हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

अभिनेता संतोष जुवेकरने बाप्पाला घातल खास साकडं; म्हणाला,’ज्या गोष्टीची गरज आहे…’
सर्वत्र गणेशोत्सवाच्या स्वागताची धूम सुरू आहे. प्रत्येक घराघरात लाडक्या बाप्पाचं आगमन होत असून, भक्ती, आनंद आणि जल्लोषाचं वातावरण अनुभवायला मिळत आहे. या भक्तिमय वातावरणात मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर याच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यंदा संतोषच्या घरी 100 टक्के इकोफ्रेंडली बाप्पा विराजमान झाले आहेत. परंपरेनुसार त्याने आपल्या कळव्यातील घरी गणपती बाप्पाची स्थापना केली. विशेष म्हणजे या वेळी प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या ऐवजी कागदाचे सुंदर डेकोरेशन करण्यात आलं आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच मनोहर झालं असून, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश त्याने दिला आहे.(Actor Santosh Juvekar)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये संतोष जुवेकरने बाप्पासोबतचं आपलं नातं उलगडलं. तो म्हणाला, “गणपती येण्याआधीच घरातला उत्सव सुरू होतो. घराची साफसफाई, डेकोरेशन हे सगळं काम बाप्पाच्या स्वागताची तयारी म्हणून सुरू होतं. प्रत्येक वेळी बाप्पा सोबत असतो. बाप्पाच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच मला नवनवीन कामाच्या संधी मिळत राहतात. ही कृपा अशीच चालू राहो, अशीच माझी प्रार्थना आहे.” याचबरोबर संतोषने सगळ्यांसाठी खास साकडं ही घातलं. तो पुढे म्हणाला, “सगळ्यांना सुखी ठेव बाप्पा, सकारात्मकता जास्त वाढू दे. एकमेकांबद्दल आदर कायम राहू दे. चांगल्या गोष्टींची जाणीव सगळ्यांना असू दे. हा सण फक्त आनंदाचा नाही, तर विचार देणारा असावा.”

संतोष जुवेकरने या वेळी मराठी इंडस्ट्रीबद्दलही मनोगत व्यक्त केलं. तो म्हणाला, “मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रचंड क्षमता आहे. आपल्याकडे दर्जेदार कथा, उत्तम कलाकार आणि मेहनती तंत्रज्ञ आहेत. जशी हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीची मोठी प्रगती झाली आहे, तशीच मराठी इंडस्ट्रीचीही वाढ व्हावी. मराठी चित्रपटसृष्टीला जे आवश्यक आहे ते मिळावं आणि प्रेक्षकांचं प्रेम अजून वाढावं. मराठी इंडस्ट्रीला योग्य तो दर्जा आणि ओळख मिळणं गरजेचं आहे.”(Actor Santosh Juvekar)
==================================
हे देखील वाचा : Gharat Ganpati Movie: लोकप्रिय मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आता पुन्हा चित्रपटगृहात!
==================================
संतोषच्या सोशल मीडियावर त्याच्या बाप्पाच्या आगमनाचे फोटो आणि व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सव म्हणजे फक्त भक्तीचा नाही, तर पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि सकारात्मकतेचा संदेश देण्याची संधी आहे. संतोष जुवेकरने यंदा बाप्पाचं स्वागत करून तो संदेश आणखी परिणामकारक पद्धतीने पोहोचवला आहे.