याला ’जीवन’ ऐसे नाव
हिंदी सिनेमाच्या खलनायकाच्या यादीत प्राणने नि:संशयपणे पहिला क्रमांक पटकावला असला, तरी दुसर्या क्रमांकाचे दावेदार अनेक आहेत…त्यातील एक होता जीवन !
सिनेमाच्या सुवर्ण युगात घेतलेला त्याने खलनायकाच्या व्यक्तीरेखेचा वसा अमिताभ युगापर्यंत चालविला. त्याचा कावेबाज चेहरा, कुर्रेबाजपणे चष्म्याच्या कोनातून बघणं, चेहर्यावरचं कुत्सित हास्य,एक हातात रिव्हाल्वर तर दुसर्या हातात मदनिका,उंची पाश्चात्य पेहराव असा त्याचा अटायर असायचा. डोक्यात सतत कुटील कारस्थानं चालू असावी अशी बेरकी नजर प्रेक्षकांच्या छातीत देखील धडकी भरायची.
आजच्या पिढीला त्याचे अमिताभ सोबतचे रोल आठवत असतील. मनमोहन देसाईंच्या ’अमर अकबर अॅंथोनी’त तो प्राणला आपल्या बूटावर दारू ओतून ते बूट पुसायला लावतो त्या वेळचा त्याचा गुर्मीतला संवाद’ जूते ऐसे चमकाऒ की सूरत नजर आनी चाहीए’.प्रेक्षकांना चीड आणायला लावायची ताकत त्याच्या अभिनयात होती.
’जॉनी मेरा नाम’ मधील त्याने रंगवलेला ’हिरा’ हा स्मगलर आणि ’काम तो हो गया लेकीन हिरा पकडा गया’. या त्याच्या उच्चरातून डोकावणारा पाश्चात्य टोन त्याच्या स्मगलरच्या अदाकारीला साजेसा होता. पृथ्वीवरील नंदनवनात म्हणजेच कश्मीरमध्ये जीवनचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ रोजी एका भल्या मोठ्या कुटुंबात झाला. त्याला सख्खे सावत्र मिळून २४ भावंड होती.
हेही वाचा : रेखाचा पहिला सिनेमा
लहान वयातच तो पोरका झाला. लाहोरला शालेय शिक्षण घेतल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी खिशात २६ रूपये घेवून तो मुंबईत सिनेमाची स्वप्ने घेवून आला. पण इथे संघर्ष करावा लागला. मोहन सिन्हा यांच्या स्टुडिओत ते ’रिप्लेक्टर बॉय’ म्हणून रूजू झाले. त्यांच्या सोबत व्दारका दिवेचा होते.
एक दिवस सिन्हांनी जीवनला पाहिले. गोरा गोमटा उंचपुरा तरूण जीवन त्यांना नायक म्हणून मनोमन आवडला आणि त्याला ताबडतोब ’फॅशनेबल इंडीया’ या सिनेमाचा नायक बनवून टाकले.त्याचे खरे नाव होते ओंकारप्रसाद दार! पण एवढे लांबलचक नाव नको म्हणून सुटसुटीत ’जीवन’ करून टाकले. नायक बनण्याचा आपला चेहरा नाही हे त्याने लवकर ओळखले व त्याने खलनायकीकडे मोर्चा वळविला.
पन्नासच्या दशकातील गाजलेल्या नागीन, दुर्गेश नंदीनी, हलचल, तराना, फागुन या सिनेमातून त्याने खलत्वाचे रंग भरले. दिलीप-राज-देव या त्रिकूटासोबत हो गाजला. दिलीप सोबत ’नया दौर’ मधील त्याची भूमिका खूप गाजली. देव सोबत नौ दो ग्यारह, जॉनी मेरा नाम या सिनेमातील जीवनची ऐटबाज भूमिका भाव खाऊन गेली. ’आधी रात’सिनेमात नर्गीसच्या क्रूर दारूड्या नवर्याची भूमिका काय अफलातून केली होती.
हे तर वाचलेच पाहिजे : “जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नहीं”
सत्तरच्या दशकात व्हीलन अधिक स्टायलीश बनला. धूर्त, कावेबाज, कपटी व्यक्ती हा तर त्याच हातखंडा होता. अमिताभ सोबत याराना, लावारीस, सुहाग, देश प्रेमी या सिनेमात तो होता. आपल्या खास स्वरात लांबलचक वाक्ये उच्चरण्याची त्याची अदा ग्रेट होती.
’प्राण जाये पर वचन न जाये’ या सिनेमात तो म्हणतो ’हां हाम ठकूर साब दिल के मामले बडे नाजूक होते हैं. गोला बारूद से भी भडक उठते है और फिर लोग तो यही कहेंगे की जब ठाकूर कि चोरी पकडी गयी तो अपनी दिल की प्यास बुझाकर गरीब मुनीया का घर हि उजाड दिया.’
या वेळचा त्याचा अभिनय, आवाजातील चढ उतार जबरदस्त होते. जीवन ने साठ धार्मिक चित्रपटात नारदाचा रोल केला होता. कदाचित हा जागतिक विक्रम असावा.