‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आवर्जून बघाव्यात अशा मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज
सध्याचा काळ हा वेबसिरीजचा काळ आहे. मोबाईलवर कधीही पाहता येणाऱ्या आणि पुढच्या भागाची वाट न पाहता सलग पाहता येणाऱ्या वेबसिरीज सध्या सर्व वयोगटाच्या व्यक्तींच्या पसंतीस उतरत आहेत. इंग्रजी, हिंदी भाषेसह आता प्रादेशिक भाषेतही अनेक वेबसिरीज बनत आहेत आणि त्या डब करून हिंदीसह इतर भाषेतही प्रसारित केल्या जात आहेत किंवा सब टायटलसहही बघितल्या जात आहेत.
वेबसिरीजच्या या दुनियेत कित्येक मराठी वेबसिरीजही दाखल झाल्या आहेत. आज मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज कोणत्या याबद्दल माहिती घेऊया. (Top 5 Marathi Web Series)
एक थी बेगम (Ek Thi Begum)
एप्रिल २०२० मध्ये ऐन लॉकडाऊनच्या काळात एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली ‘एक थी बेगम’ ही वेबसिरीज सत्यघटनेवर आधारित आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अनुजा साठे-गोखले मुख्य भूमिकेत होती. तिच्यासोबत या सिरीजमध्ये चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, अंकित मोहन, विजय निकम, राजेंद्र शिरसाटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या सिरीजमध्ये अनुजा साठेने साकारलेली अशरफ भाटकर ही व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्यक्षातली सपना दीदीची व्यक्तिरेखा असल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अशरफ आपला जीव धोक्यात घालते. या सूडाच्या प्रवासात अशरफचे कित्येक शत्रू निर्माण झालेले असतात. अशरफच्या सूडाचा थरार पाहताना प्रेक्षक एक क्षणही सिरीजपासून लांब जात नाही. IMDBवर या सिरीजला ९.४ रेटिंग देण्यात आलं आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये या सिरीजचा दुसरा सीझनही आला आणि तो देखील तितकाच लोकप्रिय झाला. (Top 5 Marathi Web Series)
समांतर (Samantar)
सुहास शिरवळकर लिखित ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज मराठीमधील लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे. “एकाचा भूतकाळ आहे दुसऱ्याचा भविष्यकाळ”, या अनोख्या थीमवर आधारित असणारं कथानक प्रेक्षकांना गुंगवून ठेवण्यात यशस्वी झालं. IMDBवर या सिरीजला ८.५ रेटिंग मिळालं आहे.
कुमार महाजन (स्वप्नील जोशी) आणि सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) या दोन व्यक्तिरेखांभोवती या सिरीजचं कथानक फिरतं. याखेरीज सिरीजमध्ये तेजस्विनी पंडित, जयंत सावरकर, गणेश रेवडेकर आदी कलाकारही लक्षवेधी भूमिकेमध्ये आहेत. (Top 5 Marathi Web Series)
उत्कंठावर्धक वळणावर पहिल्या सिझनची सांगता करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या सीझनबद्दल प्रचंड उत्सुकता होती. दुसरा सिझन १ जुलै २०२१ला प्रदर्शित करण्यात आला. या सीझनचे दिग्दर्शन केले होते समीर विद्ध्वंस यांनी. या सीझनमध्ये झालेली सई ताम्हणकरची एंट्री विशेष लक्षवेधी ठरली.
हाय टाइम (High Time)
१५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित झालेली ‘हाय टाइम’ ही वेबसिरीज अमेय, बिपिन, चैतन्य आणि देवेंद्र या चार मित्रांभोवती फिरते. यामध्ये आशुतोष गोखले, क्षितीश दाते, साईनाथ गानुवाड, सिद्धार्थ महाशब्दे, केतकी नारायण आणि तन्वी कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. अमेय बेकनाळकर दिग्दर्शित ही सिरीज यूट्युबवर उपलब्ध आहे.
प्रत्येकाची कहाणी वेगळी, समस्या वेगळ्या पण त्यातून मार्ग कसा काढायचा? पुढे जायचं की थांबायचं, अशा बऱ्याच उत्तर शोधणाऱ्या तरुणांनी ही सिरीज आवर्जून बघावी. (Top 5 Marathi Web Series)
अनुराधा (Anuradha)
केवळ मराठी भाषेतील मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रदर्शित करणाऱ्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘अनुराधा’ ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीजचं एक उत्तम उदाहरण आहे. यामध्ये तेजस्विनी पंडित, सचित पाटील, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी आणि अस्ताद काळे मुख्य भूमिकेत आहेत. IMDB वर या वेबसिरीजला ९.१ रेटिंग मिळाले आहेत. यामध्ये ‘कोर्ट रूम ड्रामा’ चित्रित करण्यात आला असून सिरीजची कहाणी संपूर्णपणे वेगळी आणि रोमांचक आहे.
या सिरीजबद्दल काहीही लिहिलं, तर तो स्पॉईलर ठरेल त्यामुळे यापेक्षा अधिक माहिती देता येणार नाही. पण तेजस्विनी पंडितने यामध्ये कमाल अभिनय केला आहे. शिवाय तिचे लुक्सही लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.
काळे धंदे (Kaale Dhande)
२०१९ साली झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली ‘काळे धंदे’ ही वेबसिरीज म्हणजे वेबसिरीजच्या दुनियेला साजेशी अशी बोल्ड सीन्स आणि शिव्यांची खैरात असणारी वेबसिरीज आहे. ही एक कॉमेडी वेबसिरीज असून यामध्ये महेश मांजरेकर, शुभंकर तावडे, नेहा खान, ओंकार राऊत आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Marathi Top 5 Web Series)
=====
हे देखील वाचा – सरकारनामा: सिस्टीममध्ये टिकून राहायचं असेल, तर सिस्टीम समजून घेणं आवश्यक आहे
=====
विकी नावाचा एक तरुण फोटोग्राफर एका मुलीलासोबत नको त्या अवस्थेत असताना त्याचे काका त्याला बघतात आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. यानंतर विकीच्या आयुष्यात होणारा गोंधळ विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे.