दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लपाछपी: थरारक, रहस्यमय, उत्कट आणि भीतीदायक
एकूणच भारतामध्ये सस्पेन्स – हॉरर चित्रपट अभावानेच बनतात. जे बनतात त्यातले बहुतांश चित्रपट रहस्यमय किंवा भयप्रद न वाटता कंटाळवाणे, रटाळ किंवा हास्यास्पद वाटतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाला भयप्रद किंवा रहस्यमय बनविण्याच्या नादात चित्रपट मूळ कथेपासून भरकटत जातो. अनेकदा यामध्ये चांगल्या कथानकाचीही वाट लागते. अर्थात यालाही अपवाद काही चित्रपट आहेतच. पण यामध्येही दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा आहे. परंतु मराठीमध्येही काही उत्तोमोत्तम भयपट बनले आहेत ज्यामध्ये भय, उत्कंठा आणि रहस्याची उत्तम गुंफण करण्यात आलेली आहे. असाच एक चित्रपट म्हणजे ‘लपाछपी (Lapachhapi)’.
२०१७ साली आलेला विशाल फुरिया दिग्दर्शित ‘लपाछपी (Lapachhapi)’ या चित्रपटामध्ये पूजा सावंत आणि विक्रम गायकवाड यांच्यासह उषा नाईक व अनिल गवस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथानक, दिग्दर्शन आणि कलाकारांचे अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स द्यावेच लागतील. कुठेही ‘उन्नीस-बीस’ म्हणायला जागा शिल्लक नाही.
चित्रपटाच्या सुरुवातीला एक गरोदर स्त्री धावताना दाखवली आहे. धावता धावता ती पडते आणि तिच्यासमोर तीन लहान मुलं येऊन उभी राहतात. त्यांच्या हातात चाकू असतो आणि ती त्याला आपल्या बाळाला मारू नको म्हणून विनंती करत असते. या पहिल्याच दृश्यापासून चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. त्यांच्या मनात भीती, कुतूहल, रहस्याचा शोध सगळ्या भावना जागृत होतात आणि प्रेक्षक कथेमध्ये अडकत जातो.
तुषार (विक्रम गायकवाड) एका प्रकरणात अडकलेला असतो. पैशासाठी गुंडांकडून मारहाण झाल्यावर तो आपली गरोदर पत्नी नेहाला (पूजा सावंत) घेऊन आपला ड्रायव्हर भाऊरावच्या गावी जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी भाऊराव त्यांची ऊसाच्या मळ्यावरच्या घरात व्यवस्था करतो. भाऊराव आणि त्याची पत्नी तुळसाबाई (उषा नाईक) तुषार – नेहाला सुरक्षित असल्याची हमी देऊन आश्वस्थ करतात.
दोन दिवसांतच तुळसाबाई नेहाला जीव लावतात. नेहा त्यांना आपल्या आईच्या जागी मानू लागते. नेहा स्थिरावली म्हटल्यावर तुषार शहरातली परिस्थिती पाहण्यासाठी नेहाला तिथे सोडून निघून जातो. त्यांनतर मात्र विचित्र घटना घडू लागतात.
तुळसाबाईंच्या घरात अजून एक व्यक्ती राहत असते. त्यांनतर नेहाला दिसणारी लहान मुलं तिच्याशी लपाछपी खेळायचा प्रयत्न करतात. ते पाहून तुळसाबाई नेहाला त्यांच्यापासून लांब राहायचा सल्ला देतात. चित्रपटामध्ये एकामागून एक अनेक गोष्टी घडतात, पण त्या कुठेही विस्कळीत वाटत नाहीत, हे महत्त्वाचं! अनेकदा चित्रपटाला रहस्यमय करण्याच्या नादात दिग्दर्शकाकडून ही चूक होते आणि दृष्यांमधली सुसूत्रता हरवते. पण लपाछपी (Lapachhapi) पाहताना असं कुठेही जाणवत नाही.
गावाकडचं वातावरण, तिथली भाषा, जीवनशैली सगळं अनुभवताना नेहा काही क्षण आपलं टेन्शन विसरत असते. परंतु ज्या तुळसाबाईंमुळे ती आश्वस्थ झालेली असते त्यांच्या विचित्र वागण्यामुळे ती पुरती गोंधळून जाते. त्यांची अति काळजी, अंधश्रद्धा या गोष्टी तिला खटकू लागतात. अशातच एक विचित्र गोष्ट घडते आणि रहस्याचा गुंता सुटतोय, असं वाटत असताना तो अधिकच गडद होतो.
सस्पेन्स – थ्रिलर चित्रपट असल्यामुळे कथानकाबद्दल जास्त काही लिहिलं तर तो ‘स्पॉईलर’ ठरेल. पण अत्यंत कमी बजेटमध्ये कुठलेही स्पेशल इफेक्टस् न वापरताही एक उत्कृष्ट सस्पेन्स – थ्रिलर चित्रपट बनवता येतो, हे दिग्दर्शकाने दाखवून दिलं आहे. काही साधी दृश्य पाहतानाही मनात भीती निर्माण होते. चित्रपटाचं जवळपास सर्वच चित्रीकरण उसाचा मळा आणि त्या बाजूचं शेतघर या दोन ठिकाणीच झालं आहे. इतकी कमी लोकेशन वापरून क्वचितच कुठला हॉरर चित्रपट तयार झाला असेल.
IMDB वर या चित्रपटाला ७.६ रेटिंग देण्यात आलं आहे. या चित्रपटाला इंडिफेस्टमध्ये एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचा पुढे ‘छोरी’ या नावाने हिंदी रिमेकही करण्यात आला. परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही.
=========
हे देखील वाचा – द ओमेन (The Omen): कहानी पुरी फिल्मी नही… शापित है!
=========
मराठी चित्रपट नक्की कुठे कमी पडतात? ब्रॅंडिंग, पब्लिसिटी की मार्केटिंग? एका हॉलीवूडपटाइतकं उत्तम कथानक आणि दिग्दर्शन असताना केवळ स्पेशल इफेक्टस नाहीत म्हणून चित्रपटाला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही की यामागे अजून काही कारण आहे? एकीकडे हिंदीमध्ये टुकार चित्रपट गर्दी खेचत असताना मराठीतल्या एका वेगळ्या विषयावरचा रहस्यमय भयपटाकडे प्रेक्षक पाठ का फिरवतात? मराठी चित्रपटसृष्टीला चांगल्या कलाकृतींइतकीच गरज आहे ती कलाकृती सुजाण प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचविण्याची. जर हे जमलं, तर ही चित्रपटसृष्टीही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीइतकीच बहरेल.