महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ ‘अशोक मा.मा.’ च्या निमित्ताने छोटा पडदा
आपल्या मूळ नावापेक्षा भूमिकेतील नावानं अभिजीतला जास्त ओळखलं जातं.
गॅरी. या नावाबरोबर आठवतो तो गुरुनाथ सुभेदार. माझ्या नव-याची बायको, या मालिकेतून घरोघरी पोहचलेला गुरुनाथ ठाकूर म्हणजेच अभिजीत खांडकेकर. पक्का नाशिककर असलेला अभिजीत वादविवाद स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून अभिनयाच्या वाटेवर आला. महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी च्या स्पर्धेतून त्याचा चेहरा परिचित झाला. माझीया प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून रोमँटिक हिरो म्हणून पसंतीस आला. माझ्या नव-याची बायको या मालिकेतल्या त्याच्या गुरुनाथनं कमाल केली. आज तमाम महाराष्ट्रात त्याची गुरुनाथ सुभेदार ही ओळख झाली आहे.
नाशिकच्या बी.वाय.के कॉलेजमधून अभिजीतनं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. नाशिकचा कॉलेजरोड म्हणजे एक उत्साहाचं वातावरण. वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाचे चोवीस तास हा कॉलेजरोड गजबजलेला असतो. नाशिकमधली सर्व कॉलेज या रस्त्यावर आहेत. या कॉलेजचा कॅम्पस ही नितांत सुंदर. अशा ठिकाणी अभिजीत जेव्हा पहिल्यांदा दाखल झाला, तेव्हा थोडा बुजलेला होता. कारण त्याचं सर्व शिक्षण मराठी माध्यामातून झालेलं. आता यापुढे सर्व शिक्षण इंग्रजीतून घ्यायचंय आणि कॉलेज कॅम्पस यांची भीती त्याच्या मनात होती. पण काही महिन्यात अभिजीत एवढा सरावला की वर्गात कमी कॅम्पसमध्ये अधिक दिसायचा. त्याच्या मित्रांचा अड्डा जमायचा. पण या मित्रांच्या टोळक्यानं अभिजीतमधला अभिनेता शोधला. बी.वाय.के कॉलेजनं अभिजीतला अभिनयाचा प्रवास खुला केला.
त्यांनी नाशिकच्या स्वप्नगंध या संस्थेसोबत पहिलं नाटक केलं. हे नाटक मराठी राज्यनाटय़ स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिलं आलं. यातून अभिजीतचा उत्साह वाढला. मग त्यानं पु.ल करंडक,सकाळ करंडक,अल्फा करंडक या स्पर्धांमध्ये भाग घेतला. अल्फा करंडकसाठी एक एकांकिका तर त्याने दिग्दर्शित केली होती. वादविवाद स्पर्धांमध्ये तो चमकू लागला. कॉलेजमध्ये पार्किंग एरियामध्ये गप्पा मारत असताना एका मित्रानं बाजूच्या कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा सुरु असल्याचे सांगितले. अभिजीत ते ऐकल्यावर ही स्पर्धा बघायला गेला. आणि त्यात सहभागी होऊन जिंकून आला होता. मिस्टर बी.वाय.के स्पर्धेचं विजेतेपद सलग तीन वर्षे अभिजीतच्या नावावर होतं. यातून त्याला नाशिक मधील स्थानिक न्यूज चॅनेलमध्ये वृत्त निवेदकाची संधी मिळाली. कॉलेज संभाळून अभिजीत हे निवेदकाचं काम करत असे. अभिजीतच्या म्हणण्यानुसार तो बऱ्याच वेळा लेक्चर बंक मारायचा. त्यामुळे त्याचे शिक्षक नाराज असायचे, पण निवेदक झाल्यानं त्याचा चेहरा परिचीत झाला. याचा परिणाम म्हणून शिक्षकांची नाराजी दूर झाली.
पदवीनंतर अभिजीत पुण्याला आला. पुणे विद्यापीठातून त्याने मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुण्यातच रेडीओ जॉकी म्हणून काम करु लागला. पुण्यात असतांनाच महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेची घोषणा झाली. अभिजीतसाठी ही मोठी संधी होती. त्याने गमभन या एकांकिकेमधला एक प्रसंग या स्पर्धेच्या ऑडीशनला सादर केला होता. अर्थात त्याची निवड झाली.
महाराष्ट्राचा सुपरस्टार हा मंच म्हणजे नवोदीत कलाकारांसाठी मोठी देणगी. इथे अभिनयाची आवड असलेली मंडळी होती तशीच लेखन आणि दिग्दर्शनात करिअर करायचंय अशीही मित्रमंडळी अभिजीतला भेटली. एका परिपूर्ण वर्तुळात तो आला. त्यातूनच त्याला माझीया प्रियाला प्रीत कळेना सारखी मालिका मिळाली.
या मालिकेत एका रोमँटिक हिरोची भूमिका होती. छोट्या पडद्यावर परिचीत झालेला अभिजीत जय महाराष्ट्र ढाबा भटींडा, मी पण सचिन, ध्यानीमनी, भय, बाबा यासारख्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आला.
मोठ्या पडद्यावर यश मिळालं तरी अभिजीतला छोटा पडदा अधिक आवडला होता. त्यामुळेच माझ्या नव-याची बायको. या मालिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा त्यानं लगेच होकार दिला. अभिजीतचा हा होकार किती योग्य होता ते या मालिकेच्या यशावरुन सिद्ध झाले. टिआरपी मध्ये या मलिकेचा कायम वरचा क्रमांक राहिला आहे. गुरुनाथ सुभेदार. या पात्राने आपली छाप सोडली. बायकोला फसवणारा. प्रेयसीसोबत रमणारा. गुरुनाथ अनेकांना खलनायक वाटतो. पण तरीही तो प्रेक्षकांना तेवढाच आवडतो. अभिजीतच्या अभिनयाची ही ताकद आहे.
अभिजीतचा विवाह सुखदा या अभिनेत्रीबरोबर झाला आहे. सुखदा ही सुद्धा नाशिकचीच. फेसबुकच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. दोघंही नाशिककर असल्यामुळे त्यांची पटकन मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि मग लग्नात. सुखदानं डॉ.अमोल कोल्हे यांच्या बरोबर प्रेमाची गंमत या नाटकात काम केलं आहे. धराकी कहानी या हिंदी मालिकेत ही काम केलं आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटात तिनं अनुबाईंची भुमिका केली आहे. अन सेन्सॉर्ड हा सुखदाचा चॅटशो लोकप्रिय आहे.
अभिजीत आता माझ्या नव-याची बायकोच्या पुढील भागांची तयारी करतोय. लॉकडाऊनंतर या मालिकेत आणखी काही ट्विस्ट येणार आहेत. ते काय असतील आणि त्यात हा गॅरी काय काय करतोय हे लवकरच समजेल. तोपर्यंत अभिजीतला त्याच्या अभिनयाच्या प्रवासासाठी कलाकृती मिडीयातर्फे अनेक शुभेच्छा….