‘हरहुन्नरी’ असा आपला तुषार साळी सगळ्यातच भारी !
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका अनेकांना आवडत आहे. त्यात विक्रम ही भूमिका साकारली आहे ‘तुषार साळी’ या अभिनेत्याने.तुषार हा बी एम एम चा विद्यार्थी असून त्याने भवन्स महाविद्यालय, अंधेरी येथून ‘जाहिरात’ या विषयात स्पेशलायजेशन करून बी एम एम ची पदवी मिळवली. त्याने ‘नटसम्राट’ नाटकात बुटपॉलीशवाल्याची भूमिका केली होती. त्याने मुंबई विद्यापीठातुन नाट्यशास्त्र विभागातून एम ए देखील केले. तेव्हा खरं तर ‘काटा रुते कुणाला’ ही त्याची मालिका सुरु होती. पण मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्र करताना कोणत्याही बाहेरच्या मालिकेत काम करायचे नाही, असा नियम असल्याने तुषारला ती मालिका सोडावी लागली.
भवन्स कॉलेजमध्ये असताना तुषारने ‘इप्टा’ स्पर्धेकरिता ‘समाचार’ एकांकिका केली होती. त्याकरिता क्रिटिक पुरस्कार देखील त्याला मिळाला होता. तुषारने भवन्स कॉलेजमध्ये नाट्यविभागात प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते. त्यानंतर तुषारने मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात काही ठिकाणी नोकरी केली. त्याने ‘वॉटर’ हा स्वतःचा ब्रँड विकसित करून त्या अंतर्गत ‘सलून आणि स्पा’ देखील सुरु केले. शिवाय हापूस आंब्यांची ऑनलाईन विक्री करण्याची अभिनव कल्पना देखील त्याने राबवली.
तुषार हा अतिशय मेहनती आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आपण नक्की काहीतरी चांगलं करायचं हे त्याचे ध्येय होतेच. ‘खाना खजाना’ या कार्यक्रमासाठी तो एक्सीक्युटीव्ह प्रोड्युसर देखील होता. पण कॅमेऱ्याच्या मागे काम करण्यापेक्षा कॅमेऱ्यासमोर देखील काम करायची त्याची जिद्द होती. त्याने ‘स्टार प्रवाह’ वरील ‘छत्रीवाली’ मध्ये ‘अनिकेत’ ही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली. तसेच कृपासिंधू, आदिशक्ती, ही वाट दूर जाते, ब्रह्माण्डनायक, लक्ष्य, आम्ही दोघे राजाराणी अशा विविध मालिकांत त्याने वैविध्यपूर्ण भूमिका केली. ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत त्याने ‘नारदमुनी’ साकारले. तो म्हणतो, “माझ्या बाबतीत काय योग आहे, माहित नाही, पण मी आतापर्यन्त चार प्रोजेक्ट्मध्ये नारदमुनींची भूमिका केली आहे”.
हे हि वाचा : महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.
‘फुलाला सुगंध मातीचा’ विषयी सांगताना तुषार म्हणतो, “लॉकडाऊनच्या काळात मी खूप अस्वस्थ होतो. आर्थिक दृष्ट्या समस्या नव्हती,पण अभिनयाची असलेली आवड अस्वस्थ करत होती. मी हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. ऑडिशन दिली आणि मग माझी ‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील विक्रम या भूमिकेसाठी निवड झाली. मला नकारात्मक भूमिका साकारणे जास्त आव्हानात्मक वाटते”. तुषार कास्टिंग दिग्दर्शक म्हणूनही कार्यरत असून एम एक्स प्लेअर वरील एका मालिकेचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर देखील आहे. रिअल इस्टेट व्यवसायात सुद्धा तो कार्यरत आहे.
आणखी एक आनंदाची गोष्ट ही की मुंबई प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या चित्रपट – साहित्य – कला – संस्कृती विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी तुषारची नुकतीच नियुक्ती झाली आहे. असा हरहुन्नरी कलावंत तुषार या क्षेत्रात लोकप्रिय होतोय, हे नक्की.