‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एका न झालेल्या विधवेची प्रेमकहाणी – माझा पती करोडपती
मराठीमध्ये नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रपट तयार होत असतात. अलीकडच्या काळात तर कित्येक मराठी चित्रपटांमधून उत्कृष्ट दर्जाचा कंटेंट प्रेक्षकांसमोर येतोय. पण हा लेख ज्या चित्रपटाबद्दल आहे तो आजच्या काळातला चित्रपट नाही, तर १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर आहे.
बॉलिवूडमध्ये प्रेमकथेवर आधारित चित्रपट काही कमी नाहीत. परंतु मराठीमध्ये त्या तुलनेत निव्वळ प्रेमकथेवर आधारित चित्रपट कमी बनतात. पण मराठी चित्रपटांमधील प्रेमकहाण्या ‘टिपिकल’ किंवा एका साच्यातून काढलेल्या नसतात तर, त्याचं कथानक संपूर्णतः वेगळं आणि काहीसं ‘हटके’ असतं. अशीच एक हटके प्रेमकथा असणारा चित्रपट म्हणजे ‘माझा पती करोडपती’.
१९८८ साली आलेल्या माझा पती करोडपती या चित्रपटामध्ये सचिन आणि सुप्रिया या जोडीसोबत अशोक सराफ, किशोरी शहाणे, निळू फुले, शुभ खोटे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं सचिन पिळगावकर यांनी.
छकुली (सुप्रिया) एक सुंदर, अल्लड, बिनधास्त पण अनाथ मुलगी. तिचे आई वडील लहानपणीच गेलेले असल्यामुळे तिच्या मामानेच (सुहास भालेकर) तिचा सांभाळ केलेला असतो. मामा उद्योगपती लक्ष्मीकांत कुबेर (निळू फुले) यांच्या घरी स्वयंपाकी असतो. आपल्या बहिणीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तो लग्न न करण्याचा निर्णय घेतो आणि गरिबीतही छकुलीचा मोठ्या प्रेमाने सांभाळ करतो.
छकुली आता वयात आलेली असते. त्यामुळे तिचा मामा एका चांगल्या मुलासोबत लग्न ठरवायच्या प्रयत्नात असतो. पण छकुलीला मात्र करोडपती मुलाशीच लग्न करायचं असतं.
त्या दिवशी लक्ष्मीकांत कुबेर यांच्या घरी पार्टीचं आयोजन केलेलं असतं कारण त्यांचा एकुलता एक मुलगा नरेंद्र कुबेर (सचिन पिळगावकर) अमेरिकेमधून शिक्षण पूर्ण करून भारतात परत आलेला असतो. पार्टीच्या स्वयंपाकासाठी मामाला मदत करायला छकुलीही लक्ष्मीकांत कुबेरांच्या घरी जाते. पण तिला खरी उत्सुकता असते ती नरेंद्रला बघण्याची.
पार्टीमध्ये नरेंद्र आपल्या मित्रमैत्रिणींशी भावी पत्नीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताना विधवेशीच लग्न करणार असल्याचं स्पष्ट करतो आणि छकुलीचा विरस होतो. पण हार मानेल ती छकुली कसली. तिने करोडपती मुलाशीच लग्न करण्याचा निश्चय केलेला असतो आणि नरेंद्र तिला मनापासून आवडलेलाही असतो. मग छकुली विधवा असल्याचं नाटक करायचं ठरवते आणि सौदामिनी बनून नरेंद्राच्या घरात आणि आयुष्यातही प्रवेश करते. यानंतर सुरू होतो एका अनोख्या प्रेमकहाणीचा प्रवास.
नरेंद्र हळूहळू सौदामिनीच्या प्रेमात पडतो. नरेंद्रची आई लक्ष्मी (शोभा खोटे) यांनाही सौदामिनी आवडायला लागते. पण सौदामिनीच्या विधवा असण्यावर लक्ष्मीकांत मात्र शंका घेतात आणि तिला तिच्या पतीविषयीची माहिती विचारतात. लक्ष्मीकांत यांच्या शंकांचे निरसन करताना सौदामिनी थकून जाते. पण हे सगळे प्रसंग अतिशय गंमतशीर पद्धतीने मांडण्यात आले आहेत. अशातच तिच्यापुढे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे लक्ष्मीकांत तिच्याजवळ मृत पतीचा फोटो मागतात. यानंतर मात्र चित्रपटात प्रचंड धमाल येते.
छकुली उर्फ सौदामिनी आणि नरेंद्र यांच्या प्रेमकहाणीसोबतच अजून एक प्रेमकहाणी या चित्रपटात आहे. ती म्हणजे नरेंद्रची मैत्रीण हेमा (किशोरी शहाणे) आणि दिनकर लुकतुके उर्फ कॅप्टन बाजीराव रणगाडे (अशोक सराफ) यांची. अचानक एका घटनेमुळे या दोन प्रेमकहाण्या एकमेकांशी जोडल्या जातात आणि सगळी गुंतागुंत होते.
हा गुंता कसा सुटतो? छकुलीचं सत्य नरेंद्रला कळतं का? सत्य कळल्यावरही तो तिचा स्वीकार करतो का? त्याची प्रेमकहाणी यशस्वी होते का? नरेंद्रचे कुटुंबीय घरातील नोकराच्या भाचीला सून करून घ्यायला तयार होतात का? आणि मुख्य म्हणजे हेमा आणि दिनकर लुकतुकेच्या प्रेमकहाणीचं पुढे काय होतं, हे सर्व वाचण्यापेक्षा पाहणं जास्त मजेशीर ठरेल.
चित्रपट संपूर्णपणे विनोदी अंगाने दिग्दर्शित करण्यात आल्यामुळे ही प्रेमकहाणी कुठेही रटाळ होत नाही. एकामागून एक घडणारे प्रसंग काहीसे अपेक्षित असले तरीही ज्या पद्धतीने ते दाखवण्यात आले आहेत ते पाहताना खळखळून हसतोच.
=======
हे देखील वाचा – एक शून्य शून्य: क्राईम थ्रिलर मालिकांचा सुरु झालेला प्रवास
=======
१९८८ सालातला चित्रपट असूनही काही प्रमाणात या काळातही ‘रिलेट’ होतो. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. थोडक्यात रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निखळ करमणूक हवी असेल आणि एक हलकी फुलकी पण वेगळ्या वळणावरची प्रेमकहाणी बघायची असेल, तर हा चित्रपट आवर्जून बघा.