आर्या म्हणजे गाणं आणि सौदर्य यांचा सुंदर संगम…
स्टेजवर गाणं चालू असतं… कधी हे श्याम सुंदर राजसा… तर कधी अवघा रंग एक झाला…म्हणत तमाम प्रेक्षकांना आपल्या सूरांच्या रंगात रंगवून जाते. मग या तल्लीन झालेल्या प्रेक्षकांना बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल म्हणत साक्षात विठ्ठलाचा अनुभव करुन देते. ही ती म्हणजे आपली सर्वांचीच लाडकी आर्या आंबेकर. सारेगमप लिटील चॅम्प्सच्या माध्यमातून आर्या तमाम मराठी जनांच्या घरातीलच एक झाली. तिच्या सुरांच्या जादूनं तिनं सर्वांनाच आपलंस केलं…
आर्या म्हणजे गाणं आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम…ती गात असतांना जेवढं ऐकत रहावं असं वाटतं. तेवढंच तीचं सोज्वळ रुप पहात रहावं असही वाटतं…आर्या आपल्या सर्वांच्या ह्दयात बसली ते झी मराठीच्या सारेगमपच्या माध्यमातून. अनेक स्पर्धकांना मागे टाकत आर्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये सामिल झाली, तेव्हाच ती विजयी झाली होती. या लिटील चॅम्प्सचं उपविजेतेपद तिला मिळालं. आणि गाण्याच्या दुनियेला एक सुरेल आणि सुरेख व्यक्तीमत्व मिळालं.
मला म्हणत्यात हो पुण्याची मैना हे गाणं ठसक्यात गाणारी आर्या मूळ नागपूरची असली तरी तिचं सर्व शिक्षण पुण्यात झालं. तिचे वडील समीर आंबेकर डॉक्टर. तर आई श्रुती आंबेकर या गायिका आर्यांची आजीही शास्त्रीय गायिका. आर्याला अगदी बालवयातच आई आणि आजीकडून संगिताची शिकवणी मिळाली. साडेपाच वर्षाची आर्या आईकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत असे. याचा परिणाम असा झाला की सहाव्या वर्षी तिने संगिताची पहिली परीक्षा दिली. आर्या आंतरशालेय गाण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. शाळेतल्या स्पर्धात विजयी होणा-या आर्याला मग सारेगमपमध्ये संधी मिळाली. आर्याने शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत, मराठी चित्रपट संगीत, लावणी, लोक-गीते या सर्व शैलीतील गाणी सारेगमप मध्ये सादर केली. तिने प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या समोर सादर केलेले पान खाये सैंया हमारो हे गाणं सर्वाधिक लोकप्रिय ठरलं. याच दरम्यान आर्याला माणिक वर्मा शिष्यवृत्ती देण्यात आली.
सारेगमप नंतर आर्याकडे संगीतकारांची गाण्यांसाठी रांग लागली. तिने अनेक मराठी आणि हिंदी अल्बममध्ये गाणी गायली. चित्रपट आणि नाटकांसाठीही आर्यानं गाणी गायली आहेत. याशिवाय “ती सध्या काय करते” या चित्रपटातून आर्यांनं आपण फक्त गाण्यात नाही तर अभिनयातही सरस असल्याचं दाखवून दिलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. शिवाय ह्दयात वाजे समथिंग हे तिने गायलेले गाणंही चांगलंच लोकप्रिय झालं.
आर्यानं गर्जती सह्याद्रीचे कडे, जय हरी विठ्ठल,मराठी अभिमान, आठवा स्वर, मला म्हणत्यात आर्या आंबेकर, खाऊचा भाव, हम और तुम, आनंदवन आले घरी, माझ्या मातीचे गान या अल्बममध्ये गाणं गायलं आहे. याशिवाय लेटस गो बॅक, बालगंधर्व, रमा माधव, योद्धा, संत कैकडी महाराज, गोष्ट तिच्या प्रेमाची, रेडी मिक्स या चित्रपटातही आर्यानं गाणं गायलं आहे. सुवासिनी, दिल दोस्ती दुनियादारी, तुला पाहते रे, जीवलगा यासारख्या मालिकांची पार्श्वगायिका म्हणूनही आर्या ओळखली जाते.
कळी या चित्रपटाचीही आर्या ही पार्श्वगायिका आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून श्रीनिवास खळे यांनी काम केले आहे. खळे काका यांनी आत्तापर्यंत नव्याण्णव गायिकांना संधी दिली आहे. आर्या ही कळी या चित्रपटाच्या माध्यमातून शंभरावी गायिका ठरली. त्यामुळे खळेकाकांच्या हस्ते तिचा खास सत्कारही करण्यात आला होता.
या गुणी गायिकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हरिभाऊ साने पुरस्कार, पुण्यरत्न युवा गौरव पुरस्कार, यंग अचिवर्स पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, झी चित्रगौरव पुरस्कार, सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार आदींचा समावेश आहे.
आर्या आंबेकर गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आहे. गाण्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असलेली ही गायिका आपल्या सरावाला मात्र कधीही सुट्टी देत नाही. आर्याची कारकीर्द बहरत जातेय ती अशीच बहरावी अशीच तिला सदिच्छा…