मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
उत्तम युक्तिवाद करूनही हाय कोर्टात केस हरले होते ॲड महेश कोठारे!
महेश कोठारे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधलं एक मोठं नाव. एक उमदा नायक, हुशार दिग्दर्शक आणि दूरदृष्टी असणारा चित्रपट निर्माता. धुमधडाका पासून अगदी अलीकडच्या झपाटलेला २ पर्यंत अनेक विषयांवर विनोदी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. मराठी चित्रपटामधलं ९०चं दशक त्यांच्या चित्रपटांनी गाजवलं आहे. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, जिवलगा, पछाडलेला, माझा छकुला असे त्यांचे अनेक चित्रपट या काळात सुपरहिट झाले होते.
महेश कोठारे यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यावेळी त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं. (Interesting facts about Mahesh Kothare)
महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत. ‘सिनेमास्कोप’, ‘पॅरडी सॉंग’ असे अनेक प्रकार त्यांनी मराठीमध्ये आणले. ‘सिनेमास्कोप’ सारखा भव्य दिव्य प्रकार मराठीमध्ये आणणं हे अत्यंत धाडसाचं आणि कठीण काम होतं, तर ‘पॅरडी सॉंग’ हा प्रकार मराठी प्रेक्षकांसाठी नवीन होता. तसंच त्यांनी पहिला मराठी थ्री डी चित्रपट बनवला, हा चित्रपट होता २०१३ सालचा ‘झपाटलेला २’. या चित्रपटामध्ये नायक होता त्यांचा स्वतःचा मुलगा आदिनाथ कोठारे. (Interesting facts about Mahesh Kothare)
‘धडाकेबाज’ चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्टस वापरण्याची आवश्यकता होती म्हणून त्याचं अधिकृत शिक्षण घेण्यासाठी महेशजी थेट अमेरिकेला गेले होते. याच दरम्यान त्यांचा ‘थरथराट’ चित्रपटाचं चित्रीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. त्यामुळे अमेरिकेहून आल्यावर त्यांनी अमेरिकेत शिकलेल्या स्पेशल इफेक्टसच्या ट्रेनिंगचा वापर ‘थरथराट’ चित्रपटातही केला.
महेश कोठारे यांच्या चित्रपटांमधील प्रयोगाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. कै लक्ष्मीकांत बेर्डे हे तर त्यांचे जीवश्च मित्र होते. त्यामुळे आपल्या प्रत्येक चित्रपटात ‘लक्ष्या’ हवाच असा आग्रह ते ‘त्यांच्यातल्या’ दिग्दर्शकाला करत असत. तर असं दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे महेश कोठारे एक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ते यशस्वी आहेतच, पण त्याही पूर्वी ते एक वकील म्हणूनही यशस्वी होते. ते ही खऱ्याखुऱ्या आयुष्यात! (Interesting facts about Mahesh Kothare)
महेशजी आपल्या शिक्षणाबाबत कमालीचे गंभीर होते. बालकलाकार म्हणून भरपूर कौतुक वाट्याला येत असतानाही महेशजींनी अभिनयाऐवजी शिक्षणावर आपलं सारं लक्ष केंद्रित केलं. मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी पर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांनी एलएलबी करून वकिलीही सुरु केली. वकील म्हणून यशस्वी होत असतानाही त्यांचं मन मात्र चित्रपटसृष्टीकडे ओढ घेत होतं. लहानपणापासूनच त्यांनी चित्रपट निर्मितीचं स्वप्न बघितलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात सतत चित्रपट निर्मितीचेच विचार घोळत असत.
महेशजी वकील म्हणून चांगलं नाव कमवत होते. एका केसदरम्यान त्यांनी हाय कोर्टात जज समोर आपल्या पक्षकाराला वाचविण्यासाठी अनेक युक्तिवाद केले. त्यावेळी ते इतके बोलले की बोलून बोलून थकून गेले. अगदी जजही त्यांच्या युक्तिवादाने ‘इम्प्रेस’ झाले आणि त्यांचं कौतुक करत म्हणाले, “Mr. Kothare you argued very well. But I am sorry. I have to convict your client.” (मिस्टर कोठारे, तुम्ही खूप छान युक्तिवाद केलात. पण माफ करा, मी तुमच्या क्लायंटला दोषी ठरवत आहे.)
जजचं बोलणं ऐकल्यावर महेश कोठारे आपली सर्व कागदपत्र गोळा करून जायला निघाले. तेवढ्यात तिथे बसलेले एक सिनिअर वकील त्यांना म्हणाले, “वा मिस्टर कोठारे, तुम्ही एक उत्तम वकील होऊ शकता.” हे ऐकून महेश कोठारे नाराज झाले. त्यांना हे कौतुक म्हणजे चक्क ‘शाप’ वाटला कारण त्यांना वकील म्हणून कारकीर्द घडवण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं. त्यांचं मन नेहमीच चित्रपटसृष्टीकडे ओढ घ्यायचं. एक चांगला कलाकार आणि फिल्ममेकर म्हणून त्यांना नाव कमवायचं होतं. (Interesting facts about Mahesh Kothare)
=======
हे देखील वाचा – मराठीमधील ‘या’ जोड्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही हिट झाल्या होत्या
=======
पुढे महेश कोठारे यांनी आपलं फिल्म मेकिंगचं स्वप्न पूर्ण केलंच! एक कलाकार म्हणून त्यांनी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये अगदी नकारात्मक भूमिकेपासून डॅशिंग इन्स्पेक्टर पर्यंत वेगवगळ्या भूमिका साकारल्या. कलाकार म्हणून स्थिरस्थावर झाल्यावर ‘धुमधडाका’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली; शिवाय त्यात नायकाची मुख्य भूमिकाही साकारली. पण हा हुशार, देखणा नायक प्रत्यक्ष आयुष्यात यशस्वी वकील म्हणून नाव कमवू शकला असता, हे देखील तितकंच खरं आहे.
– भाग्यश्री बर्वे