साठच्या दशकातील सर्वांग सुंदर रोमँटिक संगीतमय चित्रपट ‘आरजू’
हिंदी सिनेमाच्या इतिहासात ६० चे दशक सप्तरंगात न्हावून निघाले होते. या काळातील चित्रपट हे अधिक रोमँटिक आणि संगीतमय बनत होते. काश्मीरच्या नयनरम्य निसर्गामध्ये चित्रपटाचे शूट करण्याची जणू चढाओढच लागली होती. याच काळातील एक सुपरहिट सिनेमा होता रामानंद सागर यांचा ‘आरजू’! १५ जानेवारी १९६५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा आहे. कारण हा चित्रपट जसा संगीत प्रधान होता तसाच भावनाप्रधान होता. इमोशन्स, म्युझिक, ड्रामा, कॉमेडी याचा व्यवस्थित वापर चित्रपटामध्ये झाला होता. या सिनेमाचे कथानक हॉलीवूड चित्रपट ‘एन अफेअर टू रिमेंबर’ या चित्रपटाच्या कथानकाशी काहीसे मिळतेजुळते होते.
या चित्रपटाची स्टार कास्ट होती राजेंद्र कुमार, साधना, फिरोज खान, नजमा मेहमूद, नाझीर हुसेन, अचला सचदेव, आणि धुमाळ! दिग्दर्शक रामानंद सागर यांना या चित्रपटात फिरोज खानच्या जागी खरंतर धर्मेंद्रला घ्यायचे होते. त्यांनी राजेंद्रकुमार वर ती कामगिरी सोपवली. १९६४ साली धर्मेंद्र सोबत आई मिलन की बेला या चित्रपटात राजेंद्र कुमार काम करत होता. त्याने धर्मेंद्रला ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल विचारले त्यावर धर्मेंद्रने आभार मानत नम्र नकार दिला! धर्मेंद्रचे म्हणणे असे होते की, यापुढे तो सेकंड लीडचे रोल करणार नाही. त्याला आता प्रमुख अभिनेता म्हणून चित्रपटातील मागणी आहे. धर्मेंद्रने नकार दिल्यानंतर रामानंद सागर यांनी या भूमिकेसाठी मनोज कुमार यांचा विचार केला. राजेंद्र कुमार यांनी रामानंद सागर यांना सांगितले,” मी मनोज कुमारला विचारतो कारण त्याचा पहिला सुपरहिट सिनेमा ‘हरियाली और रास्ता’ खरंतर माझ्यामुळेच त्याला मिळाला त्यामुळे तो नकार देणार नाही.” परंतु मनोज कुमारने देखील धर्मेंद्र सारखेच कारण देत चित्रपटाला नकार दिला. आता पुन्हा त्या भूमिकेसाठी नव्या नायकाचा शोध सुरू झाला. त्याकाळी राजेंद्र कुमार मद्रासला एका दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. तिथे त्याने गुरुदत्त माला सिन्हा यांचा ‘बहुरानी’ हा चित्रपट बघितला. या चित्रपटात फिरोज खानची देखील भूमिका होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर फिरोज खान याला ‘आरजू’ सिनेमात घ्यावे असे त्याला वाटले. (बहुरानी या चित्रपटावरूनच १९८१ साली जितेंद्र-हेमा चा ‘ज्योती’ हा चित्रपट बनला होता.) तसेच त्याकाळी राजेंद्र कुमारचा भाऊ नरेश कुमार एक चित्रपट बनवत होता ‘एक सपेरा एक लुटरा’ या सिनेमाचा नायक देखील फिरोज खानच होता. त्यामुळे त्याने त्याला आपल्या घरी बोलावलं आणि या भूमिकेबाबत सांगितले, फिरोज खानने आनंदाने ही भूमिका स्वीकारली. रामानंद सागर यांना मात्र फिरोज खान तितकाच आवडला नव्हता. कारण एक तर तो नवीन होता आणि बी ग्रेड सिनेमा करत होता. परंतु राजेंद्र कुमारने त्यांना आश्वस्त केले आणि चित्रपटाची शूटिंग सुरू झाले. सिनेमाची काही रिळे बनल्यानंतर फिरोज खान यांचा परफॉर्मन्स पाहून रामानंद सागर देखील खुश झाले.
======
हे देखील वाचा : शैलेंद्रने रागाच्या भरात लिहिलेल्या दोन ओळीतून बनलं हे फेमस गाणं!
