‘या’ गायकाच्या एका ‘धुंद’ गीताचा रसिला किस्सा !
आज २५ ऑक्टोबर ख्यातनाम गीतकार साहीर लुधियानवी (Saheer Ludhianvi) यांचा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्यांच्या एका गाण्याचा भन्नाट किस्सा. दिग्दर्शक राम माहेश्वरी साठच्या दशकामध्ये एका चित्रपटाची निर्मिती करत होते. या सिनेमाची कथा ख्यातनाम आणि लोकप्रिय लेखक कथाकार गुलशन नंदा यांच्या ‘माधवी’ या कादंबरीवर आधारित होती. या चित्रपटात मीनाकुमारी, धर्मेंद्र, राजकुमार, पद्मिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे नाव होते ‘काजल’. यातील गाणी साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत रवी यांचे होते. साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या अप्रतिम भक्ती गीताने आज देखील रसिकांना भारावून टाकले आहे. आशा भोसले यांच्या स्वरातील हे भक्ती गीत होते, ‘तोरा मन दर्पण कह लाये…’ चित्रपटाचे कथानक खूप भावस्पर्शी होते. मुळात ह्या कादंबरीला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यामुळे यावरील चित्रपटाची देखील रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सिनेमातील एका गाजलेल्या गाण्याचा किस्सा खूप जबरदस्त आहे.
या चित्रपटात एक गाणं होतं मोहम्मद रफी यांनी गायलेलं. राजकुमार यांच्यावर चित्रित झालेल्या या गीताचे बोल होते ‘छू लेने दो नाजुक होठों को…’ वस्तुतः ज्या वेळेला चित्रपटात ही सिच्युएशन राम माहेश्वरी यांनी सांगितली त्यावेळेला इथे खरंतर गाण्याची जागा नव्हती. राजकुमार मीनाकुमारीला दारू पिण्याचा आग्रह करतो त्यावेळेला एक ‘शेर’ त्यांना हवा होता. त्याप्रमाणे त्यांनी साहीर यांना एक शेर लिहायला सांगितले. प्रसंगाचे औचित्य पाहून साहीर यांनी एक शेर लिहिला ‘छु लेने दो नाजुक होठों को कुछ और नही है जाम है ये कुदरत ने हमको जो बक्शां है ये सबसे हसीं इनाम है ये…’ सर्वांना हा शेर खूपच आवडला. (Saheer Ludhianvi)
त्यावेळी योगायोगाने तिथे संगीतकार रवी देखील उपस्थित होते. त्यांना तर हा शेर इतका आवडला की, त्यांनी तिथल्या तिथे दिग्दर्शकाला सांगितले हा इतका चांगला शेर असाच वाया घालवायला नको.आपण याच शेर वरून पुढे एक चांगले गाणे बनवूया. लगेच साहीर साहेबांना बोलावून घेण्यात आले आणि या ‘शेर’ ला जोडून गाणे तयार करण्यास सांगितले. साहीर प्रचंड प्रतिभावंत! त्यांनी लगेच त्यावर गाणे लिहून दिले. आता ज्यावेळी रेकॉर्डिंगची वेळ आली त्यावेळेला रफीने अतिशय अलौकिक स्वरात हे गाणे गायले. खरंतर रफी खुदा का नेक बंदा ! आयुष्यभर त्यांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही पण या गाण्यात त्यांनी जे भाव आपल्या स्वरातून मांडले त्याला तोड नाही. (Saheer Ludhianvi)
==========
हे देखील वाचा : सिंगल स्किन ते मल्टीप्लेक्स पर्यतचा प्रवास
==========
रेकॉर्डिंग झाल्यानंतर सर्वांना हे गाणे प्रचंड आवडले. ज्यावेळी दिग्दर्शक राम माहेश्वरी यांनी हे गाणे डिस्ट्रीब्यूटरला दाखवले त्यावेळेला त्यांना तर प्रचंड आवडलेच पण डिस्ट्रीब्यूटर म्हणाले,”इतके सुंदर गाणे आणि त्याला दोनच कडवी का केली ? अजून एक-दोन कडवी वाढवा ना!” राम माहेश्वरी यांना देखील वाटले की गाणं थोडसं अधुरं वाटतंय आपण आणखी त्यात एक अंतरा वाढवायला पाहिजे. म्हणून त्यांनी पुन्हा साहीर ला बोलावले पाठवले पण साहीर साहेबांचा कुठे पत्ताच लागेना. गावोगावी माणसे पाठवली तर साहिर लुधियानवी (Saheer Ludhianvi) काही सापडले नाही. शेवटी हे गाणे दोन कडव्यांचेच राहिले. पण त्यातील अधुरेपण कमी करण्यासाठी हे गाणे पुन्हा एकदा रेकॉर्ड केले गेले आणि या रेकॉर्डिंग च्या वेळेला रफीने दुसरा अंतरा झाल्यानंतर या पद्धतीने गाणं संपवले आहे की दारू पिल्यानंतर ती व्यक्ती त्या नशेमध्येच धुंद होते आणि तिथे शब्द संपतात…. अशा पद्धतीने गाण्याचा शेवट केल्यामुळे त्या गाण्यातील ‘अधुरेपण’ वाटेल नाही. हे गाणे क्लासिक म्हणून आज देखील प्रचंड लोकप्रिय आहेत. आज पन्नास वर्ष उलटली तरी या गाण्याची खुमारी काही कमी झाली नाही.