दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
आता प्रतीक्षा आहे ‘मेरिलिन मन्रो’च्या बहुचर्चित बायोपिकची…
‘ब्लॉन्ड’ हा २०२२ या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट. जगप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका ‘मेरिलिन मन्रो’ हिच्या या जीवनपटाबद्दल जगभरात कुतूहल आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये त्याची निवड झालेली आहे.
जॉईस कॅरोल ओट्स यांनी २००० साली लिहिलेल्या ‘ब्लॉन्ड (Blonde)’ या मेरिलिनच्या (Marilyn Monroe) चरित्रावर आधारित चित्रपट त्याच नावाने प्रदर्शित होणार आहे. ‘ब्लॉन्ड’चा दिग्दर्शक आहे अँड्र्यू डॉमिनिक, ज्याने याआधी ‘माईंडहंटर’ या सीरिजचे काही भाग आणि ‘किलिंग देम सॉफ्टली’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटाशी जोडलेलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे ब्रॅड पिट… तो या चित्रपटाचा सह-निर्माता आहे.
‘मेरिलिन मन्रो’ला (Marilyn Monroe) जाऊन आता साठ वर्षं होतील, पण तिच्याबद्दलचं आकर्षण, तिच्या आयुष्याबद्दलचं गूढ आजही कायम आहे. तिच्या मादक सौंदर्याला कारुण्याची झालर होती. बारा वर्षांच्या हॉलिवूड करिअरमध्ये ‘मेरिलिन’ने तब्बल ३३ चित्रपटांमध्ये काम केलं. तिचा मृत्यू झाला १९६२ साली, तेव्हा तिचं वय होतं अवघं ३६ वर्षं. तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला, यावरून अजूनही चर्चा सुरू असतात.
‘मेरिलिन’सारख्या सौंदर्यवतीबरोबर अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावंही जोडली गेली. काही जणांवर तिने खरंच प्रेम केलं होतं, तर काही म्हणजे नुसताच अफवा पसरवण्याचा प्रकार होता. प्रतिभावान लेखक आर्थर मिलरबरोबर तिने तिसरं लग्न केलं, पण ते फार काळ टिकू शकलं नाही. मग पुढे फ्रॅंक सिनात्रा, सर लॉरेन्स ओलिव्हिए आणि अगदी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याबरोबर तिच्या संबंधाच्या चर्चाही रंगल्या होत्या.
लॉस एंजलिस मध्ये आलेली एक अनाथ मुलगी ते जगात गाजलेली अभिनेत्री हा ‘मेरिलिन’ चा प्रवास आणि तिचा दुःखद शेवट असा सगळा पट ‘ब्लॉन्ड’मध्ये उलगडणार आहे. लार्जर दॅन लाईफ झपाटलेपणाची ही एक शोकांतिकाच आहे.
स्वतः दिग्दर्शक अँड्र्यूच्या शब्दात सांगायचं तर, “मेरिलिनचं आयुष्य हे ब्रेक नसलेल्या गाडीसारखं होतं. गाडी सुसाट धावत होती, बघणाऱ्यांना वेगाची नशा दिसत होती, पण गाडी कधीतरी जाऊन जोरात आदळणार हे गाडीत बसलेल्या मेरिलिनला कळलेलं होतं.”
तगडी स्टारकास्ट हे ‘ब्लॉन्ड’चं आणखी एक वैशिष्ट्य. सध्याची आघाडीची अभिनेत्री ‘ॲना द अरमास’ हिने मेरिलिनची भूमिका साकारली आहे. ‘नाईव्ह्ज आऊट’, ‘ब्लेड रनर २०४९’, ‘नो टाइम टू डाय’ हे तिचे अलीकडचे काही गाजलेले चित्रपट.
आर्थर मिलर यांच्या भूमिकेत आहे एड्रिअन ब्रोडी, तर केनेडींची भूमिका साकारली आहे कॅस्पर फिलीप्सन या डॅनिश अभिनेत्याने. कॅस्परने यापूर्वीही ‘जॅकी’ या चित्रपटात केनेडींची व्यक्तिरेखा साकारली होती.
‘फक्त प्रौढांसाठी’ म्हणजेच NC-17 रेटिंग मिळवणारा ‘ब्लॉन्ड’ हा नेटफ्लिक्सची निर्मिती असलेला पहिला चित्रपट आहे. हॉलिवूड चित्रपटांसाठी NC-17 हे रेटिंग तसं दुर्मिळ मानलं जातं. प्रमाणाहून जास्त नग्नता आणि सेक्स सीन्स असतील तरच हे रेटिंग देण्यात येतं. यामुळेच ‘ब्लॉन्ड’बद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झालेली आहे. पण दिग्दर्शक अँड्र्यू डोमिनिकला या चर्चांचं फारसं काही वाटत नाही. “मला जसा चित्रपट बनवायचा होता, तसा मी बनवलेला आहे आणि निर्मात्यांनी मला त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं याचा आनंदच आहे. शेवटी ही फिल्म सेक्स आयकॉन ‘मेरिलिन मन्रो’बद्दल (Marilyn Monroe) आहे हे विसरू नका”, असं त्याचं म्हणणं आहे.
‘ब्लॉन्ड’ हा चित्रपट म्हणजे एका ग्लॅमरस मदनिकेची शोकांतिका आहेच, पण त्याचबरोबर पन्नास आणि साठच्या दशकातलं हॉलिवूड, आपल्या फॅशन आणि स्टाईलने ‘मेरिलिन’ने त्याकाळात आणलेले नवे ट्रेंड, तिच्या आयुष्यातील चढ-उतार, तिच्या मृत्यूचं गूढ, असं बरंच काही या चित्रपटात बघायला मिळेल.
========
हे देखील वाचा – ‘नाईकी’ आणि मायकल जॉर्डन यांच्यामधील करारावर आता येतोय हॉलिवूडपट!
========
‘मॅडोना’ ते ‘लेडी गागा’पर्यंत प्रेरणा देणारी मेरिलिन मन्रो नेमकी होती कशी याचं वास्तववादी चित्रण या चित्रपटात असेल. या वर्षअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.