Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

अ सुटेबल बॉय : पन्नासच्या दशकातील वरसंशोधनाचा वेगळाचं प्रवास
मुलगी वयामध्ये आली की, आईवडिलांच्या मागे वरसंशोधनाची घाई सुरु होते. मग नातेवाईकांना सांगा, वधुवरसूचक मंडळामध्ये हजेरी लावा, कुठल्याही लग्न किंवा समारंभामध्ये एखादं सुयोग्य मुलगा दिसला की थेट त्याची चौकशी करा, असे विविध मार्ग तपासले जातात. भारतीय समाजामध्ये हे चित्र वर्षानुवर्षे कायम आहे.

लता मेहरा ही ऐन विशीतली मुलगी. इंग्रजी विषयामध्ये पदवीच शिक्षण पूर्ण करत असताना तिने आपलं आयुष्य पुस्तकं, कविता यांना वाहिलेलं असतं. पुढेमागे शिक्षण झाल्यावर शिक्षिका म्हणून नोकरी करावी असा तिचा विचार असतो. पण लताची आई रूपा मेहरा हीचे मात्र तिच्यासाठी काही वेगळ्याच योजना असतात. लताची मोठी बहीण सविताच नुकतच लग्न झालेलं असतं. त्यामुळे आता लताच्या लग्नाची घंटा तिच्या मनामध्ये वाजत असते. तिच्यासाठीसुद्धा एक ‘सुयोग्य’ मुलगा शोधण्याची गरज रुपाला जाणवू लागते. पण लता मात्र अजूनही लग्नासाठी फारशी उत्सुक नसते. खरतरं एक मुलगी आणि आई यांच्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या वाटांवरची ही सरळसाधी गोष्ट आहे. पण लेखक विक्रम सेठने त्याच्या याचं नावाच्या पुस्तकामध्ये विविध कथांची आणि पात्रांची गुंफण तब्बल १४०० पानांमध्ये केली आहे.
हे वाचलेत का ? परीवॉर : संपत्ती, मालमत्ता, नाती आणि बरच काही…
हे सगळं पडद्यावर साकारण्याचं धाडस दिग्दर्शक मीरा नायर आणि लेखक अँड्र्यु डेविस यांनी केल आहे. ‘प्राईड अँड प्रेजुडिस’पासून ते ‘हाउस ऑफ कार्ड्स’पर्यंत कित्येक गाजलेल्या कलाकृती पडद्यावर साकारण्यामध्ये अँड्र्यु डेविस यांच्या लेखणीचा हातभार लाभलेला आहे.

विक्रम सेठ यांनी १९९३ मध्ये लिहलेल्या या पुस्तकामध्ये त्या काळातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक लोकजीवनाची झलक प्रामुख्याने दिसते. ही गोष्ट आपल्याला थेट १९५० च्या काळामध्ये घेऊन जाते. एकीकडे स्वतंत्र भारतात पहिल्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेले असतात, तर दुसरीकडे जमीनदारांच्या विळख्यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठीचा कायदा घडत असतो.
या सगळ्यामध्ये केवळ आपलं अस्तित्व दाखविण्याच्या धडपडीत कोणी एक नाममात्र राजा मशिदीच्यासमोर मंदिर बांधून हिंदू-मुस्लिम भेदभावाचा विस्तव तेवत ठेवत असतो. हे सगळं होतं असताना रूपाच्या नेतृत्वाखाली लतासाठी वरसंशोधन सुरु असतं. दरम्यान लतालासुद्धा कॉलेजमध्ये कोणी एक आवडू लागतो. त्याचं मधाळ बोलणं, हुशारी, देखणेपणा याच्या प्रेमात ती पडते. तोही तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होतो. पण या सगळ्यात अडथळा असतो, त्याच्या मुसलमान असण्याचा.

