अभिषेक बच्चन- उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असणारा शांत अभिनेता
अभिषेक बच्चन! याची इंडस्ट्रीमधली पहिली ओळख म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा. अभिषेकने करीना कपूर सोबतच्या रिफ्युजी या चित्रपटापासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला.
करीनाचाही हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. असं असूनही करीनाच्या वाट्याला कौतुक आलं. परंतु, अभिषेक मात्र उपेक्षितच राहिला. त्याला अभिनय जमत नाही, तो नुसताच ठोकळा आहे, वगैरे टीका त्याच्यावर होऊ लागली. पण अभिषेक शांत होता आणि शांतच राहिला.
त्यावेळी त्याला सर्वात जास्त स्पर्धा होती ती हृतिक रोशनची. रेफ्यूजीच्या काही महिने आधी आलेला ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि हृतिक त्यावेळच्या लाखो करोडो मुलींच्या दिल की धडकन बनला होता. त्यानंतर आलेल्या फिजा व मिशन काश्मीर या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले. पण अभिषेकच्या माथ्यावर मात्र ‘स्टारकिड’ हा शिक्का कायम राहिला होता. स्पर्धेत हृतिक खूप पुढे निघून गेला होता.
अभिषेकच्या २००० साली आलेल्या रिफ्युजीनंतर तेरा जादू चल गया, ढाई अक्षर प्रेम के, बस इतना सा ख्वाब है, हा मैने भी प्यार किया है, ओम जय जगदीश, शरारत, असे एकामागून एक फ्लॉप चित्रपटांची शृंखलाच सुरु झाली. अगदी हृतिक आणि करीना सोबतचा ‘मैं प्रेम की दिवानी हू’ देखील फारसा यशस्वी झाला नाही.
अभिषेक बच्चन म्हणजे एक फ्लॉप अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण होत असतानाच २००४ साली आलेल्या धूम आणि युवा चित्रपटांमधून त्याच्यामधील अभिनेत्याचे दर्शन घडले. युवा (२००४), सरकार (२००५) आणि कभी अलविदा ना कहना (२००६) या चित्रपटांसाठी सलग तीन वर्ष त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. सलग ३ फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारा दिलीपकुमार नंतरचा तो दुसरा अभिनेता आहे.
एकीकडे अभिषेकचं फिल्मी करिअर आकार घेत होतं. तर दुसरीकडे करिष्मा कपूर, राणी मुखर्जी अशा आघाडीच्या अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं जात होतं. पुढे २००७ मध्ये, मणिरत्नमच्या गुरू या चित्रपटामध्ये एक प्रगल्भ अभिनेता म्हणून त्याचं दर्शन घडलं. या चित्रपटासोबतच त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या नात्यांबद्दल चर्चा रंगू लागल्या.
आधीच ‘अमिताभचा मुलगा’ या ओझ्याखाली दबून गेलेल्या अभिषेकच्या आयुष्यात ‘ऐश्वर्याचा पती’ ही अजून एक ओळख निर्माण झाली. पण तरीही तो शांत राहिला. तसं बघायला गेलं तर ऐश्वर्याची ओळख ‘प्रगल्भ अभिनेत्री’ अशी कधीच नव्हती. पण ती मिस वर्ल्ड होती आणि मुख्य म्हणजे त्यावेळेला ती नंबर १ ची अभिनेत्री समजली जात असे. आणि बॉलिवूडमध्ये नंबर १ ची जागा प्रचंड महत्त्वाची समजली जाते. पण अभिषेक ना त्या जागी कधी पोचला, ना त्या जागेसाठीच्या शर्यतीत कधी होता. परंतु, त्याच्या आयुष्यातल्या तीन महत्त्वाच्या माणसांनी (अमिताभ, जया आणि ऐश्वर्या) हे पद उपभोगलं होतं. या तिघांच्या यशाच्या वटवृक्षाच्या पसाऱ्यात अभिषेक नावाच्या रोपट्याकडे सर्वानी नेहमीच दुर्लक्ष केलं.
अभिषेकने धूम आणि सरकार चित्रपटाचे सिक्वल, दोस्ताना, हॅप्पी न्यू इअर अशा चित्रपटांमधून काम करत असतानाच अगदी अलीकडच्या ‘ब्रिथ इन टू द शॅडो या वेबसिरीजद्वारे त्याने ओटीटीच्या विश्वातही पाऊल ठेवलं. या वेबसिरीजमधील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं.
अलीकडेच आलेल्या ‘बिग बुल’ चित्रपटातही त्याने हर्षद मेहतांची भूमिका साकारली होती. परंतु, दुर्दैवाने आधी आलेल्या स्कॅम ९२ वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताच्या भूमिकेतल्या प्रतीक गांधीला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. त्याची जागा दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला मिळणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळेच अभिषेकने साकारलेला हर्षद मेहता प्रेक्षकांनी नाकारला.
अमिताभचा मुलगा किंवा ऐश्वर्याचा पती यापलीकडे जाऊन अभिषेकने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो काही प्रमाणात यशस्वीही झाला आहे. परंतु, त्याचं वेगळं अस्तित्व स्वीकारायला प्रेक्षक मनापासून तयार नाहीत.
एक व्यक्ती म्हणून अभिषेक अत्यंत प्रामाणिक आहे. आजवर कधीच कुठल्या कॉंट्रोव्हर्सीमध्ये तो अडकला नव्हता. प्रचंड हुशार असणाऱ्या अभिषेकचा सेन्स ऑफ हुमर अत्यंत चांगला आहे.
====
हे देखील वाचा: भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?
====
मध्यंतरी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याला एका विदेशी पत्रकाराने इंटरव्ह्यूमध्ये एक प्रश्न विचारला. तो प्रश्न म्हणजे, “तुम्ही एकत्र कुटुंबात राहता मग तुम्ही तुमचं आयुष्य मॅनेज कसं करता?”
यावर निरुत्तर झालेल्या ऐश्वर्याने अभिषेककडे बघितलं. अभिषेकने त्या पत्रकाराला विचारले, “तुम्ही एकत्र कुटुंबात राहता का? यावर त्या पत्रकाराने ‘नाही’ असं उत्तर दिल्यावर अभिषेकने विचारलं, “मग तुम्ही तुमचं आयुष्य मॅनेज कसं करता?” या उत्तराने अभिषेकने तमाम भारतीयांची मने जिंकली.
====
हे देखील वाचा: Bollywood Upcoming Releases: एप्रिल महिन्यात मनोरंजनाची मेजवानी
====
अभिषेक बच्चन बद्दल एवढं सगळं आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच दसवी या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं आहे. ते बघून चित्रपटाबद्दल तर उत्सुकता निर्माण झाली आहेच. शिवाय, यामध्ये अभिषेक एका वेगळ्याच भूमिकेत दिसतोय. ट्रेलर पाहून तरी प्रेक्षकांच्या चित्रपट आणि अभिषेककडून असणाऱ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. अर्थात हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय की नाही, हे येणारा काळच ठरवेल.