भूमिकांच्या एका साच्यात बसणं मला पटत नाही! शर्मन जोशी
गेल्या काही वर्षात ‘रंग दे बसंती, गोलमाल, मेट्रो, ३ इडियट्स असे दणदणीत सुपर हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूडमध्ये तुझी फेस व्हॅल्यू अधिक वाढली असं जाणवतय का?
शर्मन– ‘मी ह्यापूर्वी अनेकदा बोललो आहे, माझ्या अभिनयाचा श्रीगणेशा रंगभूमीपासून झाला. रंगभूमीवर अर्थात आजचा लोकप्रिय शब्द म्हणजे स्टेज आर्टिस्ट म्हणून कारकीर्द सुरु केल्यानंतर हे आत्मभान येतं की आपल्या वयाचा आणि भूमिकेचा थेट संबंध जोडू नये.. २५ वय असलं तरी ७०च्या वृद्धाची भूमिका साकारावी.. म्हणूनही असेल कदाचित मी सरधोपटपणे विनोदी, तरुण, मध्यमवयीन, निगेटिव्ह,पॉजिटीव्ह, हिरो, सहनायक तात्पर्य काय तर कुठल्याही भूमिकांचा विधिनिषेध नाही मला.. भूमिकांच्या एका साच्यात बसणं मला पटत नाही.. ह्याला कारण माझी पार्श्वभूमी रंगभूमी आहे.
गम्मत अशी आहे की जर मी म्हटलं, मला टिपिकल हिरो छाप भूमिका नको.. तर मला ऐकावं लागेल.. कोल्ह्याला द्राक्षं आंबट! शर्मनला हिरोचे रोल बॉलिवूड ऑफर करत नसल्याने तो मिळेल त्या भूमिका स्वीकारतोय! बिलिव्ह मी- हा आरोप निराधार आहे.. मी ठामपणे म्हणेन आपल्या टिपिकल हीरोना नेहमीच सूट बूट अगदी आकर्षक रूपातच वावरावं लागतं.. हिरोने पडद्यावर नेहमी चॉकलेटी-गुलछबू दिसलं पाहिजे.. नाही तर नायिका त्याच्या प्रेमात कशी पडणार हो? हिरोने प्रणयराधन करतांना नाच गाणी केली पाहिजेत.. नायिकेच्या मागेपुढे करणारा, तिच्यासाठी गुंडांचा मार खाणारा नायक आपल्या समाजाच्या मनावर ठामपणे अधोरेखित होत आलाय..
मी मात्र विविधतापूर्ण भूमिका करण्यावर कायम विश्वास ठेवत आलोय. मी केलेले चित्रपट हिट झालेत ह्यात मी माझा खारीचा वाटा मानतोय. ३ इडियट्स ह्या फिल्मची संकल्पना- दिग्दर्शन आणि मग आमिर खान, माधवन, करीना ह्यांना ह्या यशाचं श्रेय जातंय. माझ श्रेय अगदीच नाममात्र.. त्यामुळे फेस व्हॅल्यू माझी वाढली अथवा नाही ह्याला मी महत्व देत नाही.’
रंगभूमीच्या कलावंताना फार मोठ्या कसदार भूमिका दिल्या जात नाहीत.. त्यांना फार मान नाही अशी खंत काही रंगभूमी कलाकार करतात.. तुझा काय अनुभव?
शर्मन– ही गोष्ट खरी आहे.. रंगभूमी गाजवलेल्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये मोठ्या किंवा अर्थपूर्ण भूमिकांसाठी विचारणा होतेच असं नाही.. सन्माननीय अपवाद- अमरीश पुरी, परेश रावल यांचा.. अमरीश पुरींना देखील बॉलिवूडमध्ये फार उशिरा यश मिळालं. त्यांची दखल तशी उशिराच घेतली गेली. त्यांच्या ‘मिस्टर इंडिया’ ‘करण अर्जुन’ टाईप भूमिका गाजल्यात तेंव्हा बॉलिवूडचे डोळे उघडले.. मराठी रंगभूमीवरचे गाजलेल्या कलावंताना किमान मराठी फिल्म्समध्ये उत्तम यादगार भूमिका नेहमीच मिळाल्या..
माझे वडील जेष्ठ कलाकार अरविंद जोशी यांनी त्यांची अख्खी हयात गुजराती रंगभूमीसाठी समर्पित केली, पण त्यांची दखल घ्यावी असं बॉलिवूडवाल्यांना कधीही सुचलं नाही.. अलीकडेच त्यांचं निधन झालं! कधी ही भावना मनात नक्की येतेच.. रंगभूमीच्या दिग्गज कलावंतांना खूपदा उपेक्षित वागणूक मिळते. तुमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असा दिसून आलं नाही मला.. मी स्वतः १० वर्षे थिएटर केल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
‘तू विविधांगी भूमिका करत आलायस हे खरंय.. तुझी इमेज कधी बनली नाही हे ही खरंय.. पण जेंव्हा पडद्यावर तुला खलनायक धोपटतो किंवा ‘हेट स्टोरी’ सारख्या फिल्ममधे तुझी खलनायकी कृत्यं पाहून तुझी लेक, आणि जुळी मुलं फार दुखावली होती म्हणे.. तुझ्या निगेटिव्ह भूमिकांचा कुप्रभाव मुलांवर पडू नये म्हणून ती काय खबरदारी घेतोस?’
