्छा.”
फोटोग्राफी अन् भटकंती
भटकंती बऱ्याच जणांना आवडते. मात्र, ऋचाचं वेगळंच आहे. ती वेगळी वाट चोखाळते. देश-विदेशात फिरायला गेल्यानंतर ती तेथील छोट्या छोट्या भागांत जाते. तेथील संस्कृती, वातावरण, लोक यांचा अभ्यास करते. सोबतीला कॅमेरा असतो. चांगली दृश्ये ती तिच्या कॅमेऱ्यात कैद करते. तिची फोटोग्राफी बोलकी आहे.
=========
हे देखील वाचा – मेहनत, गुणांचे ‘तेज’ ल्यायलेली तेजश्री: दाक्षिणात्य चित्रपटांमधला मराठमोळा चेहरा
=========
इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोग्राफीचे वेगळे पेज आहे. “नुसती भटकंतीच नाही, तर त्यातून काही शिकताही आलं पाहिजे”, असं तिचं मत आहे. अशा अभ्यासू, गुणी कलावंताचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे. विशेष म्हणजे, आई, बाबा, दादा यूनिव्हर्सिटी टॉपर, तर ऋचा बीडीएसमध्ये क्लास टॉपर. तिची पुढची कारकीर्दही ‘टॉप’च असेल, यात शंका नसावी.