श्वास – आयुष्य जगायचं तर डोळे मिटावेच लागणार!
आयुष्य जगायचं म्हणजे नेमकं काय? जसं आहोत, ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती स्वीकारून जगत राहायचं की, आज ना उद्या परिस्थिती बदलेल या आशेवर दिवस ढकलायचे? पण यापैकी काहीच शक्य नसेल तर? जगण्याची लढाई कठीण असते मान्य, पण इतकी कठीण की जगायचं असेल तर डोळे कायमचेच मिटून घ्यावे लागतील? २००४ साली आलेल्या ‘श्वास’ चित्रपटात अशीच एक जगण्याची कठीण लढाई दाखविण्यात आली आहे.
‘श्वास’ या या चित्रपटाची कहाणी पुण्यामध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित होती. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालेला हा पहिला मराठी चित्रपट, तर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला हा दुसरा मराठी चित्रपट होता. श्यामची आईनंतर तब्बल ५१ वर्षांनी मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. (Marathi Movie Shwaas)
कोकणातल्या एका गावात राहणारं एक साधं सरळ कुटूंब. या कुटुंबातला मुलगा परश्या उर्फ परशुराम त्याच्या आजोबांचा प्रचंड लाडका असतो. शेवटी दुधापेक्षा त्यावरच्या सायीलाच जास्त जपतात. तसंच हे आजोबा म्हणजेच केशव विचारे आपल्या नातवाला जीव लावत असतात. पण या सुखी आयुष्यात अचानक एक वादळ येतं.
परश्याला डोळ्यांचा कर्करोग होतो. ज्यासाठी तातडीने ऑपरेशन करण्याची आवश्यकता असते. पण गोष्ट केवळ इथेच संपत नाही. या ऑपरेशनसाठी पैशांची उभारणी हा प्रश्नच नसतो. त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. मुख्य प्रश्न असतो की, या ऑपरेशननंतर परश्या कधीच बघू शकणार नसतो.
श्वास की दृष्टी? एक अवघड प्रश्न. श्वास वाचवायचा, तर दृष्टी गमवावी लागणार आणि दृष्टी गमवायची नसेल तर, श्वास कधीही थांबू शकेल. काय करावं? जे आहे ते स्वीकारून जगायचं की, जमेल तितकं पण मनमुराद जगायचं? असे सारे प्रश्न आजोबांसमोर उभे राहतात. पण याहीपेक्षा जास्त महत्त्वाची समस्या असते ती ही परिस्थिती लहानग्या नातवाला कशी सांगायची? या घटनेमुळे त्याचं छोटंसं भावविश्व उध्वस्त होणार असतं. आयुष्यभर दृष्टिहीन म्हणून जगायची मनाची तयारी तो कसा करणार? (Marathi Movie Shwaas)
अनेकदा आयुष्यात दुःख भोगण्यापेक्षा जास्त दुःखद असतं आपल्या प्रिय व्यक्तीला दुःखात बघणं. अशावेळी होणारी मनाची घालमेल आजोबांच्या भूमिकेतील अरुण नलावडे यांनी प्रभावीपणे व्यक्त केली आहे. परश्याची भूमिका करणाऱ्या अश्विन चितळे या बालकलाकाराचे विशेष कौतुक. या मुलाने परश्याची भूमिका अक्षरशः जगली आहे.
ऑपरेशन ठरल्यानंतरचा प्रसंग आणि ऑपरेशनच्या वेळी हॉस्पिटलमधून आजोबा आणि परश्याचं अचानक गायब होणं, हे प्रसंग पाहताना डोळे पाणावतात. या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी यांनी साकारलेला डॉक्टर आणि अमृता सुभाषने साकारलेली सामाजिक कार्यकर्ती या भूमिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. दोघांनीही आपआपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. (Marathi Movie Shwaas)
चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे कोणत्याही प्रकराचा ‘इमोशनल ड्रामा’ यामध्ये दाखवण्यात आलेला नाहीये. यासाठी दिग्दर्शक संदीप सावंत यांचं विशेष कौतुक. विशेष म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी थेट ऑस्करपर्यंत सिक्सर मारला.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक भास्कर चंदावरकर यांनी प्रसंगाचं गांभीर्य किंवा आजोबांची वेदना दाखविण्यासाठी कोणत्याही कर्णकर्कश संगीताचा वापर केला नाही. त्यामुळे चित्रपट ‘ड्रॉमॅटिक’ न वाटता वास्तववादी वाटतो. (Marathi Movie Shwaas)
अरुण नलावडे यांनी साकारलेली शांत, धीर – गंभीर आणि तेवढ्याच हळव्या आजोबांची भूमिका थेट मनाला स्पर्श करते. क्षणाक्षणाला वाढणारी मनाची घालमेल त्यांनी ज्या पद्धतीने दाखवली आहे ते पाहताना सर्वकाही आपल्या समोर घडतंय असंच वाटत राहतं.
या चित्रपटाचा आत्मा म्हणजे चित्रपटाची कथा. दिग्दर्शक संदीप सावंत यांनी माधवी घारपुरे यांनी लिहिलेली लघुकथा कुठेतरी वाचली आणि त्यावर चित्रपट बनवायची कल्पना त्यांना सुचली. पण मुख्य प्रश्न होता तो पैशांचा. मात्र संदीप सावंत यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने त्यावरही मात करत कसेबसे ६० लाख रुपये जमा केले. यासाठी त्यांनी कित्येक फायनान्सर्सच्या पायऱ्या झिजवल्या. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना प्रचंड मोठे यश मिळाले. चित्रपटाने बजेटपेक्षा जवळपास पाचपट जास्त कमाई केली. (Marathi Movie Shwaas)
======
हे देखील वाचा – मराठी चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये एवढी अनास्था का आहे?
======
कोणतीही प्रेमकथा नाही, हाणामारी नाही, आयटम सॉंग नाही की मोठ मोठे इफेक्टस नाहीत. तरीही या चित्रपटाने इतिहास घडवला. कमी बजेटमध्येही एक चांगली कलाकृती निर्माण होऊ शकते, हे या चित्रपटाने दाखवून दिलं.