
Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज व्हा!
‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाने गेल्या तीन पर्वांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. रोजच्या धकाधकीच्या जीवनात हास्याचा हसरा शिडकावा करणारा हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातही तितक्याच आवडीने पाहिला जातो. प्रेक्षकांचं हे भरभरून मिळालेलं प्रेम आता चौथ्या पर्वाच्या माध्यमातून अधिक जोशात आणि नव्या ढंगात परत येत आहे. या नव्या पर्वाची सुरुवात ९ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर होणार आहे. (Aata Hou De Dhingaana 4 )

प्रत्येक पर्वात काहीतरी वेगळं, नविन देण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न राहिलाय आणि यंदा ते प्रेक्षकांना घेऊन येत आहेत एका अद्भुत थीमपार्कच्या सफरीवर. जिथे मनोरंजन, मस्ती आणि उत्साह यांचा झणझणीत फटाका उडणार आहे! पूर्वी गाजलेल्या फेऱ्या स्मायली काय गायली, धुऊन टाक, गोरी गोरी पान या प्रेक्षकांच्या आवडत्या राऊंड्स यंदाही नव्या ट्विस्टसह परतणार आहेत. यासोबतच अनेक अतरंगी, धम्माल आणि भन्नाट नव्या फेऱ्याही प्रेक्षकांच्या मनोरंजनाची रंगत वाढवणार आहेत.या पर्वाचं खास आकर्षण ठरणार आहे गेल्या तिन्ही पर्वात सर्वाधिक गाजलेली आणि गाजवलेली फेरी ‘साडे माडे शिंतोडे’ ज्याचं भव्यदिव्य रूप यंदा अजूनच धुमधडाक्यात पाहायला मिळणार आहे.

सर्वांचा लाडका, एनर्जेटिक होस्ट सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा त्याच खास शैलीत, त्याच उत्साहात आणि दणक्यात परततोय. चौथ्या पर्वाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणतो,”तुमचा कार्यक्रम कधी बंद होणार यापेक्षा तो कधी सुरू होतोय याची प्रेक्षक विचारणा करतात, तेच खरं यश असतं. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या चौथ्या पर्वाचा भाग होणं, हे माझ्यासाठी प्रचंड आनंददायक आणि अभिमानास्पद आहे.” यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना केवळ राउंड्स नाहीत, तर कलाकारांच्या पडद्यामागच्या गंमतीजमती, दोन मालिकांच्या टीममधल्या गमतीशीर संगीत स्पर्धा आणि भन्नाट टास्क्स अनुभवता येणार आहेत.
===============================
हे देखील वाचा: Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !
===============================
स्टार प्रवाहच्या लोकप्रिय कलाकारांसह आणि सिद्धार्थच्या सळसळत्या जोशात सज्ज झालेलं हे चौथं पर्व, प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. “१००% धमाल, १००% मनोरंजन” याची हमी देणारा ‘आता होऊ दे धिंगाणा ४’ ९ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.