‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘एलन डिजनरेस’चा जगप्रसिद्ध टॉक शो घेणार निरोप
८ सप्टेंबर २००३ या दिवशी ‘द एलन डिजनरेस शो’ चा पहिला भाग प्रसारित झाला आणि त्यानंतर १९ वर्षात तब्बल १९ सीझन प्रदर्शित झाले. हा शो अजूनही सुरुच आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या या शो ला १७१ एमी (Emmy) नामांकनं मिळाली आणि त्यापैकी ६१ वेळा एमी पुरस्कार मिळाले.
पुरस्कारांचा विचार केला तर, ‘एलन डिजनरेस शो’ने ओप्रा विन्फ्रे या शोचे रेकॉर्डही मोडले. पण आता एलनने (Ellen DeGeneres) थांबायचं ठरवलं आहे. जगभरात पसरलेल्या चाहत्यांसाठी हा धक्काच आहे. याच महिन्यात २६ मे रोजी या शोचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. यानंतर आता हा शो नवीन होस्ट आणि नवीन नावासह प्रेक्षकांसमोर येईल.
संपूर्ण मे महिन्यात प्रसारित होणारे भाग हे खास एलनच्या (Ellen DeGeneres) सन्मानार्थ असणार आहेत. मिशेल ओबामा, सेरेना विल्यम्स, जेनिफर गार्नर, डेव्हीड लेटरमन असे विविध क्षेत्रातील दिग्गज ‘एलन शो’च्या या खास भागांमध्ये हजेरी लावणार आहेत. २६ मे रोजी प्रसारित होणाऱ्या भागात नेमके कोण सेलेब्रिटी येणार हे अजून जाहीर झालेलं नाही, पण हा भाग एलन आणि प्रेक्षक, सगळ्यांसाठीच एकदम ग्रँड असणार हे नक्की.
स्टॅन्ड-अप कॉमेडी, सेलिब्रिटींशी गप्पा, स्टुडिओमध्ये हजर असलेल्या प्रेक्षकांना बक्षिसं असं सगळं या एलन डिजनरेस शो मध्ये सामावलेलं असतं. (आपल्याकडे कपिल शर्मा सारखे जेवढे शोज आहेत त्याची प्रेरणा ही ‘द एलन शो’ पासूनच आलेली आहे, असं म्हणता येईल.)
गेल्या दोन दशकात ४००० हून अधिक सेलिब्रिटींनी ‘द एलन शो’ मध्ये हजेरी लावली. यात हिलरी क्लिंटनपासून टॉम हँक्सपर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. २० वर्षांपूर्वी स्टॅन्ड अप कॉमेडियन असलेली एलनसुद्धा आता खूप मोठी सेलिब्रिटी बनलेली आहे. २०१९ मध्ये फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या प्रभावशाली महिलांच्या यादीत तिचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं.
‘एलन शो’ने इतकी वर्षं लोकप्रियता टिकवून ठेवली कारण बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत शो मध्ये गमतीशीर गोष्टी समाविष्ट होत राहिल्या. एलनची (Ellen DeGeneres) विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा हे गुण तर आहेतच, पण सेलिब्रिटींना बोलतं करण्याची तिची हातोटीही प्रेक्षकांना आवडत होती.
सोशल मीडियाचं आगमन झाल्यावर तिथे व्हायरल होणारे व्हिडीओ असतील किंवा त्या व्हिडीओमधून फेमस झालेल्या व्यक्ती असतील त्यांनाही हळूहळू एलनच्या शो मध्ये जागा मिळायली लागली. मोठमोठ्या सेलेब्रिटींसाठी एलनच्या शो मध्ये सहभागी होणं हे मानाचं समजलं जाऊ लागलं. मुख्य म्हणजे, ‘द एलन शो’ हा ‘डे टाईम’ म्हणजे दिवसा प्रसारित होणारा कार्यक्रम असल्यामुळे गृहिणींपासून लहान मुलांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे.
याच लोकप्रियतेमुळे २०१८ साली ‘एलन’ला अतिशय मानाचा समजला जाणारा ‘प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम’ हा पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार आपल्याकडच्या राष्ट्रपती पुरस्काराइतका मानाचा पुरस्कार समजला जातो.
एलनचं वय आता ६४ आहे. आणखी एक सीझन करून शो ची वीस वर्षं साजरी करता आली असती, पण त्याआधीच ती थांबतेय. या मागे एक कारण म्हणजे जी कंपनी एलनच्या शोची निर्मिती करते, त्या कंपनीच्या अंतर्गत कारभारावर गेल्या दोन-तीन वर्षात काही गंभीर आरोप झाले.
‘अ व्हेरी गुड प्रॉडक्शन’ असं नाव असूनही या कंपनीत काम करणं कठीण होत चाललंय, अशा तक्रारी वाढायला लागल्या. अगदी ‘मी टू’ चे आरोपही झाले. या तक्रारी थेट एलन बद्दल नसल्या तरी तिचं नाव मीडियामध्ये ओढलं जात होतं. #ReplaceEllen अशी एक मोहीमही ट्विटरवरून चालवली गेली. ज्यांनी एलनला (Ellen DeGeneres) पाठिंबा दिला त्या सेलेब्रिटींना ट्रोल करण्यात आलं.
काही दिवसांनी हा धुरळा खाली बसला, पण वातावरण गढूळ झालं होतं. म्हणूनच काही काळ गेल्यावर एलनने आपण आता थांबत असल्याचं जाहीर केलं. एलनच्या शो ने निरोप घेणं म्हणजे अमेरिकेच्या मनोरंजन विश्वातील एक पर्व संपल्यासारखं आहे.
‘द एलन शो’ जरी बंद होणार असला तरी ह्या शो चे जुने भाग आणि त्यातील सर्व गमती-जमती ‘ellentube’ या प्लॅटफॉर्मवर बघता येतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोण घेणार एलनची जागा?
एलनची (Ellen DeGeneres) जागा कोण घेणार याबद्दलही बरीच उत्सुकता होती. एलनच्या जागी जेनिफर हडसन येईल आणि नव्या शोचं नाव ‘द जेनिफर हडसन शो’ असेल अशी अधिकृत घोषणा झालेली आहे.
=====
हे देखील वाचा: मेटाव्हर्स: मनोरंजन क्षेत्रासमोर आभासी तंत्रज्ञानाचं नवं आव्हान
=====
जेनिफर ही अमेरिकन आयडॉल या रिऍलिटी शोमुळे घराघरात पोचली, त्यानंतर तिने अभिनयात पदार्पण केलं आणि ‘ड्रीमगर्ल्स’ या तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी तिला सहाय्यक अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.