Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Mauli Maharashtrachi कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी !
Mauli Maharashtrachi : पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ एक परंपरा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि एकात्मतेची गाथा आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या वारीसाठी खास स्थान असतं. काहींना प्रत्यक्ष सहभागी होता येतं, काहीजण संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत ही वारी गाठतात, तर अनेकांना इच्छा असूनही प्रत्यक्ष येणं शक्य होत नाही. याच भक्तांच्या मनातील श्रद्धेला आदर देत स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येत आहे ‘माऊली महाराष्ट्राची’ हा अनोखा विशेष कार्यक्रम. (Mauli Maharashtrachi New Show)

या खास कार्यक्रमाच्या वेगळेपणावर प्रकाश टाकताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “विठ्ठल माऊलीची वारी घराघरांत पोहोचवण्याचं सौभाग्य आमच्या वाट्याला येणं ही आमच्यासाठी एक पवित्र जबाबदारी आणि गौरवाची गोष्ट आहे. ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमामध्ये आदेश बांदेकरांसारख्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचा सहभाग असल्यानं, संपूर्ण महाराष्ट्र या भक्तिमय अनुभवात रंगून जाईल, याची आम्हाला खात्री आहे. हे पावन कार्य आम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि सर्व भक्तजनांना मन:पूर्वक अर्पण करत आहोत.”

या कार्यक्रमातील आपल्या सहभागाबाबत आदेश बांदेकर भावनिक झाले. ते म्हणाले, “‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ – ही ओळ माझ्या मनात सध्या नेमकी भावना व्यक्त करते. यापूर्वी वारीचा अनुभव घेतलेला असला, तरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत संपूर्ण वारी प्रत्यक्ष चालत जाण्याचा योग प्रथमच आला – आणि तोही स्टार प्रवाह वाहिनीमुळे. याआधी ‘लक्ष्य’ मालिकेच्या माध्यमातून मला निर्माता होण्याची संधी दिली, आणि आता ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत वारीचा पवित्र अनुभव पोहोचवण्याची जबाबदारी वाहिनीने माझ्यावर सोपवली आहे – ही माझ्यासाठी भक्ती आणि कृतज्ञतेची बाब आहे. या प्रवासात संतांचा संदेश, वारकऱ्यांचे अनुभव, भक्तीची विविध रूपं आणि महाराष्ट्रभर गाजणारा भक्तिरसाचा उत्सव प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. हे कार्य मी संपूर्ण मनापासून स्वीकारलं असून, हे यशस्वी होऊन पांडुरंगाच्या चरणी समर्पित होवो, अशी प्रार्थना माझ्या अंत:करणातून आहे.” (Mauli Maharashtrachi New Show)
================================
हे देखील वाचा: Panchayat Season 4 Release Date: अखेर ‘पंचायत 4’ चा ट्रेलर प्रदर्शित; आता ‘या’ दिवशी होणार प्रीमियर!
================================
‘माऊली महाराष्ट्राची’ हा केवळ एक टीव्ही शो नसून, तो महाराष्ट्राच्या धार्मिक वारशाचा, संत परंपरेचा आणि विशेषतः आषाढी वारीच्या अध्यात्मिक प्रवासाचा जिवंत अनुभव आहे. या कार्यक्रमात प्रत्येक भागामध्ये वारीचे विविध पैलू उलगडले जातील, जे प्रेक्षकांना फक्त माहिती देणार नाहीत, तर त्यांना वारीचा भाग असल्याचा थेट अनुभव देतील. वारीतील दिंड्यांची भक्तिभावाने भरलेली रचना, पायी चालण्यामागील अध्यात्मिक तत्त्वज्ञान, महिला वारकरींचा ठसा, विद्यार्थी आणि नवतरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, पालखीचा बैलरथ, रिंगणाची भक्तीमय उर्जा, माऊलीचा अश्व, तसेच पर्यावरणपूरक वारी, सेवावारी, अन्नदान वारी, कर्तव्यवारी यांसारख्या सामाजिक उपक्रमांचा देखील समावेश या प्रवासात असेल. ‘वारीतले पुंडलिक’, ‘वारीतले लक्ष्मी-नारायण’, ‘बंधूभेट’ यांसारखे हृदयस्पर्शी क्षणही या मालिकेतून उलगडले जातील. या अद्वितीय अनुभवाचं सादरीकरण आदेश बांदेकर करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनातून आणि स्टार प्रवाहच्या माध्यमातून प्रेक्षकांना असं वाटेल की आपणही वारीत सहभागी झालो आहोत, चालत आहोत, विठ्ठलनामाच्या भक्तिरसात चिंब भिजतो आहोत.