======
या चित्रपटाचे बव्हंशी चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले आहे. काश्मीरमधील निसर्ग खूप लहरी असतो त्यामुळे त्याच्याशी मिळते जुळते घेऊनच चित्रपटाचे शूटिंग झाले. एकदा या सिनेमाच्या शूटिंगला काश्मीरला भरपूर बर्फवृष्टी होत असल्यामुळे तिथे जाता आले नाही, त्यामुळे तिथल्या विमानतळावरचा शॉट चक्क मराठवाड्यातील औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर घेण्यात आला. तिथे चिकलठाणाच्या जागी श्रीनगर हा बोर्ड लावला गेला आणि आर्टिफिशियल बर्फ टाकून तिथे हा शॉट चित्रित झाला. या चित्रपटांमध्ये रोमँटिक प्रसंग खूप कलात्मक आणि सुंदरतेने रामानंद सागर यांनी चित्रित केले आहेत. काही शॉटमध्ये तर नायक नायिका एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. निसर्गाच्या माध्यमातून ते संवाद साधत असतात. या चित्रपटामध्ये त्यांना लाल रंगाची फुले खूप लागणार होती. एवढी फुले तिथे मिळणे शक्य नव्हते. म्हणून रामानंद सागर यांनी आर्टिफिशल फुले बनवून त्याचा सडा तिथे टाकला आणि शॉट घेतला. त्यावेळी काश्मीर चे मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद सादिक यांनी रामानंद सागर यांना विचारले खरंच या सीजनमध्ये ही फुले (मिरॅक पॉपी फ्लॉवर) नसतात मी फुले तुम्ही आणली कुठून? ते देखील या आर्टिफिशल फुलांना खरे समजून गेले होते. या चित्रपटातील हाईट म्हणजे लता मंगेशकर यांनी गायलेले ‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’ हे गाणे या गाण्यात चिनार वृक्षाचे सुकलेली पाने उडताना दाखवली आहेत. हा सीझन काश्मीरमध्ये फार कमी काळ असतो. त्यामुळे रामानंद सागर यांनी खूप वाट पाहिली. आणि टुरिझम डिपार्टमेंट कडून जेव्हा त्यांना मेसेज आला ताबडतोब साधना ला कॉन्टॅक्ट केले. ती आपली बॅग भरून तयारच होती. ती लगेच काश्मीरला रवाना झाली आणि या गाण्याची शूटिंग झाले.
तसेच या सिनेमातील एक महत्त्वाचा शॉट ज्यामध्ये राजेंद्रकुमार आपल्या अपंगत्वामुळे तिला ओळखत नाही असे सांगतो या इमोशनल शॉट च्या वेळेला रामानंद सागर यांना भरपूर बर्फ पडलेला दाखवायचा होता. या शॉट साठी देखील दिग्दर्शकाने खूप वाट पाहिली आणि ज्यावेळी काश्मीर सरकारकडून त्यांना आदेश आला ताबडतोब तिथे गेले आणि तो शॉट उरकून घेतला हा शॉट उरकत असताना भरपूर स्नो फॉल आणि वादळ होत होते. हा शॉट चित्रित झाला आणि पुढचे चार दिवस त्यांना हॉटेलच्या बाहेर देखील पडता आले नाही इतकी प्रचंड बर्फ वृष्टी तिथे झाली. या सिनेमांमध्ये मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली होती. चित्रपटाला संगीत जरी शंकर जयकिशन यांचे असले तरी त्या काळात ते दोघे वेगवेगळे संगीत देत असत. त्यामुळे या चित्रपटातील सर्व गाणी जयकिशन यांनी संगीतबद्ध केली होती. गाणी हसरत जयपुर यांनी लिहिली होती. आरके च्या बरसात पासून संगीत टीम मध्ये हसरत आणि शैलेंद्र दोघेही असायचे. या दरम्यान फक्त दोन चित्रपटांमध्ये शैलेंद्रचा समावेश नव्हता एक होता १९६० सालचा ‘कॉलेज गर्ल’ आणि १९६५ चा ‘आरजू’. या चित्रपटातील एकच गाणे संगीतकार शंकर यांनी स्वरबद्ध केले होते. ती कव्वाली होती. आशा भोसले आणि मुबारक बेगम यांनी गायलेल्या या कव्वालीचे बोल होते ‘जब इश्क कभी हो जाता है…’ चित्रपटांमध्ये मेहमूद धुमाळ यांनी धमाल आणली होती. विशेषत: मेहमूदने केलेला स्त्री पार्ट तर अफलातून होता. त्याने रंगवलेला मोहब्बत का एक्सपर्ट ममदू आणि त्याचे ते कायमचे ‘या ईला ई दद्रे दिल…’ हे पालुपद मजा आणत होते! चित्रपटाची फटकथा बंदिस्त होती. संवाद खूपच भावस्पर्शी होते. कलावंतांचा अभिनय वरच्या श्रेणीचा होता. त्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला उदंड प्रतिसाद दिला.
साधना या सिनेमात अतिशय सुंदर दिसली होती. तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तिकीट खिडकीवर गर्दी मोठी केली होती. रिपीट रन या सिनेमा पुढची २५ – ३० वर्षे रेग्युलर शोज मध्ये रिलीज होवून आठ –दहा आठवडे हाउसफुल चालत असे. हा सिनेमा संपूर्ण भारतामध्ये प्रचंड यशस्वी झाला त्याच प्रमाणे रशियामध्ये तब्बल अडीचशे प्रिंट द्वारे रिलीज झाला आणि हिट झाला. ताश्कंद फिल्म फेस्टिवल, मास्को चित्रपट महोत्सव इथे हा चित्रपट दाखवण्यात आला.
इतका सुंदर रोमँटिक चित्रपट असून देखील या सिनेमात एकही युगल येत नव्हते याचे कारण त्या काळात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी एकमेकांच्या सोबत गाणे गात नव्हते!