‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अक्षया सांगतेय सौंदर्याची नवी व्याख्या
मुलांना आई जाड असलेली चालते, बहिण काय अगदी मुलगीदेखील जाडजूड चालते..पण बायको मात्र फिट हवी असा तक्रारीचा सूर काढत पडद्यावर प्रोमोच्यानिमित्ताने दिसलेली अक्षया नाईक प्रत्यक्षात वजनदार आहे. तसं पाहिलं तर अभिनयात लीड रोल करायचा असेल तर त्यासाठी पहिली अट असते झिरो फिगर. वजनाचा काटा पन्नाशीवर असेल तरच मुख्य नायिकेसाठी निवड होते. इतकेच काय तर ज्यांना सेलिब्रिटी व्हायचे आहे त्यांनी आधी जिममध्ये घाम गाळावा आणि मगच ऑडिशनकडे वळावं असं म्हटलं जातं. पण आता गेल्या काही वर्षात सिनेमा, मालिका, नाटक या माध्यमांमधून येणाऱ्या वास्तववादी विषयात शरीराची जाडी आणि त्यातून फुलणारे तर कधी दुरावणारे नातेबंध अशा विषयांना हात घातला जातोय. याच पंक्तीत आता सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचाही समावेश झाला आहे. यानिमित्ताने अक्षया नाईक ही मुळातच शरीराने स्थूल असलेली मुलगी एक अभिनेत्री म्हणून समाजातील जाड मुलींच्या लग्नाचा प्रश्न कसा बिकट आणि मुलींच्या मनावर परिणाम करणारा, जाड मुलीच्या आईवडीलांना लेकीच्या लग्नाबाबत हतबल करणारा आहे याकडे लक्ष वेधत आहे.
लग्नासाठी मुलगी कशी पाहिजे या प्रश्नावरचं ठरलेलं उत्तर आहे ते म्हणजे बदामासारखी गोरी आणि चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ. अनेक लग्नाळू मुलांच्या मनात त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या सौंदर्याची हीच संकल्पना आहे. अर्थात अपवाद असेल पण बायको स्लिम हवी असं म्हणणाऱ्या तरूणांची संख्या जास्त आहे हे नाकारता येणार नाही. मग शरीराने स्थूल असलेल्या कित्येक मुलींना लग्नासाठी नकार येणारच ना. समाजातील हेच वास्तव आता मालिकेच्या निमित्ताने पडद्यावर येणार आहे. जाडीमुळे लग्न ठरत नसलेल्या मुलींशी निगडीत असलेल्या या विषयावर जरी मालिकेची कथा बेतलेली असली तरी बाह्यसौंदर्यापेक्षा मुलीच्या मनाचे सौंदर्य, प्रसंगावधना, एखाद्या संकटात खंबीरपणा दाखवण्याचे कौशल्य यावरही फोकस होणार असल्याचं मालिकेच्या सध्याच्या प्रोमोवरून दिसतय. सौंदर्याची नवी व्याख्या सांगण्यासाठी अक्षया नाईक हा हिंदी मालिकेतील ओळखीचा चेहरा मराठीत पहिल्यांदाच झळकला आहे.
वैशिष्ट्य म्हणजे अक्षया वास्तवातही वजनाने जाड आहे. मालिकेतील भूमिकेसाठी वजन वाढवलेली नायिका म्हणून ती पडद्यावर दाखवण्यात आली नसून खऱ्या आयुष्यातही तिने शरीराच्या जाडीवरून एकाद्या व्यक्तीच्या गुणांकडे डोळेझाक कशी होते याचे छोटेमोठे अनुभव तिनेही घेतले आहेत. त्यामुळेच या मालिकेतून अक्षया खऱ्या अर्थाने सौंदर्याची व्याख्या सांगत असून यानिमित्ताने जाड मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर माझ्या भूमिकेचे सार्थक होईल असे अक्षयाला वाटतेय.
यापूर्वी मराठीमध्ये तृप्ती भोईरचा अगडबंब, प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या जोडगोळीचा वजनदार या सिनेमात शरीराच्या वजनामुळे नात्यावर होणाऱ्या परिणामांची कथा मांडली आहे. तर हिंदीमध्ये भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराना यांनी जाड बायको आणि सडपातळ नवरा यांच्या मिसमॅचपणाचे किस्से पडद्यावर सांगितले. मात्र यामध्ये तृप्ती, प्रिया, सई आणि भूमी यांनी सिनेमांसाठी खरोखर वजन वाढवले होते. पण सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दिसणारी अक्षया ही खऱ्या आयुष्यातही शरीराने वजनदार आहे. अभिनयातील एन्ट्रीसाठी तिलाही सुरूवातीच्या काळात वाढत्या जाडीचा अडसर आला होता. पण ती सांगते, माझ्या अभिनयाच्या ताकदीवर मी शारीरीक वजनावर मात केली. मराठीतील निर्मिती सावंत, विशाखा सुभेदार यांचे शरीरमान त्यांच्या कसदार अभिनयापुढे कुठेच टोचत नाही. खरं तर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव, तिचे विचार याला नात्यामध्ये प्राधान्य असले पाहिजे. पण लग्न जुळवताना, जिथे नवं नातं तयार होणार असतं तिथे मुलगी जाड असेल तर तिच्या गुणांकडे दुर्लक्ष केलं जातं. अक्षयाने जेव्हा ही मालिका स्वीकारली तेव्हा या मालिकेची वन लाइन स्टोरीच तिला इतकी आवडली की खरच सध्या समाजात वैचारीक प्रबोधन होण्याची गरज आहे हे दाखवून देणाऱ्या मालिकेचा भाग व्हायची संधी मी सोडेन कशी अशी तिची प्रतिक्रिया होती.
अक्षयाचा प्रवास या मालिकेच्या निमित्ताने हिंदीकडून मराठीकडे होणार आहे. खरंतर मराठी कलाकार हिंदीतील चांगल्या संधीच्या शोधात असतात पण अक्षया हिंदी मालिकांमध्ये स्थिरावली असतानाही तिने सुंदरा अर्थात पडद्यावरची लतिका साकारण्यासाठी होकार दिला कारण तिला जाड मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे. जाडीवरून शाळकरीवयात, कॉलेजच्या मोरपंखी दिवसात आणि पुढे लग्न ठरवताना मुलींना खूप टोमणे ऐकून घ्यावे लागतात. या विचारसरणीत बदल व्हायचा असेल तर मुलांनी, त्यांच्या कुटुंबियांनी लग्नासाठी मुली शोधताना अपेक्षांच्या यादीतील, मुलगी सडपातळ असावी ही ओळ काढून टाकावी असंही अक्षया सांगते.
अक्षया ही मुंबईची असून तिला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. वयाच्या आठव्या वर्षी अकल्पित या मराठी सिनेमात अक्षयाने काम केले होते. तर ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेतील अनन्याच्या भूमिकेत अक्षया दिसली आहे. लावणी, लोकनृत्यात पारंगत असलेल्या अक्षयाने मयूर वैद्य यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले असून अभिनयासोबत अनेक जाहिराती व व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणूनही अक्षयाचे करिअर सुरू आहे.
- अनुराधा कदम