एक कोल्ड वॉर : अनुराधा पौडवाल विरुद्ध मंगेशकर भगिनी
९० च्या दशकात भक्तिगीते आणि अनुराधा पौडवाल एक अतूट समीकरण बनले होते. टी-सिरीजच्या जवळपास सर्व हीट भक्तिगीते ही अनुराधा पौडवाल यांनीच गायली होती. कॅसेट्च्या कव्हरवरती त्यांचा आणि गुलशन कुमार यांचा फोटो असायचा आणि ती कॅसेट्स हातोहात विकली जात असत. आजही काही भक्तिगीते लोकांच्या तोंडी आहेत आणि धार्मिक कार्यक्रमात वाजवली देखील जातात. पण भक्तिगीते गायच्या आधी अनुराधाजी सिनेमांसाठीसुद्धा प्लेबॅक करायच्या.
सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे त्यांनी लग्न होईपर्यंत फक्त दोनच फिल्म्स पाहिल्या होत्या. राजा हरिश्चंद्र आणि संत तुकाराम. लहानपणी रेडिओवरील लता मंगेशकर यांची गाणी ऐकून त्यांना सुद्धा गायक व्हावेसे वाटायचे. पण त्यांच्या वडिलांचा असा समज होता की, गायक किंवा गायन हे सभ्य लोकांची कामे नाहीत पण आईला गाण्याची आवड होती. अनुराधा पौडवाल यांनी याच कारणामुळे गाण्याचे शात्रोक्त प्रशिक्षण घेतले नाही. त्या जे काही शिकल्या ते सर्व गाणी ऐकून शिकल्या त्या कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमात त्या गायच्या. पण गायन प्रोफेशनली करावे असे त्यांच्या वडिलांच्या शिकवणीमुळे कधी मनात आले नव्हते. अशाच कार्यक्रमात त्यांची भेट अरुण पौडवाल यांच्याशी झाली मग दोघानी लग्न केले. अरुणजी एस डी बर्मन यांना असिस्ट करायचे. (Cold War)
एकदा लता मंगेशकरांच्या रेकॉर्डिंगसाठी अनुराधाजी त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये गेल्या होत्या आणि ते रेकॉर्डिंग संपल्यानंतर अनुराधाजी सहजच ते गाणे गायल्या आणि ते रेकॉर्ड झाले. हे गाणे पुढे रेडिओवरती लावण्यात आले आणि एकाच वेळी बप्पी लहरी, हृदयनाथ मंगेशकर आणि एस.डी.बर्मन यांनी हे गाणे ऐकले. त्यांना हे गाणे इतके आवडले की, त्यांनी अनुराधा पौडवाल यांना प्लेबॅक सिंगिंगसाठी अप्रोच केले आणि त्यांना लाँच करण्याची इच्छा व्यक्त केली पण अनुराधा पौडवाल यांनी त्यांना सांगितले की, मी माझ्या छंदासाठी गाते आणि मला इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छाच नाही.
पुढे जेव्हा ‘अभिमान’ फिल्ममध्ये जया भादुरी यांच्यावर एक श्लोक चित्रित होणार होता आणि त्यासाठी एस.डी. बर्मन यांनी लता मंगेशकर यांना अप्रोच करण्याचे ठरवले होते. त्या दरम्यान त्यांनी अनुराधा पौडवाल यांनी रेडिओ वरती गायलेले गाणे ऐकले आणि त्यांनी अरुण पौडवाल यांना अनुराधा कडूनच हे म्हणून घ्या असे सांगितले. त्या नंतर एवढ्या ऑफर्स आल्या आणि गोष्टी एवढ्या वेगाने घडल्या की अनुराधा पौडवाल यांनाच समजले नाही की त्या कधी प्लेबॅक सिंगर कधी झाल्या.(Cold War)
हळूहळू त्यांची गायलेली गाणी गाजायला चालू झाली. ८० च्या दशकातील ‘हिरो’ फिल्ममधील ‘तू मेरा जानू है’ हे गाणे कमालीचे गाजले आणि त्याने अनुराधा पौडवाल यांना ओळख मिळवून दिली. पुढे ९० च्या दशकात आशिकी, बेटा, तेजाब, सडक अशी एका मागून एक हिट फिल्म्सची गाणी सुद्धा गाजली तर ‘दिल है की मानता नही’ फिल्म मधील गाण्यांसाठी त्यांना ‘बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर’चा फिल्फेअर पुरस्कार मिळला. अनुराधा पौडवाल यांना टी सीरिजने करार बद्ध केले आणि त्यांची सर्व गाणी त्याच गात होत्या. त्यांच्या गाण्यांचा दबदबा असा होता की, लता मंगेशकर यांची रिप्लेसमेंट म्हणून अनुराधाजींचे नाव घेतले जाऊ लागले.
गुलशन कुमार यांच्या एका स्टेटमेंटमुळे या कोल्ड वॉरची सुरुवात झाली ते असे होते की, अनुराधा पौडवाल या पुढच्या लता मंगेशकर बनतील तसेच माधुरी त्यावेळची आघाडीची नटी होती आणि तिचा आवाज होता अनुराधा पौडवाल यांचा. लता मंगेशकर यांच्या ६०च्या दशकापासून असलेल्या सत्तेला एक चांगलेच आव्हान उभे राहिले होते. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये मंगेशकर बहिणी आणि संगीतकार विरुद्ध अनुराधा पौडवाल व जतीन ललित सारखे त्या काळचे नवीन संगीतकार कॅम्पस बनले होते. यात ओ पी नय्यर सारख्या सिनियर संगीतकाराने एकदा असे स्टेटमेंट दिले की आता लता मंगेशकर यांचा काळ संपला आहे. असे बोलले जाते की, या सर्व प्रकारांमुळे मंगेशकर भगिनींनी अलका याज्ञीक यांना सपोर्ट करायला चालू केले होते.(Cold War)
=========
हे देखील वाचा : विद्या बालन : एकेकाळी बॅड लक समजली जाणारी हिरोईन !
=========
या वादाने कळस गाठला जेव्हा आशा भोसले आपल्या सासऱ्यांच्या म्हणजे एस डी बर्मन यांच्या स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंगला गेल्या होत्या आणि तिथे अरुण पौडवाल याना पाहून त्यांनी गायनास नकार दिला आणि जेव्हा अरुण पौडवाल यांना तिथून बाहेर काढण्यात आले तेव्हा अशा भोसले यांनी रेकॉर्डिंग केले. या प्रसंगाने अनुराधा पौडवाल खूप दुखावल्या आणि त्यांनी मग लता मंगेशकर यांच्या एका दिवसात सर्वात जास्त गाणे रेकॉर्ड करण्याच्या विक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे त्या अनेक लोकांच्या निशाण्यावर आल्या आणि त्यांच्या सोबत रेकॉर्डिंग करायला अनेक संगीतकार कचरू लागले. एवढेच नाही तर त्यांनी रेकॉर्ड केलेली अनेक गाणी लताजींच्या आवाजात रीरेकॉर्ड होऊ लागली. उदाहरणार्थ नगिना फिल्म मधील मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले होते पण नंतर आपण जे ऐकतो ते गाणे लताजींच्या आवाजात आहे. अनुराधा पौडवाल यांच्या गुलशन कुमार सोबतच्या अफेयर्सच्या चर्चांना ऊत आला होता आणि अनुराधा पौडवाल यांच्या निवृत्तीपर्यंत हा वार प्रतिवाराचा सिलसिला काही काळ चालूच राहिला.