‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रिल व्हिलन ते रिअल हिरो
पडद्यावर जेव्हा एखादा कलाकार खलनायक साकारतो तेव्हा त्याचा प्रेक्षकांना प्रचंड राग येणं ही त्याच्या अभिनयाला मिळालेली खरी दाद असते. ही झाली त्यांची पडद्यावरची ओळख. सिनेमात बॅड बॉय असलेले प्रत्यक्षात जेव्हा गुड बॉय असल्याचे दिसते तेव्हा त्यांच्या अभिनयापलीकडे त्यांच्या माणुसकीला रसिक मायबाप प्रेक्षकांची पोचपावती मिळते. मग दोन तासांच्या सिनेमाकथेत व्हिलन ठरणारे खऱ्या आयुष्यात हिरो ठरतात. रिल व्हिलन ते रिअल हिरो अशी ओळख मिळवलेल्या सोनू सूदचे नावही अशाच संवेदनशील कलाकारांच्या पंक्तीत आले आहे. आज ३० जुलै रोजी अभिनेता सोनू सूद वयाची ४७ वर्षे पूर्ण करत आहे. खरंतर वाढदिवस म्हणजे शुभेच्छा आणि गिफ्टचा वर्षाव. यंदाच्या वाढदिवशी सोनू सूदला, त्याने मदत केलेल्या हजारो लोकांनी दिलेल्या शुभेच्छा आजवरच्या वाढदिवसांपैकी अनमोल आणि अविस्मरणीय गिफ्ट ठरली आहे.
सध्या कोरोनामुळे देशभरात उदभवलेल्या परिस्थितीत अनेक मजूर, विद्यार्थी, नोकरदारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारा, गोरगरीब शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे पूर्ण करणारा इतकेच नव्हे तर चाकरमानी मुंबईकरांना मदत करत, त्यांची आर्थिककोंडी करणाऱ्या ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या कानपिचक्या घेणारा सोनू सूद गेल्या दोन महिन्यात चर्चेत आला तो त्याच्या हेल्पिंग हँडमुळेच. आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाइल खरेदी करण्यासाठी बैल विकणाऱ्या शेतकऱ्याची कैफियत ऐकून त्याने थेट त्याला बैलजोडी देण्यासाठी सोनूने मदत केली. बैल घेण्यासाठी पैसे नसलेल्या शेतकऱ्यावर आपल्या दोन तरूण मुलींना नांगराला जुंपण्याची वेळ आली ही बातमी वाचून त्याने शेतकऱ्याला ट्रॅक्टरसाठी पैसे दिले. कोरोनामुळे हातावरचे पोट कसे भरायचे या विवंचनेत असलेल्या मजुरांना सुरक्षितपणे त्यांच्या गावच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू धावला. इतकेच नव्हे तर, त्याने आपले जुहूमधील हॉटेल कोरोनायोद्धा डॉक्टरांसाठी खुले केले. काही जाहीरातींमध्ये मॉडेलिंग, शंभरभर सिनेमांची शिदोरी, हॉटेलिंग व्यवसायातून होणारी कमाई या आधारावर सोनूने हे मदतकार्य सुरू केले आणि त्याला समाजातील समविचारी लोकांकडून प्रतिसाद येत गेला.
सोनूची कर्मभूमी जरी बॉलीवूड आणि टॉलीवूड असली तरी तो जन्माने पंजाबी मुंडा आहे. पंजाबमधील मोगा या शहरात त्याचा जन्म झाला. लहानपणी शाळेत असताना त्याला अभिनय करायला आवडायचंच पण मॉडेलसारखे कॅटवॉक करण्यातही त्याला रस होता. पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण त्याने नागपूर येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये पूर्ण केले. कॉलेजमध्येही कल्चरल इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचा. सहा फूटापेक्षा जास्त उंची, तगडी शरीरयष्टी आणि स्टाइलबाज राहणीमान यामुळे त्याला अभिनयात करिअर करावे असे स्वप्न खुणावू लागले. त्यासाठी त्याने कॉलेजमध्ये असतानाच काही जाहिरातींसाठी मॉडेलिंग केले. मिस्टर इंडिया या स्पर्धेत सोनूने टॉप फाइव्हमध्ये स्थान पटकावले.
सिनेमात काम मिळवण्यासाठी त्याने मुंबई गाठली. जेव्हा तो नागपूरमधून अभिनयाच्या ओढीने मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त ५५०० रूपये होते. नवं काम मिळेपर्यंत हे पैसे पुरवण्यासाठी त्याने सहा जणांमध्ये एक रूम शेअर केली. लोकल ट्रेनचा पास काढला आणि ऑडीशन देणं सुरू झालं.
संघर्ष सुरू असतानाच १९९९ साली सोनूला काजलघर ही तामिळ फिल्म मिळाली. पुढची दोन वर्षे तो टॉलीवूडमध्येच रमला असताना २००२ साली त्याला शहीद ए आझम या सिनेमासाठी भगतसिंगच्या रोलची ऑफर आली. हिंदी सिनेसृष्टीतला हाच सिनेमा सोनूसाठी पहिला ब्रेक ठरला. त्यानंतर तामिळ, तेलुगू, कन्नड सिनेमांबरोबरच सोनूची हिंदी सिनेमातही घडी बसली. कहा हो तुम, मिशन मुंबई, युवा, आशिक बनाया आपने, सिसकियाँ, डिव्होर्स, जोधा अकबर, सिंग इज किंग, एक विवाह ऐसा भी, ढुंढते रह जाओगे, दबंग, मॅक्झीमम, बुढ्ढा होगा तेरा बाप, शूटआउट अॅट वडाला, कुछ दिन कुछ पल आणि रमय्या वस्तावय्या या सिनेमातील त्याच्या भूमिका गाजल्या. भूमिकेच्या लांबीपेक्षा त्याने अभिनय आणि पडद्यावरच्या सरस वावराने ती लक्षात राहील यासाठी केलेले प्रयत्न सूज्ञ प्रेक्षकांना भावले. अरूंधती या तेलुगू सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर दबंग सिनेमातील त्याच्या छेदी सिंह या भूमिकेवर आयफा अॅवार्ड पुरस्काराने मोहर उमटवली आहे.
हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड सिनेमाक्षेत्रात सोनूने अधिकांश भूमिका या खलनायकाच्या केल्या आहेत. पण अभिनयात खलनायक म्हणून सिनेमांची माळ लावणाऱ्या सोनू सूदने कोरोनाकाळात गुंफलेला माणुसकीचा धागा त्याला नवे समाधान देणारा आहे.
-अनुराधा कदम