रागात लिहिलेले गाणे आज पन्नास वर्षानंतरही लोकप्रिय…
हिंदी सिनेमातील गाण्यांच्या जन्म कथा खूप मनोरंजक असतात. ही गाणी बनताना त्यावेळी खूप नाट्य घडलेली असतात पण जेव्हा ही गाणी रसिकांच्या समोर येतात तेव्हा या गाण्याच्या मिटिंगच्या वेळेसच्या झालेल्या नाट्यमय घडामोडी आठवून कलाकार मनसोक्त हसतात ! असाच काहीसा प्रकार मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिलेल्या एका गाण्याबाबत झाला होता. त्यांनी प्रचंड चिडलेल्या अवस्थेत हे गाणं लिहिलं होतं. निर्मात्यासोबत त्यांचा या वेळी मोठा वाद झाला होता आणि अक्षरशः रागाच्या भरात लिहिलेले हे गाणे त्यांनी निर्मात्याच्या हातात दिले होते पण याच गाण्याने पुढे मोठा इतिहास घडवला. कोणते होते ते गाणे ? कोणता होता तो चित्रपट ? (Popular Song)
१९६९ साली दुलाल गुहा एक टिपिकल फॅमिली ड्रामा दिग्दर्शित करीत होते. चित्रपटाचे निर्माते होते दीनानाथ शास्त्री आणि चित्रपटाचे नाव होते ‘धरती कहे पुकार के’. या सिनेमांमध्ये जितेंद्र ,संजीव कुमार, नंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. या सिनेमांमधील एका गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी निर्मात्याने रेकॉर्डिंग स्टुडिओ भाड्याने घेतला होता आणि त्यासाठी त्यांना ताबडतोब गाणे लिहून हवे होते.(Popular Song)
निर्माते दिनानाथ शास्त्री मजरूह सुलतानपूरी यांच्या घरी स्वत: गेले आणि त्यांना सर्व सिच्युएशन समजावून सांगितले. त्यावर मजरूह सुलतानपूरी म्हणाले,” आज मी प्रचंड बिझी आहे. आज मी एक ओळही आपला लिहून देऊ शकत नाही.” त्यावर निर्माते म्हणाले,” असं करू नका प्लीज. मी आज एक रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केला आहे. संगीतकार तिथे तुमची वाट पाहत आहे. तुम्हाला आता गाणं लिहून द्यायलाच पाहिजे!”
त्यावर मजरूह वैतागून म्हणाले,” तुम्हाला गीतकार म्हणजे काय मशीन वाटला का ? हे क्रियेटीव्ह वर्क आहे. मला या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. तुम्ही मला याची आधी कल्पना का दिली नाही? आता ऐन वेळी कसं काय लिहिणार ?” निर्माता आणि गीतकार यांच्यातील वाढतच गेला. शेवटी दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी मध्यस्थी केली आणि गीतकार मजरूह सुलतानपूरी यांना त्यांच्या बेडरूम मध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी त्यांना परिस्थिती सांगितली.(Popular Song)
“जर आज गाणे रेकॉर्ड झाले नाही तर निर्मात्याचे खूप मोठे नुकसान होईल. निर्माता नवीन आहे. आणि आपल्याला कोणाचे नुकसान करण्याचा अधिकार नाही.” त्यावर मजरूह म्हणाले,” ते सर्व ठीक आहे पण डिसिप्लिन नावाची गोष्ट असते की नाही?” त्यावर दुलाल गुहा म्हणाले ,”आपले सर्व मान्य आहे पण यावेळी आपण त्यांचा विचार करायला हवी.प्लीज.” असे म्हणून त्यांनी दार बाहेरून लावून घेतले.
पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात गीतकार मजरूह सुलतानपूरी यांनी गाणे लिहून तयार केले आणि दाराला आतून टक टक करून ते गाण निर्मात्याच्या हातात दिले आणि दार पुन्हा बंद करून घेतले. त्यांना प्रचंड राग आला होता कारण त्या दिवशी त्यांना करायच्या कामांमध्ये हा व्यत्यय आला होता. पण दिग्दर्शक दुलाल गुहा आणि निर्माते मात्र गाणे हाती पडल्याने खुश झाले होती. बंद दाराकडे बघून त्यांनी आभार मानत ते रेकॉर्डिंग स्टुडिओत पोचले. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी कागदावर नजर फिरवली आणि मनातल्या मनात लगेच त्यांची चाल फायनल केली.(Popular Song)
काही वर्षापूर्वी त्यांनी ‘मिलन’(१९६६) या सिनेमासाठी बनवलेल्या ‘सावन का महिना पवन करे सोर’ ची लोकप्रियता लक्षात घेवून आणि लगेच लता मंगेशकर आणि मुकेश यांना बोलवण्यात आले त्यांना देखील परिस्थिती सांगण्यात आली. एक-दोन रिहर्सल नंतर गाण्याचा फायनल टेक पण झाला. म्हणजे बघा जे गाणं सकाळी जन्माला देखील आलं नव्हतं ते संध्याकाळी रेकॉर्ड देखील झालं. निर्मिती घाईची असली तरी दर्जात कुठेही तडजोड नव्हती. गाण्याचे बोल होते ’जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जयी हो कहां ऐ हजूर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं तुफान लोकप्रिय झाले. आज देखील भारताच्या ग्रामीण भागामध्ये या गाण्याला खूप डिमांड आहे. पिकनिकच्या वेळी अंताक्षरी मध्ये देखील हे गाणं कायम येत असते. ‘धरती कहे पुकार के’ हा चित्रपट २१ जानेवारी १९६९ या दिवशी प्रदर्शित झाला आणि फारसा काही चालला नाही. गाणी मात्र खूप चालली.
=============
हे देखील वाचा : मुमताजमुळे पहलाज निहलानी यांनी दिली जंगी पार्टी
============
आज ’जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जयी हो कहां ऐ हजूर’ हीच एकमेव आठवण या चित्रपटा ची राहिली आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी रागारागात अवघ्या दहा मिनिटात लिहिलेले गाणे मागच्या पन्नास वर्षाहून अधिक काळ लोकप्रिय आहे! स्वत: मजरूह यांनी एका रेडीओ वरील मुलाखतीत हा किस्सा कथन केला होता.