‘दाढी-मिशी’वर असलेल्या प्रेमापोटी त्याने यशराजच्या या चित्रपटाला नकार दिला…
मिलिंद गुणाजी या बहुआयामी अभिनेत्याचा 23 जुलै रोजी वाढदिवस. फरेब या चित्रपटातील ‘ये ऑंखे झुकी झुकी’ गाण्यानं मिलिंदची ओळख झाली. विरासत, गॉडमदर सारख्या चित्रपटातून त्यांनी आपला ठसा उमटवला…. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात झळकलेले मिलिंद गुणाजी रमले ते मात्र महाराष्ट्राच्या द-याखो-यात… आणि गडकिल्यावर…
निसर्गात रमणारा कलाकार…
अभिनय, मॉ़डेलिंग, लेखन, फोटोग्राफी, निवेदन, भटकंती या अशा अनेक मार्गावर यशस्वी ठरलेला मराठी कलाकार म्हणजे मिलिंद गुणाजी… मिलिंद गुणाजी म्हणजे बहुआयामी व्यक्तीमत्व… पपीहा या चित्रपटातून मिलिंद हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आले. पण फरेब मधील त्यांचा इंस्पेक्टर इंद्रजीत भाव खाऊन गेला… आणि त्यांच्यावर खलनायकाचाही शिक्का लागला. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांची मुशाफीरी चालू आहे. तरीही हा माणूस रमतोय ते निसर्गाच्या सानिध्यात… कारण अभिनयाची जेवढी त्यांना गोडी आहे, तेवढीच निसर्गाचीही…
मुंबईमध्ये जन्म झालेले मिलिंद (Milind Gunaji) हे उत्कृष्ठ खेळाडू होते. अगदी कॉलेजमध्येही ते क्रिकेट, बॅडमिंटन खेळायचे. खेळात करिअर करायचे नाहीतर डॉक्टर होण्याचे स्वप्न मिलिंद बघत होते. पण एका अपघातानं क्रिकेट, बॅडमिंटन हे दोन्हीही खेळ मागे पडले. मेडिकलला अॅडमिशन घेण्यासाठी काही गुण कमी पडले. त्यामुळे मिलिंद यांनी इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. त्यांचे एकूण व्यक्तीमत्वच असे की, दुस-यावर लगेच छाप पडे, त्यामुळे काही मित्रांनी मॉडेलिंग कर असा सल्ला दिला.
मिलिंद यांनी आपला पोर्टफोलियो बनवून घेतला. तोही गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून. फोटोशूट करतांनाच मिलिंद यांचे व्यक्तिमत्व गौतमजींना एवढे आवडले की त्यांनी डीजीएम शुटींगसाठी मिलींदचे फोटो पाठवले. ही जाहीरात यापूर्वी शेखर कपूर यांनी केली होती. त्यांच्यानंतर मिलिंद गुणाजी थेट डीजीएम शुटींगचे मॉडेल म्हणून झळकले. हा त्यांचा पहिला ब्रेक होता. आणि तो सुद्धा मोठ्या ब्रॅँण्डमध्ये. यानंतर मिलिंद यांना विमल आणि रेमंड यासारख्या ब्रँण्डमधूनही मॉडेलिंग करण्याची संधी मिळाली.
डीजीएममधील त्यांचे फोटो गोविंद निहलाणी यांनी पाहिले. त्यांनी आपल्या द्रोहकाल या चित्रपटासाठी मिलिंद यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला. यात नसीरुद्दीन शहा आणि ओमपुरीसारखे कलाकार होते. पण मिलिंद यांना अभिनयाचा काहीही अनुभव नव्हता. त्यामुळे गोविंद निहलाणी यांनी सत्यदेव दुबे यांच्याकडे मिलिंद यांना पाठवले. दुबे यांच्यासोबत रंगभूमीचा सहा महिन्याचा अनुभव घेतल्यावर मिलिंद मोठ्या पडद्याकडे आले. त्याच दरम्यान मिलिंद कुरुक्षेत्र या मालिकेत झळकले. ही मालिका महेश भट्ट यांच्या पहाण्यात आली. त्यातील मिलिंद यांची भूमिका त्यांना आवडली. आणि फरेब या चित्रपटात मिलिंद गुणाजी इंन्पेक्टरच्या भूमिकेत झळकले.
फरेब पूर्वी मिलिंद पपीहा या चित्रपटात झळकले होते. हा त्यांचा पहिला चित्रपट. पण मिलिंद गुणाजी या नावाची ओळख फरेबनं दिली. ये ऑंखे झुकी झुकी…. हे सुमन रंगनाथन बरोबरचं त्यांचं गाणं लोकप्रिय झालं. थंड डोळ्यांचा… दाढी मिशी असलेला हा खलनायक हिंदी चित्रपट सृष्टीला भावला.