तिथे कोलकातामध्ये लताची मोठी वहिनी मिनाक्षी आपला धाकटा भाऊ अमितसाठी तिचा विचार करू लागते. पण आधीच मिनाक्षी आपला थोरला मुलगा अरुणला बोटावर नाचवत असताना तिच्या घरातल्यांशी लताचा संबंध नको म्हणून रुपाला हे स्थळ मंजूर नसतं. पण लता आणि अमितमध्ये लगेचच मैत्री होते. लताचं इंग्रजी साहित्याच अभ्यासक असणं आणि अमितच कवी असणं हा त्यांना जोडणारा मुख्य दुवा असतो.
हेही वाचा : फिरसे…मिर्झापूर
तिसरं स्थळ असतं हरेशच. लखनऊला राहणारा हरेश एका शूज बनविणाऱ्या कारखान्यात व्यवस्थापन पदावर असतो. लहानपणी घरातून पळून गेलेला, स्वतःच्या हिमतीवर लंडनला जाऊन शिक्षण पूर्ण करून भारतात परतलेला हरेश काहीसा एकलकोंडा असतो. पण त्यांच्या वागण्यातील प्रामाणिकपणामुळे तो लता आणि रुपाची मनं जिंकतो. या तिघांमधून कोणाची निवड करायची हा प्रश्न लतासमोर असतो.

या पार्श्वभूमीवर कपूर यांचा धाकटा मुलगा मान आणि सईदा बाई यांचं प्रेम फुलत असतं. चाळीशीतील आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील तवायफ सईदाचं विशीतल्या मानभोवती घुटमळण हे सगळ्यांना खटकायला लागतं. पण त्या दोघांनाही त्याची फिकीर नसते. सिरीजच्या सुरवातीला दिग्दर्शिका मान आणि त्याचा मित्र फिरोज यांचं एकमेकांमध्ये हळुवारपणे गुंतणंसुद्धा अर्धवटपणे रेखाटते.
मीरा नायर यांचा उद्देश एक मिनी सिरीज करायचा होतं. त्या तुलनेने सहा भागाच्या या सिरीजमध्ये हे विस्तृत कथानक मांडताना काही गोष्टी, पात्र सैल सुटणार तर काही ठळकपणे रेखाटली जाणार हे सहाजिकचं आहे. इथेही तेच होतं. जिथे लताचं विश्व बारीकपणे रेखाटल आहे तिथे काही पात्रं अर्धवट रेखाटलेली जाणवत राहतात. कबीरच्या आईची हलकीच झलक सिरीजमध्ये येते पण त्याचं प्रयोजन लक्षात येत नाही. तसचं मिनाक्षीचे विवाहबाह्य संबंध दाखविण्यामध्ये प्रचंड वेळ घालविलेला आहे. एका क्षणाला कबीर, अमित आणि हरेश एकमेकांसमोर येतात. पण तिघांनाही माहिती नसतं की ते लताशी जोडलेले आहेत. हा प्रसंग अजून प्रभावी होऊ शकला असता.

ही सिरीज इंग्रजी भाषेमध्ये बनवलेली आहे. सईदाचं तिच्या हवेलीतील मदतनीसांसोबतचं बोलणं किंवा गावातील निवडक संवाद हे हिंदी किंवा उर्दूमध्ये येतात. त्यामुळे पात्रांमधील संवादामध्ये जिवंतपणा जाणवत नाही. भाषेचा लेहजा, त्याकाळातील प्रचलित बोली ऐकायला मिळत नाही. काही निवडक कलाकार वगळता सगळ्यांनाचं इंग्रजी संवादांमध्ये अभिनयातील सहजता पकडता येत नाही. अर्थात नेटफ्लिक्स हिंदी डबिंगची सोय उपलब्ध करून देतं, पण त्यात कृत्रिमपणा जाणवतो. पण संपूर्ण सिरीज हिंदीमध्ये असती, तर या कथेतील नाजुकपणा अजूनच उठावदार झाला असता. उलट ब्रिटीश पद्धतीची हलकीशी झलक सिरीजमध्ये येते.
लताचं सहजपणे कबीर आणि अमितला चुंबन देणं, विशीतल्या लताचं बिनदिक्कत दारू पिणं किंवा रूपाच्या नवऱ्याचे सुवर्ण पदकं मिनाक्षीने दागिने करण्यासाठी विकल्यावर अरुणने अजिबात दखल न घेणे या बाबी त्याकाळचा भारतीय समाज लक्षात घेता काहीशा खटकतात. पण त्याचं वेळी लता भोवती रंगवलेला ‘लिपस्टिक गर्ल’चा प्रसंग किंवा तिघांच्या निवडीत तिची गोंधळलेली अवस्था सुंदरपणे रेखाटली आहे. सईदा बाईच्या भूमिकेतील तब्बू असो किंवा ईशान खट्टरने रेखाटलेला मान, तान्या मनीकतालाने साकारलेली लता, महिरा कक्कड, राम कपूर सगळ्याच कलाकारांनी त्यांच्या व्यक्तीरेखांमध्ये जीव ओतला आहे.