Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Abhanga Repost: गणेशोत्सवानिमित्त ‘अभंग रिपोस्ट’ ची मैफल आता टीव्हीवरही अनुभवता येणार; पाहा कुठे आणि कधी?
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात अवघा महाराष्ट्र रंगून जातो. शहर असो की गाव, गल्लीपासून ते मंचांपर्यंत सगळीकडेच एक वेगळीच चैतन्याची लहर उसळते. जणू दरवर्षी नव्याने आलेला बाप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन येतो. आणि अशा या पावन पर्वाचं औचित्य साधून ‘सन मराठी’ या वर्षी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक खास गणेशोत्सव विशेष कार्यक्रम-‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’. (Abhanga Repost Band)

गणेशोत्सवाचे आगमन होताच वातावरणात भक्तिमयतेची, मंगलतेची आणि सर्जनशीलतेची एक सुंदर सरमिसळ अनुभवायला मिळते. ‘सन मराठी’ने यंदा हे सर्व एकत्र गुंफत प्रेक्षकांसाठी एक असामान्य सांस्कृतिक मेजवानी उभी केली आहे. या विशेष कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची सादरीकरणं. त्यांच्या आवाजातील गूढ भक्तिभाव आणि शुद्धतेचा अनुभव प्रेक्षकांना अगदी थेट मनापर्यंत पोहोचणारा ठरणार आहे. त्याचसोबत सध्या युवा वर्गात लोकप्रिय ठरलेला ‘अभंग रिपोस्ट’ हा ग्रुप कार्यक्रमात एक नवे चैतन्य घेऊन येणार आहे. पारंपरिक अभंगांना आधुनिक वाद्यसंगतीची साथ देत हे कलाकार अभंगांना आजच्या पिढीशी अधिक जोडून देतात. त्यांच्या या सादरीकरणामुळे प्राचीन भक्तिसंगीत आणि आजचं आधुनिक संगीत यांचा अप्रतिम संगम अनुभवता येईल.

याच कार्यक्रमात ‘सन मराठी’ कुटुंबातील सर्व मालिकांतील लाडके कलाकार एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांनी सादर केलेले खास नृत्य, गायन, नाट्य आणि मजेशीर खेळ, गमतींचे सत्र हे कार्यक्रमात रंगत आणतील. हे केवळ परफॉर्मन्स नाहीत, तर गणरायाच्या चरणी अर्पण केलेलं कलाकारांचं प्रेम, श्रद्धा आणि आनंद आहे. प्रेक्षकांनाही हे क्षण एक वेगळा ऊर्जा आणि आनंद देऊन जाणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, महाजनवाडी, मीरा रोड येथे मोठ्या थाटात पार पडला. हा प्रवेश विनामूल्य होता, मात्र जागा मर्यादित असल्यामुळे ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व’ तत्त्वावर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाची बातमी किंवा फोटो ‘पास‘ म्हणून दाखवूनही अनेकांनी सहभाग नोंदवला.(Abhanga Repost Band)
=======================================
हे देखील वाचा: Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !
=======================================
‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ हा कार्यक्रम म्हणजे भक्ती, संगीत, रंगमंचीय सौंदर्य, कलाकारांचा जल्लोष आणि गणेशभक्तांच्या प्रेमाचा एकत्रित सोहळा. प्रेक्षकांसाठी ही एक खास गणेशोत्सवाची ट्रीट ठरणार असून, २७ ऑगस्टच्या आसपास हा कार्यक्रम ‘सन मराठी’वर प्रसारित होणार आहे. तेव्हा आपणही या भक्तिपूर्ण उत्सवाचा भाग व्हायला विसरू नका.