‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
एक विलक्षण योगायोग -केतन क्षीरसागर
मराठी मालिका, नाटक यातून परिचयाचा झालेला अभिनेता केतन क्षीरसागर. सध्या त्याची ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील मिलिंद ही व्यक्तिरेखा लोकप्रिय होत आहे. केतनला गणपती उत्सवाविषयी विचारल्यावर तो म्हणाला, “मी पुण्याचा आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवांच्या निश्चितचवेगळ्या आठवणी आहेत. मला आठवतंय की लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर पुण्यातील गणपतीच्या दर्शनाला जात होतो. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा हे पुण्यातील पाच मानाचे गणपती आहेत.
पुण्यात या गणपतीचं दर्शन घ्यायचंच अशी परंपरा आहे आणि त्याचप्रमाणे दगडूशेठ गणपती आणि शारदा गणपती यांचे दर्शन देखील घ्यायला जायचं, असा आमचा पूर्वी क्रम असायचा आणि मग रात्रीपासून पहाटेपर्यंत सुद्धा विविध सार्वजनिक गणपतींचे दर्शन घेतले जात होते. लहानपणापासून ताशा आणि ढोल या वाद्यांचे संस्कार नकळत झाले होते. या कला आपसूकच शिकत गेलो.
पुढे अभिनयाच्या क्षेत्रात आल्यावर आम्ही कलाकारांनी ‘कलावंत पथक’ सुरु केलं. सौरभ गोखले, आस्ताद काळे, अनुजा साठे, श्रुती मराठे, मी असे आम्ही अनेक जण दरवर्षी ढोल वादनाची तालीम करत होतो. पुण्यातील गणपती मिरवणुकांत आम्ही कलाकार आमची कला सादर करायचो. काही वेळा आम्ही गणरायांप्रती सेवा म्हणून ही कला सादर करत होतो आणि काही वेळा या कलेतून मिळालेल्या मानधनाचा उपयोग हा पूर्णपणे सामाजिक कार्यासाठी करत होतो.
यावर्षी लॉकडाऊन मुळे ही कला सादर करता येणार नाही, याची खंत वाटते.
यंदाच्या वर्षी माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे. माझ्या लग्नानंतर आम्ही हा गणपती आणत असून आमचे हे पहिले वर्ष आहे. एक योगायोग सांगतो. यंदाच्या वर्षी कसबा गणपती तर्फे एकशे एकवीस कुटुंबाना निवडले गेले होते आणि त्यांना गणेश मूर्ती देण्यात येणार होती. त्याकरिता काहीतरी फॉर्म वगैरे भरायचा होता. दोन दिवसापूर्वी अचानक मी फेसबुक लाईव्ह बघत होतो आणि त्यातून मला हा उपक्रम कळला.
कसबा गणपती मंडळात काही जण माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना मूर्तीबद्दल विचारले, पण तोपर्यंत एकशे एकवीस मूर्ती ज्यांना देणार ते आधीच ठरले होते. मी फक्त त्यांना म्हटले की ठीक आहे, जर काही शक्य झाले तर मला नक्की कळवा. माझ्या मनातील इच्छाशक्ती दांडगी असावी कारण मला तासाभराने फोन आला की एक मूर्ती आहे. ती तुला देता येईल. आणि मला ती मूर्ती मिळाली. आम्ही तीच मूर्ती ठेवली आहे. कारण खरे तर आम्ही मूर्ती आदल्या दिवशी घेणार होतो, म्हणजे आम्ही मूर्तीचे बुकिंग केले नव्हते. अचानक कसबा गणपतीतर्फे मूर्ती मिळणार, हे कळल्याने आम्हाला विलक्षण आनंद झाला. आम्हाला ती मूर्ती मिळाली. बाप्पा आमच्या घरी विराजमान झाला. बाप्पाचे आशीर्वाद असेच सर्वांच्या पाठीशी असुदे, ही प्रार्थना.”