‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आवर्जून पाहायलाच हवेत असे टॉप ५ मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट
सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडणारा एक खास असा प्रेक्षकवर्ग आहे. हा प्रेक्षकवर्ग नेहमी हॉलिवूड किंवा साऊथच्या चित्रपटांचं गुणगान करत असतो. पण जरासं वळून मराठी चित्रपटांकडे बघितल्यास लक्षात येईल इथेही एकापेक्षा एक सरस असे सस्पेन्स थ्रिलर चित्रपट (Suspense Thriller Marathi Movies) आहेत. या वीकेंडला जर तुम्ही सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघायचा प्लॅन करत असाल तर, या लेखात दिलेल्या या ५ मराठी चित्रपटांचा विचार नक्की करा.
१. कृतांत (२०१९)
२०१९ साली आलेल्या या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नाही. चित्रपटाचं कथानक सम्यक नावाच्या तरुणाभोवती फिरतं. सम्यक ‘वर्क लाईफ बॅलन्स’ करण्यासाठी धपडणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. अखेर कामाच्या व्यापातून ब्रेक घेऊन सम्यक मित्रांसोबत पिकनिकला जायचं ठरवतो, पण वाटेत विचित्र घटना घडतात आणि सम्यक एकटा पडतो. त्याचवेळी त्याला एका बाबा भेटतो आणि रहस्यमय घटनांचा सिलसिला वाढतच जातो.
चित्रपटामध्ये सुयोग्य गोर्हे आणि संदीप कुलकर्णी प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण मालवण आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील जंगलामध्ये अवघ्या १७ रात्रींमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. याच कारणामुळे चित्रपट बघताना तो जास्त रिअलिस्टीक वाटतो. हा चित्रपट अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (Suspense Thriller Marathi Movies)
२. कौल (२०१६)
अचानक एके दिवशी एखादी विलक्षण गोष्ट नजरेस पडते आणि त्याबद्दल आपण कोणाशीच काही बोलू शकत नाही. अशावेळी काय करायचं? विश्वाचं भवितव्य बदलू शकेल अशी एखादी जबाबदारी अंगावर पडली तर काय? अशाच अकल्पित प्रश्नांनी गोंधळून गेलेल्या एका खेडेगावातील शाळेतील शिक्षकाची कहाणी ‘कौल’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
आदिश केळुसकर दिग्दर्शित कौल हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये मकरंद काजरेकर, अवनी काजरेकर रोहित कोकाटे, दीपक परब आणि सौदामिनी टिकले प्रमुख भूमिकेत आहेत. IMDB वर या चित्रपटाला ७.५ रेटिंग देण्यात आलं आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर उलपब्ध आहे.
३. राक्षस (२०१८)
ज्ञानेश झोटिंग लिखित आणि दिग्दर्शित ‘राक्षस’ हा मराठी फँटसी थ्रिलर चित्रपट आहे. दुर्गम जंगलामधल्या आयुष्यावर आधारित करणारा एक डॉक्युमेंटरी फिल्म बनविणारा निर्माता बेपत्ता होता. त्याची पत्नी आणि त्याची मुलगी त्याचा शोध घेत असतात. या शोधाच्या प्रवासात एक परिकथेचं पुस्तक आणि जंगलात भेटलेला म्हातारा व त्याची कोडी खूप महत्वपूर्ण ठरतात.
या चित्रपटात शरद केळकर, सई ताम्हणकर, विजय मौर्य, उमेश जगताप, रुजुता देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत. IMDB वर या ७.१ रेटिंग देण्यात आलं आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. (Suspense Thriller Marathi Movies)
४. सविता दामोदर परांजपे (२०१८)
चित्रपटाचं कथानक रहस्यमय या प्रकारातलं आहे. आपल्या पत्नीसह सुखाने आयुष्य जगत असताना अचानक घडणाऱ्या विचित्र घटना, पत्नीचं विचित्र वागणं, तिला मानसिक आजार असण्याची शंका, समोर येणारं भूतकाळातलं वास्तव अशा विचित्र कात्रीत नायक अडकत जातो आणि प्रेक्षक रहस्यामध्ये गुंतत जातात.
स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हैसकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट युट्यूब वर उपलब्ध आहे.
=======
हे देखील वाचा – जस्ट मोहब्बत: उमलत्या वयातील अलवार भावभावनांचा अविष्कार
=======
५. भयभीत (२०२०)
शेखर आणि रश्मी त्यांची गोड मुलगी श्रेया एक सुखी कुटुंब. परंतु अचानक अशी घटना घडते की, सगळी घडी विस्कटून जाते. रश्मी शेखर आणि श्रेयाला सोडून कायमची निघून जाते. पण श्रेया मात्र आई जिवंत असल्याचा दावा करत असते. शिवाय ती घरात राहणाऱ्या राघव नावाच्या माणसाबद्दलही शेखरला सांगते आणि गूढ अजून वाढत जातं. कथेमध्ये नवनवीन पात्रांची एंट्री होते आणि रहस्यमय घटनांचा सिलसिला सुरुच राहतो. चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आणि वेगळा आहे. (Suspense Thriller Marathi Movies)
या चित्रपटामध्ये सुबोध भावे, पूर्वा गोखले, मधु शर्मा, मृणाल जाधव, यतीन कार्येकर, गिरीजा जोशी प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. IMDB वर या चित्रपटाला ७.८ रेटिंग देण्यात आलं आहे.