
अभिनेता Shubhankar Tawde ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला ‘टीव्ही ऐवजी मी….’ !
अभिनेता शुभंकर तावडे हा मराठी मनोरंजन विश्वातील असा चेहरा आहे, ज्याने नाटक, सिनेमा आणि वेब सिरीज अशा विविध माध्यमांत स्वतःचा ठसा उमटवला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील त्याच्या सशक्त अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. नुकतीच शुभंकर ने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली ज्यात त्याने अनेक गोष्टी शेअर केल्या. शुभंकर भूमिका निवडताना अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतो आणि त्याच्या म्हणण्यानुसार, या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी संयम हा फार महत्त्वाचा गुण आहे. शुभंकरच्या मते, अनेकदा कलाकारांची विशिष्ट प्रतिमा तयार होते, मात्र तो त्यापेक्षा वेगळ्या वाटेवर चालतो. प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपण्याचा तो प्रयत्न करतो. त्याच्या म्हणण्यानुसार, “प्रत्येक नव्या पात्रातून मला काही तरी वेगळं दाखवायचं असतं. त्यामुळे ठरावीक प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये अडकण्यापासून मी नेहमीच टाळतो.”(Actor Shubhankar Tawde)

या क्षेत्रातील स्थानाविषयी विचारल्यावर शुभंकर अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की त्याला आघाडीवर असण्याचं फारसं वेड नाही. “माझं बालपण सिनेसृष्टीच्या सान्निध्यात गेलं आहे. टिकून राहण्यासाठी संयम आणि ध्येय स्पष्ट असणं आवश्यक आहे. मला अभिनय आवडतो, तो माझं बळ आहे, आणि म्हणूनच मी हे काम आयुष्यभर करणार आहे,” असं तो सांगतो.

चित्रपटकर्त्यांच्या ‘कंपू संस्कृती’विषयी शुभंकर स्पष्ट मत व्यक्त करतो. “हो, बरेच दिग्दर्शक ठरावीक कलाकारांसोबत काम करतात. पण काहीजण नव्या चेहऱ्यांना संधी देतात. मकरंद माने यांनी माझं नाटक पाहून मला पहिल्या चित्रपटात घेतलं, ही माझ्यासाठी मोठी संधी होती,” असंही तो नमूद करतो. यशाचा कोणताही ठराविक फॉर्म्युला नसतो, हेही तो नम्रतेने स्वीकारतो. त्याच्या मते, “यशामागे केवळ टॅलेंट नाही, नशीब आणि योग्य वेळ यांचाही मोठा वाटा असतो. एखाद्या भूमिकेसाठी अनेकांची नावं चर्चेत असतात, त्यातून कोण निवडला जातो, हे अनेक घटकांवर अवलंबून असतं.” स्पर्धेच्या या धावपळीतही शुभंकर नशिबावर विश्वास ठेवतो. “वेळेच्या आधी किंवा नंतर काहीच मिळत नाही. योग्य वेळीच योग्य गोष्ट घडते. आपण फक्त सातत्याने काम करत राहायचं,” ही त्याची सकारात्मक दृष्टी आहे.(Actor Shubhankar Tawde)
============================
============================
शुभंकरला प्रसिद्धीची घाई नाही. तो स्पष्ट सांगतो की, “लवकर मिळणारं फेम अस्थिरताही आणू शकतं. आमच्यासारख्या नव्या पिढीच्या कलाकारांकडे गमावण्यासारखं काही नसतं, म्हणून आम्ही अधिक निर्धास्त असतो. आम्हाला केवळ उत्तम काम करायचं आहे.” सध्या शुभंकरने टेलिव्हिजनपासून थोडं दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. यामागचं कारण सांगताना तो म्हणतो, “टीव्ही ऐवजी मी सध्या सिनेमा, वेब सिरीज आणि नाटकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. चांगली आणि दर्जेदार संधी मिळाली, तर नक्कीच पुन्हा टीव्हीवर काम करायला आवडेल.”अस ही तो म्हणाला.