त्यानंतर गॉडमदर, जोर, देवदास, विरासत, द गाझी अटॅक, क्रीशनम वंदे, पपिहा, ये मेरा इंडीया, हजार चौरसी की मॉ, खट्टा मिठा, जुल्मी, असंभव, जिस देश मे गंगा रहता है, ठण ठण गोपाळ, सलमा पे दिल आ गया, रेस 3, कामसुत्र 3 डी, अभय, ओकाडू मिलांडू, पानीपत अशा अनेक चित्रपटात मिलिंद दिसले. हिंदी बरोबर मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटातही मिलिंद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. जवळपास दिडशे चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.
या सर्व भूमिका वेगवेगळ्या होत्या… खलनायिका स्वरुपाच्या असल्या तरी प्रत्येक भूमिकेचे रंग वेगळे…. विरासतमध्ये त्यांनी बली ठाकूर ची भूमिका केली. अमरीश पुरी, अनिल कपूर सारख्या अभिनेत्यांसमोर रंगवलेली ही भूमिका चर्चेत राहीली. संजय लिला भन्साली यांच्या देवदास मध्येही मिलिंद खलनायिकी भूमिकेत होते.. कामसूत्र 3 डी या आंतरराष्ट्रीय चित्रपटात मिलिंद गुणाजी शर्लिन चोप्रा बरोबर दिसल्यावर त्यांच्यावर अनेकांनी टिका केली. त्याचवेळी मिलिद साईबाबांच्या भूमिकेत दिसले.
चित्रपटांचा हा सिलसिला असतांना छोट्या पडद्यावरही मिलिंद काम करत होते. आशुतोष गोवारीकर यांच्या एव्हरेस्ट शो मध्ये मिलींद होते. ब्योमकेश बक्शी, धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, वीर शिवाजी, हमने ली है शपथ या मालिकांमधून मिलिंद गुणाजींनी काम केलं. पण मिलिंद गुणाजी हे नाव आणखी एका शोमुळे कायम लक्षात राहीलं… ते म्हणजे ‘भटकंती’… भटकंती या शोमध्ये मिलिंद गुणाजी यांचा आणखी एक गुण समोर आला. हा माणूस जेवढा अभिनयात रमतो… तसाच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मिलिंद रमतात ते निसर्गाच्या सानिध्यात…
भटकंती या शोमध्ये मिलिंद महाराष्ट्राच्या कानाकोप-यात फिरले… आणि आपल्या राज्याची नव्यानं ओळख करुन दिली. किल्यांचं वैभव दाखवलं…. रानाचं सौदर्य दाखवलं… या शोच्या प्रेमात अनेक पडले. मिलिंद यांना महाबळेश्वरचे ब्रॅण्ड ॲबेंसिटर म्हणून नेमण्यात आलं. याशिवाय आणखी एक गोष्ट झाली. निसर्गात रमलेल्या मिलिंदनं निसर्गांतून मिळालेले संपन्न अनुभव आपल्या लेखणीतून कागदावर उतरवले… हे नितांत सुंदर अनुभव पुस्तक रुपानं प्रसिद्ध झाले… पुढे मिलिंद आणि भटकंती हे एक समीकरण झालं… आणि त्याचे पुस्तकात होणारं रुपांतर हेही नक्की झालं.
मिलिंद यांची भटकंती आणि देशविदेशातील पर्यटन स्थळांवर तब्बल बारा पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ट्रॅव्हल रायटर ही त्यांची नवी ओळख झाली. याचवेळी त्यांच्यातला फोटोग्राफरही तेवढाच सजग होता. त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोना बघण्याची संधी या पुस्तकातून मिळाली. निसर्गात केलेली ही भटकंती, दराखो-यात मिळालेले हे अनुभव पुस्तक रुपात जसे आले तसे काव्यरुपातही आले. ‘मन पाखराचे होई’ हा त्यांच्या कवितांवरील अल्बम चांगलाच लोकप्रिय ठरला.
वैशाली सामंतच्या ‘ऐका दाजिबा’मध्ये मिलिंद मिशांना ताव मारतांना दिसले… खरतर चित्रपट सृष्टीत आल्यावर दाढी आणि मिशा काढण्यासाठी त्यांना अनेकांनी सुचवलं होतं. पण या रांगड्या अभिनेत्याचं आपल्या दाढी आणि मिशीवर प्रचंड प्रेम आहे. या त्यांच्या वेडापायी अनेक चांगले चित्रपट त्यांच्या हातातून गेले. त्यात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि दिलजले सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी या भूमिकांना नकार दिल्यावर परमीत सेठी यांची तिथं वर्णी लागली…. अर्थात मिलिंद गुणाजी यांना त्याचे दुःख नाही… आपल्या अटींवर आपण काम करु शकतो याचे समाधान आहे. आणि हातातून काही गेल्यापेक्षा काय मिळालं हे बघण्याकडे त्यांचा कल अधिक आहे… बहुधा या गुणांमुळेच मिलिंद अभिनय, फोटोग्राफी, लेखन, निवेदन या सर्व क्षेत्रात मुक्तपणे वावरत आहेत.