‘अच्छा तो हम चलते है’ ह्या गाण्याची जन्मकथा मोठी गमतीशीर आहे!
सत्तर आणि ऐंशीचे दशक गाजविणारा ’सर्वात यशस्वी गीतकार’ कोण असा प्रश्न जर कुणी विचारला तर उत्तर आनंद बक्षी हेच येईल! दिग्गज नायक, मोठे बॅनर्स आणि हुकमी दिग्दर्शक यांच्या सोबत कायम आनंद बक्षी असायचे. राजेश खन्ना, अमिताभ यांची कारकिर्द घडविण्यात यांचा मोठा वाटा होता. अर्थात मोठ्या संख्येने गाणी लिहित असल्याने त्यांना व्यावसायिक तडजोडी बर्याचदा कराव्या लागल्या. त्यांनी सहाशे सिनेमातून तीन हजाराहून अधिक गाणी लिहीली.
त्यांच्या एका गाण्याची जन्म कथा फारच मनोरंजक आहे. सिनेमा होता राजेश खन्ना-आशा पारेखचा ’आन मिलो सजना’ (१९७०). यातील नायक नायिकांच्या भेटीच्या सिच्युएशन वर गाण लिहायचं होतं. गाणं लिहायला बसले खरे पण काही शब्द सुचेनात. लक्ष्मीकांत – प्यारेलाल एका नंतर एक धुन वाजवित होते. पण कधी मीटर नुसार शब्द येत नव्हते तर कधी शब्दांना सूर गवसत नव्हते. शेवटी कंटाळून सर्व जण ऊठू लागले. उठता उठता लक्ष्मीकांत म्हाणाले ’अच्छा तो हम चलते है..’ आनंद बक्षी यांनी विचारले ’फिर कब मिलोगे?’ प्यारेलाल उत्तरले ’कल सुबह एक रेकॉर्डींग है.. कल नही तो परसो’ बस्स झालं याच संवादाचा आधार घेत गीतकाराने तिथल्या तिथे गाण्याचा मुखडा बनवला. गाणं असचं पुढे सवाल जवाबातून तयार झालं. नायिका आपल्या प्रेमाची कबुली या गीतात देवून टाकते व आपले घरवाले सुद्धा लग्नाला तयार आहेत हे सांगते. या गाण्याच्या चित्रीकरणात देखील गीतकार आनंद बक्षी दिसतात. यात जेंव्हा आशा पारेख ला राजेश खन्ना विचारतो ‘किसीने देखा तो नही तुम्हे आते?’ त्या वेळी तीन चार जण बागेत फिरताना दाखवले आहेत त्या पैकी एक आनंद बक्षी आहेत. या गाण्याची लोकप्रियता एवढी होती की १९७१ च्या बिनाका गीतमाला वार्षिक कार्यक्रमात हे चक्क दुसर्या क्रमांकावर होत. २४ डिसेंबर १९७० ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा गोल्डन ज्युबिली हिट ठरला.