आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
अभिनय क्षेत्रात चिराग पाटीलने मारले ‘सिक्सर’
सध्या येणाऱ्या आगामी चित्रपटात ‘८३’ हा चित्रपट चर्चेचा विषय झाला आहे. भारतीय संघाने १९८३ साली जिंकलेला क्रिकेट विश्वचषक हा या चित्रपटाचा विषय तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. योगायोगाची गोष्ट ही की सुप्रसिद्ध क्रिकेटपटू, क्रिकेट प्रशिक्षक संदीप पाटील यांचा मुलगा अभिनेता चिराग पाटील हा या चित्रपटात ‘संदीप पाटील’ यांचीच भूमिका करत आहे.
चिरागने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याला खरे तर स्वतःचे रिसॉर्ट किंवा हॉटेल सुरु करायचे होते. वडील संदीप पाटील हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांनी चिरागच्या लहानपणीच त्याचे क्रिकेट खेळणे बघून सांगितले होते की तू काय क्रिकेट वगैरे खेळण्याचा विचार करू नकोस. चिरागला देखील क्रिकेटची आवड नव्हती. सलील अंकोला आणि संदीप पाटील हे खास मित्र आणि आपल्याला माहीतच आहे की सलील अंकोला एक उत्तम अभिनेते देखील आहेत. एकदा चिराग कॉलेजला असताना सहज म्हणून सलील अंकोला यांना भेटायला गेला होता. तिथे गेल्यावर ‘करम अपना अपना’ या मालिकेत एक भूमिका करशील का असे विचारले गेले. चिरागने ऑडिशन दिली आणि त्याला ती भूमिका मिळाली. तेव्हा त्याचे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण चालू होते. सेटवर तो वेळ मिळेल तसा अभ्यास देखील करायचा.
स्टार प्रवाह वरील ‘एक नंबर’ मालिकेतील त्याची भूमिका लोकांनी लक्षात ठेवली होती. त्याने ‘वजनदार’ नामक मराठी चित्रपटात काम केले आणि त्यातील त्याने साकारलेली ‘ओंकार’ ही भूमिका खूप लोकप्रिय झाली.
८३ चित्रपटातील भूमिका कशी मिळाली, यावर तो म्हणतो, “या चित्रपटात मला भूमिका मिळेल आणि ती सुद्धा माझ्या वडिलांची भूमिका हे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. या चित्रपटाच्या लॉन्चिंग पार्टीला तो वडिलांसमवेत गेला होता. तेव्हा दिग्दर्शक कबीर खान यांची फक्त ओळख झाली होती. काही महिन्यानंतर कबीर खान यांना बलविंदर संधू यांनी चिराग पाटीलचे नाव या चित्रपटासाठी सुचवले. बलविंदर यांनी चिरागचे ‘वजनदार’ मधील काम पहिले होते. कबीर खान यांच्याकडून चिरागला ऑडिशनसाठी बोलावले गेले. क्रिकेटसंदर्भात त्याची ऑडिशन झाली. पण त्यात बॅटला बॉलच लागला नव्हता.
मग काही दिवसांनी पुन्हा फोन आला आणि चिरागला बोलावलं गेलं. जेव्हा प्रत्यक्ष वर्ल्डकपच्या वेळचे संदीप पाटील यांची फुटेजेस बघितली गेली आणि त्याच्या बाजूला चिरागच्या ऑडिशनचे फुटेज ठेवण्यात आले, तेव्हा कबीर खान यांना जाणवले की भले चिरागला क्रिकेट खेळता येत नसेल पण त्याची उभी राहण्याची पद्धत, स्टाईल संदीप पाटीलसारखी त्यांना जाणवली. त्यामुळे चिरागनेच संदीप पाटील यांची भूमिका करायचे ठरले. वडिलांची भूमिका करणे हे आव्हान होते. त्याने बाबांशी चर्चा केली, बाबांनी देखील त्याला मार्गदर्शन केले आणि खास करून गोलंदाजी संदर्भात मार्गदर्शन केले.
चिरागचे लग्न सलील अंकोला यांची मुलगी सना अंकोला हिच्याशी झाले आहे. दिवाळीबद्दल बोलताना तो म्हणाला, “आम्ही दादरला राहत होतो, तेव्हा आई आणि आजी दिवाळीसाठी खास नारळाच्या वड्या तयार करायच्या. आई आणि आजीला मी रांगोळी काढायला मदत करत होतो. बाबांची कडक सूचना होती की आवाजाचे फटाके वाजवायचे नाहीत. त्यामुळे लहानपणापासून मी आवाजाच्या फटाक्यांपासून दूरच आहे. आम्ही रॉकेट आणि फुलबाज्या एवढेच फटाके लावत होतो.
हे वाचलंत का: शर्मिष्ठा – तेजसच्या नवलाईची दिवाळी घेऊन येणार आहे उदंड आनंद आणि भरभराट.
दिवाळीचा सण मला कुटुंबियांसमवेत साजरा करायला आवडतो. आता लग्नानंतर आमच्या घरी लक्ष्मीपूजन, आरत्या या पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर केल्या जातात आणि आमच्या मुलीवर हे पारंपरिक संस्कार होतात, याचा मला आनंद वाटतो”. चिरागचे हॉटेल आणि रिसॉर्ट चे जे स्वप्न होते, ते पूर्ण झाले आहे. कर्जतला त्यांचे एक रिसॉर्ट असून त्याची जबाबदारी त्याची पत्नी सना सांभाळते.