दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
द ओमेन (The Omen): कहानी पुरी फिल्मी नही… शापित है!
कहानी पुरी फिल्मी है या सदरामध्ये आपण आत्तापर्यंत बॉलिवूडच्या हलक्या फुलक्या रोमँटिक चित्रपटांच्या मेकिंग दरम्यानच्या रंजक किस्स्यांची माहिती घेतली. पण आजच्या लेखात आपण जगातील सर्वात अशुभ समजल्या जाणाऱ्या ‘द ओमेन (The Omen)’ या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान घडलेल्या भन्नाट नाही, तर भयानक, भीतीदायक, भयाण, भयप्रद….. अशा घटनांची माहिती घेणार आहोत.
१९७६ साली प्रदर्शित झालेला ‘द ओमेन (The Omen)’ हा हॉलीवूडचा भयपट चित्रपटापेक्षा त्याच्या मेकिंग दरम्यान घडलेल्या विचित्र घटनांमुळे जास्त गाजला. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांनी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेकींग दरम्यान चित्रपटाशी निगडित तंत्रज्ञ आणि कलाकारांना भयानक अनुभव आलेले असले, तरी या चित्रपटाची कहाणी सत्यघटनेवर आधारित नव्हती.
‘द ओमेन’ (The Omen) या चित्रपटात सैतानाच्या मुलाचा जन्म आणि त्यानंतर घडणाऱ्या विचित्र कथा दाखवण्यात आल्या आहेत. अमेरिकन मुत्सद्दी रॉबर्ट थॉर्न (ग्रेगरी पेक) याची पत्नी कॅथरीन (ली रीमिक) यांचा पहिला मुलगा जन्मतःच मरण पावतो. परंतु, हॉस्पिटलमध्ये एक फादर त्याच्या बाजूला येऊन बसतात आणि हॉस्पिटलमध्ये नुकत्याच जन्मलेल्या आणि अनाथ झालेल्या दुसऱ्या एका मुलाला दत्तक घ्यायची विनंती करतात. या मुलाची आई त्याला जन्म देऊन मरण पावलेली असते.
सुरुवातीला रॉबर्ट यासाठी तयार होत नाही. परंतु कॅथरीनला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल काहीही माहिती नसते. तिला जर कळलं, तर ती कोलमडून जाईल आणि तिची अवस्था आपण बघू शकणार नाही, या विचाराने तो त्या मुलाला दत्तक घ्यायला तयार होतो. यानंतर सुरु होतो सैतानी खेळ.
या चित्रपटातील अनेक दृश्य थरकाप उडवणारी आहेत. रात्रीच्या वेळी घरात एकटं असताना हा चित्रपट बघण्याचं धाडस सोडा विचारही करू नका. आणि जर का कोणी असा विचार करत असेल, तर चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान चित्रपटाशी निगडित तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या बाबतीत घडलेल्या विचित्र घटनांची माहिती मिळाल्यावर तर, हे धाडस कोणीच करू शकणार नाही.
अदृश्य शक्तीचा वावर
या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान संपूर्ण युनिटला विचित्र घटनांचा आभास होत होता. युनिटमधल्या प्रत्येकाचीच अशी धारणा होती की, एक अदृश्य शक्ती त्यांच्या चित्रीकरणात अडथळे निर्माण करतेय. पुढे पुढे युनिटला इतका त्रास होत होता की, ती अदृश्य शक्ती चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होऊ देणार नाही, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
आत्महत्येचं गूढ
या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीची सर्वात महत्वाची आणि विचित्र घटना म्हणजे हा चित्रपट साईन केल्यावर शूटिंग सुरु होण्यापूर्वी चित्रपटाचा नायक ग्रेगरी पेक यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मुलाच्या सर्व जवळच्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार त्याच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम नव्हता. तो अतिशय ‘फिट अँड फाईन’ आणि आनंदी होता. त्याने आत्महत्या केली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्याने आत्महत्या का केली, हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.
अपघात आणि विचित्र योगायोग
‘द ओमेन’ (The Omen) चित्रपटाचा नायक ग्रेगरी फेक आणि लेखक डेव्हिड सेल्टझर हे दोघेही एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणार होते, अर्थात, दोन वेगवेगळ्या विमानांमधून. परंतु, दुर्दैवाने (की सुदैवाने?) दोघांनाही विमानतळावर पोचायला उशीर झाला आणि दोघांचीही ‘फ्लाईट मिस’ झाली. या दोन्ही विमानांनी उड्डाण केल्यावर काही क्षणातच दोन्ही विमानांवर अचानक वीज कोसळली आणि त्यामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. परंतु, ग्रेगरी फेक आणि डेव्हिड सेल्टझर ‘फ्लाईट मिस’ झाल्यामुळे या भयंकर अपघातातून बचावले.
पुन्हा विमान अपघात
काही दिवसानंतर हाच प्रकार पुन्हा घडला. चित्रपटाचे निर्माते मेस न्यूफेड यांनी संपूर्ण युनिटसाठी विमान कंपनीकडे एका प्रायव्हेट चार्टर प्लेनची मागणी केली होती. परंतु दुर्दैवाने ते चार्टर प्लेन दुसऱ्याला आधीच दिलेलं असल्याने दुसऱ्या प्लेनची व्यवस्था करण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे निर्मात्यांना न मिळालेलं चार्टर प्लेन उड्डाण करून काही अंतर गेल्यावर त्यावरही वीज कोसळली आणि विमान रस्त्यावरच्या एका कारवर जाऊन कोसळलं. पण याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे त्या कारमधून पायलटचं संपूर्ण कुटुंब प्रवास करत होतं. पायलट आणि विमानातील इतर प्रवाशांसह कारमधील सर्व व्यक्ती म्हणजे पायलटचं कुटुंब ‘ऑन द स्पॉट’ मरण पावलं होतं.
चित्रपटातील प्रसंग आणि वास्तव
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही दिवसातच स्पेशल इफेक्ट डायरेक्टर जॉन रिचर्डसन यांनी आपली गर्लफ्रेंड गमावली. जॉन रिचर्डसन आपल्या गर्लफ्रेंडसह रात्री ड्राइव्हला गेलेले असताना एका जंगलाजवळ पोचल्यावर कारचा अपघात झाला. या अपघातामधून जॉन रिचर्डसन तर वाचले परंतु, त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये जॉन रिचर्डसनच्या गर्लफ्रेंडचं डोकं शरीरापासून वेगळं होऊन पडलेलं होतं. यामध्ये थक्क करणारी गोष्ट म्हणजे द ओमेन (The Omen) या चित्रपटामध्ये अगदी हाच प्रसंग चित्रित करण्यात आला होता. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे एक ‘माईलस्टोन’ होता आणि त्यावर लिहिलेलं होतं 6.66. म्हणजेच तीन वेळा सहा (666). चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या क्रमांकाला सैतानाचा नंबर म्हटलं जातं आणि चित्रपटात या क्रमांकाचा संदर्भ घेण्यात आला आहे.
=======
हे देखील वाचा – हम आपके है कौन – अबब! या चित्रपटासाठी माधुरीने घेतलं होतं ‘इतकं’ मानधन!
=======
हा चित्रपट सुपरहिट ठरला अगदी या चित्रपटाला मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कारही मिळाला. पुढे याचा ‘डेमियन: ओमेन 2 (Damien: Omen II)’ या नावाने सिक्वलही आला. परंतु, हॉलिवूडच्या इतिहासात हा चित्रपट आजही सर्वात अशुभ चित्रपट समजला जातो.