Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

Aarti Movie : कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी बहारों की मंझील राही……
संपूर्णपणे भारतीय संस्कृतीचा जयघोष करीत, उच्च संस्कार मूल्यांना शीर्ष स्थानी ठेवत आणि साधेपणाच्या, सात्विकपणाच्या सर्व कसोट्या पार पाडीत राजश्री प्रॉडक्शन या संस्थेने कायम उत्तमोत्तम चित्रपट दिले. संपूर्ण कुटुंबाने सिनेमाचा एकत्रित आस्वाद घेत भारतीय समाजजीवनाला भिडणारे साधे साधे पण मूलभूत प्रश्न आणि त्याची सुलभ उत्तरे त्यांनी सिनेमातून दिली. राजश्री प्रॉडक्शन या चित्रसंस्थेचा पहिला चित्रपट होता ‘आरती’. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सिनेमाच्या इतिहासात नवा अध्याय सुरू केला. तोवर केवळ वितरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेने चित्रनिर्मितीचा शुभारंभ करताना काही गोष्टी मनाशी ठळकपणे ठरवून ठेवल्या होत्या. ‘complete family entertainment’ हे तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगिकारले. ’आरती’ चित्रपटाचे दिग्दर्शन फणी मुजुमदार यांचे होते. (Bollywood Movie)

चित्रपटाची कथा साधीच पण काळजात घर करणारी होती. रूढार्थाने याला प्रेमाचा त्रिकोण ही म्हणता येणार नाही. इथे नात्यातील उत्कटता आहे, प्रेम आहे, द्वेष आहे. आरती (मीना कुमारी) डॉक्टर असते आणि रुग्णांची सेवा हा तिचा धर्म असतो. प्रकाश (अशोक कुमार) हा देखील डॉक्टर असतो आणि मनोमन आरतीवर प्रेम करीत असतो. सेवा वगैरे या गोष्टी त्याच्याकरिता गैर लागू असतात. पैसा कमविणे हाचत्याचा एकमेव उद्देश असतो. एकदा दीपक (प्रदीप कुमार) आरतीला जीवघेण्या संकटातून वाचवितो. दीपक एक बेरोजगार युवक असतो. आरतीचा प्राण वाचविल्यावर ती दोघे एकत्र येतात आणि प्रेमात पडतात आणि विवाह बंधनात अडकतात. आता आरती दीपकच्या घरी रहायला येते. इथे अठराविश्वे दारीद्र्य असते. कमालीची उदासीनता असते. तिची मोठी जाऊ (शशिकला) , तिची तीन मुले,नवरयाची एक विधवा बहिण, दीर (रमेश देव) आणि सासरे (गजानन जागीरदार) या सर्वांच्या गदारोळात ती रहायला येते. भांडकुदळ जाऊचे टोमणे ऐकत ती निरपेक्षपणे घराची सेवा करू लागते. (Entertainment News)

घरात प्रत्येक क्षणाला अपमान, गरीबी,अवहेलना,वंचना याला ती तोंड देत रहाते. एक गोष्ट बरी घडते ती घरात आल्यावर लगेच दीपक ला नोकरी मिळते. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जावू नये म्हणून स्वत:च्या वैद्यकीय सेवेचा त्याग करते. कुटुंबाकरीता झिजणे चालू असते. प्रकाशला अर्थातच हे आवडत नाही. त्याच्या डोक्यातून आरती अद्याप गेलेली नसते. कहाणीला वेगळी दिशा मिळते. एकदा दीपकचा मोठा अपघात होतो आणि नेमकं तो प्रकाशच्या दवाखान्यात दाखल होतो. प्रकाश त्याच्यावर उपचार करायला नकार देतो. आरती प्रकाश पुढे पतीच्या आयुष्याची भीक मागते. रडते. वारंवार विनवणी करते. प्रकाशच्या मनातील सूडाग्नी कायम असतो तो आरती ला विचित्र अट घालतो. दीपकला बरे केल्यानंतर तिला प्रकाश कडे यावे लागेल. आरती पुढे पेच निर्माण होतो. प्रेम की कर्तव्य या भोवऱ्यात ती सापडते. शेवट अर्थातच भारतीय संस्कृतीच्या विजयाच्या इमोशनल नोट वर संपतो.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे मीना कुमारीचा दमदार अभिनय. अशा भूमिकांचा तिचा हातखंडाच होता. त्या वर्षीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची तीनही नामांकने तिलाच मिळाली होती. आरती, मै चूप रहूंगी आणि साहिब बिवी और गुलाम या चित्रपटासाठी. तिला पुरस्कार मात्र साहिब बीवीच्या ‘छोटी बहु’ करीता मिळाला. शशीकलाने रंगवलेली कजाग स्त्री तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळवून गेली. अशोक कुमारने रंगवलेली व्हीलनिश ग्रे शेडची भूमिका जबरदस्त होती. प्रदीप कुमार ठोकळेबाज अभिनयासाठी प्रसिध्द होता ती भूमिका त्याने इथेही निभावली. अन्य भूमिकेत महमूद, राजेंद्रनाथ,आणि केश्तो होते. प्रफुल्ल देसाई यांच्या कथेतच भरपूर नाट्य होते आणि विश्व मित्र आदिल यांची अप्रतिम पटकथा आणि संवाद भावोत्कट होते. चित्रपटाचे संगीत खूपच अप्रतिम होते. बार बार तोहे क्या समझाये, अब क्या मिसाल दु मै तुम्हारे शबाब की, कही तो मिलेगी कभी तो मिलेगी बहारोकी मंझील राही,आपने याद दिलाया तो मुझे याद आया हि रफी आणि लताने गायलेली गाणी मजरूहची होती तर त्याला संगीत रोशनचे होते.बिनाका गीत मालामध्ये यातील गीतांनी मोठी धूम मचवली होती.
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहत जगण्याची नवी उमेद देणारा हा चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतला. ‘दूर है लेकीन दूर नही है सितारोंकी महफिल राही’ हा आशावाद प्रेक्षकांना कमालीचा आवडून गेला. आज इतक्या वर्षानंतर हा चित्रपट पाहताना कृष्ण धवल असला तरी त्यातील साध्या सरळ आणि काळजाला भिडणाऱ्या मांडणीने मनाला भिडतो. निर्माते ताराचंद बडजात्या आणि दिग्दर्शक फनी मुजुमदार यांचे हे मोठे यश होते. राजश्रीच्या या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना आपलेसे केले आणि या चित्र संस्थेची यशाची घोड दौड सुरू झाली.