शर्मन– हे भगवान! पूछिए मत! मेरी बेटी १० वर्ष की है ख्याना.. मेरे जुड़वाँ बेटे वार्यंन और विहान यह सभी मेरे बड़े क्रिटिक्स है! माझी पत्नी प्रेरणा ही जेष्ठ कलावंत प्रेम चोप्रा यांची लेक.. प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत अनेकविध अनेक पदरी भूमिका केल्या असल्या तरी त्यांची इमेज ही खलनायक म्हणून अधोरेखित झाली हे खरंच नाही का? प्रेरणाने तिच्या वडिलांच्या शेकडो भूमिका पाहिल्यात, त्यामुळे मी ऑन स्क्रीन व्हिलन झालो तरी ती मला समजून घेत आलीये. माझ्या काही फिल्म्स मी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या लेकीला यु ट्यूबवर दाखवल्या जेणेकरून जर तिला बाहेरून समजलं की तिचा ‘पपा पडद्यावर कधी तुफान मार खातो तर कधी तो अन्य खलनायकांना मारतो..
मला इतरांनी मारलं तेंव्हा तिच्या भावपूर्ण डोळ्यात अश्रू आलेत.. मी एका नायिकेच्या अंगचटीला गेलो हे ही तिला फार खटकलं.. तिने मला (गुजरातीतून) म्हटलं, एम केम करशो ‘पपा तमे?’ (तुम्ही असं कसं करू शकता ‘पपा?) ह्यावर माझ्या पुतणीने तिला म्हटलं, काही वाईट किंवा अयोग्य वाटू वाटून घेऊ नकोस.. ऑन स्क्रीन जे काही तुझे ‘पपा करतात ते स्वतः करत नाहीत.. ही कथेची व्यक्तिरेखेची मागणी असते.. कारण तुझे ‘पपा परफॉर्मर आहेत.. उलट त्यांच्या परफॉर्मन्सचा अभिमानच बाळग. गल्ली- बोळात खूप कलावंत असतात, ते उत्कटपणे काम देखील करतात पण सगळेच बॉलिवूडमध्ये पोहचत नाहीत.. एकाच वेळी एकाच भूमिकेद्वारे करोडो लोकांचं मनोरंजन करणं सोपं नाहीच.. मला माझ्या पुतणीच्या प्रगल्भतेचं मोठं कौतुक वाटलं.’
एखाद्या भूमिकेसाठी खूप तयारी -गृहपाठ केला पण तो सिनेमा फ्लॉप झाला तेंव्हा खूप मनःस्ताप होतो की झालं गेलं विसरून पुन्हा नॉर्मल होतोस तू?’
शर्मन– ‘मी प्रत्येक भूमिकेच्या अंतरंगात शिरण्याचा आटोकाट नेहमीच प्रयत्न करतो.. काही वर्षांपूर्वी मी खूप खट्टू होत असे, माझा मेहनत घेऊन साकारलेली भूमिका असलेला सिनेमा फ्लॉप झाल्यावर.. पण ह्याचा परिणाम मी बेचैन होत असे.. माझी मनस्थिती ढासळली होती.. शेवटी मी ह्या निर्णयाप्रत आलो की भूमिका व्यक्तिरेखा मनापासून रंगवायच्या पण त्यात गुंतायचं नाही.. कलावंत म्हणून ‘लॉन्ग इनिंग’ खेळायची असल्यास स्वीच ऑन स्विच ऑफ होणे गरजेचे आहे. अन्यथा त्या भूमिका माझ्यासोबत कायम राहतील.. त्याचा त्रास होतोच. शेवटी सिनेमांचं यश हे कलाकारांच्या हाती फार कमी असतं.. कथा, पटकथा, दिग्दर्शक, संगीत आणि अभिनय हे महत्वाचे घटक असतात.. ‘फेरारी की सवारी’ साठी मी खूप गुंतून गेलो होतो.. पण ह्या फिल्मला फार यश मिळालं नाही.. टॉम डिक एन्ड हॅरी हा कॉमेडी सिनेमा करण्यात मी गुंतलो कारण माझी मुलं माझ्या ह्या कॉमेडी रोलने खूप खुश होतील’
नवीन काय करतोयस?
शर्मन– रेन्सील डिसिल्व्हा यांची आगामी फिल्म ‘तो बात पक्की ‘रिलीज होणार होता पण सध्या लॉक डाऊनमुळे पुढे गेली रिलीज.. तब्बू, वत्सल सेठ, युविका आणि मी असे मुख्य कलावंत आहेत.. एका हॉलिवूड फिल्मचं चित्रण सुरु होणार आहे.. लेट्स सी’