हेमंत ढोमे: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुगुणी कलावंत
वडील पोलीस अधिकारी असल्याने हेमंतनेही पोलीस किंवा सैन्यदलात भरती व्हावं, असं त्याच्या घरच्यांना वाटत होतं मात्र हेमंतच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दहावीपर्यंत ठीकठाक अभ्यास केलेल्या हेमंतला अकरावीला पुण्याच्या गरवारे कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि तिथेच त्याची रंगभूमीशी खऱ्या अर्थाने ओळख झाली.
नाट्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकाची हाक त्याच्या कानावर येऊ लागली आणि त्याने नाटकांमध्ये स्वतःला झोकून दिलं. अल्पावधीतच त्याने त्याच्या अभिनयाने फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक इत्यादी स्पर्धांमधील एकांकिका गाजवल्या.
लहानपणापासूनच वडिलांच्या फिरत्या नोकरीमुळे त्याला वेगवेगळ्या गावांमध्ये राहावं लागल्याने त्याची निरीक्षणशक्ती चांगलीच विकसित झाली होती आणि तिचा उत्तम फायदा तो त्याला मिळालेल्या भूमिका वठवताना करून घेत होता. कॉलेजमध्ये असताना त्याला एकांकिका आणि नाटकांपेक्षा पथनाट्यासाठी अभिनय करणं जास्त आवडायचं, कारण त्यातून समाजप्रबोधनाचे धडे दिले जायचे. सामाजिक भान जपणाऱ्या मराठी कलाकारांमध्ये हेमंतचं (Hemant Dhome) नाव आज अग्रक्रमाने घेतलं जातंय, याचं मूळ श्रेय निर्विवादपणे याच पथनाट्यांना जातं. पुढे ‘समन्वय’ नाट्यसंस्थेच्या माध्यमातून हेमंतसाठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीची दारे उघडली गेली. त्यादरम्यान, त्याच्यातील अभिनेत्याबरोबरच एक सर्जनशील लेखकही बहरत गेला आणि ‘लूज कंट्रोल’ हे त्याने लिहलेलं ‘पहिलंवहिलं’ व्यावसायिक नाटक रंगभूमीवर अवतरलं. लैंगिक शिक्षण आणि भावनांसारखा संवेदनशील विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणारं हे नाटक परदेशातही नाट्यरसिकांच्या पसंतीस उतरलं.
एव्हाना त्याने प्रशासकीय अधिकारी व्हावं ही इच्छा त्याच्या बाबांच्या मनात जोर धरू लागली. बाबांचं ऐकून त्याने त्या परीक्षांसाठी लागणारी पूर्वतयारी आणि अभ्यासही सुरू केला पण त्याचं मन मात्र नाटकांकडेच धाव घेत होतं. त्यादरम्यान वन्यजीवन आणि प्राण्यांमध्ये विशेष रुची असल्यामुळे लंडनला जाऊन त्याने या विषयात त्याची मास्टर्स डिग्री मिळवली आणि त्यानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे रंगभूमीला अर्पण केलं. सुरुवातीला घरातून थोडा विरोध झाला खरा, पण हेमंत त्याच्या मतावर ठाम राहिला आणि त्याची ही निवड किती योग्य होती, ते त्याने सिद्ध करूनही दाखवले. तो नवनवी नाटके लिहू लागला आणि त्यांतून अभिनयही करू लागला. लेखन आणि अभिनयाची कसरत चालू असताना त्याला दिग्दर्शनही करावंसं वाटत होतं पण यावेळी त्याने हे प्रकरण सबुरीने हाताळायचं ठरवलं आणि दिग्दर्शनाचा जमेल तसा अभ्यास चालू ठेवत पुन्हा एकदा लेखन आणि अभिनयाकडे स्वतःचं लक्ष्य केंद्रित केलं.
२०१0 मध्ये आलेला सचित पाटील दिग्दर्शित ‘क्षणभर विश्रांती’ (Kshanbhar Vishranti) हा हेमंतचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्याने अभिजीत नावाच्या एका कवीमनाच्या युवकाची भूमिका साकारली होती. सचित पाटील, सिद्धार्थ जाधव यांच्या जोडीने हेमंतने आपल्या सहज अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याचदरम्यान, हेमंतने आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘सतरंगी रे’साठी पटकथा आणि संवादलेखनही केले. त्यानंतर आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (२०१२) आणि ‘मंगलाष्टक वन्समोअर’ (२०१३) मधली त्याने साकारलेली विशाल मोहिते आणि निख्या ही अतरंगी पात्रे त्यांच्या सतरंगी स्वभावांमुळे लक्षात राहतात. या दोन चित्रपटांच्या मधल्या कालखंडात हेमंत ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वात प्रियदर्शन जाधवसोबत स्पर्धक म्हणून झळकला आणि त्या पर्वात आपल्या हास्यविनोदांनी धुमाकूळ घालत या जोडीने उपविजेतेपद पटकावले.
‘फू बाई फू’मुळे विनोदी अभिनेता म्हणून घरोघरी पोहोचलेला हेमंत ‘हुतूतू’ (२०१४), ‘आंधळी कोशिंबीर’ (२०१४) आणि ‘काय राव तुम्ही’ (२०१५) या चित्रपटांमध्येही विनोदी बाजाच्याच भूमिका साकारताना दिसला. ‘हुतूतू’ आणि ‘आंधळी कोशिंबीर’च्या निमित्ताने हेमंतला त्याचा आदर्श असणाऱ्या अशोक सराफांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर वर्षा उसगांवकर, वंदना गुप्ते, श्रीकांत मोघे, रवींद्र महाजनी, सतीश पुळेकर आणि यतीन कार्येकरांसारख्या दिग्गज कलावंतांसोबतही त्याला स्क्रीन शेअर करता आली. आता हेमंतसारखा गुणी अभिनेता व लेखक फक्त विनोदी पात्रांमध्येच अडकून पडतो की काय अशी शंका प्रेक्षकांना येऊ लागली. पण केदार गायकवाड दिग्दर्शित ‘ऑनलाईन बिनलाईन’मध्ये त्याने साकारलेल्या ‘आयडिया’ने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. हे पात्रही विनोदी ढंगाचं असलं तरी त्याला एक ग्रे शेड होती, जिचा प्रभाव निश्चितच प्रेक्षकांवर पडला आणि ‘ऑनलाईन’पेक्षा हे ‘बिनलाईन’ पात्रच भाव खाऊन गेलं.
२०१६मध्ये आलेल्या ‘पोश्टर गर्ल’ (Poshter Girl) साठी हेमंतने कथा, पटकथा, संवादलेखनाची जबाबदारी तर सांभाळलीच, त्याचबरोबर त्याने या सिनेमातील सुरज चोंधेची व्यक्तिरेखाही उत्तमरित्या वठवली. ‘क्षणभर विश्रांती’मध्ये त्याने साकारलेल्या अभिजीतसारखीच ही भूमिका होती. या चित्रपटात स्त्रीभ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयाला विनोदाची फोडणी देऊन प्रेक्षकांपर्यंत नेमका मतितार्थ पोहचवण्याचे शिवधनुष्य हेमंतने लीलया पेलले. पुढच्याच वर्षी, ‘बघतोस काय…मुजरा कर’सारखा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा देऊन हेमंतने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. सत्तापिपासू राजकारण्यांकडून छत्रपतींच्या नावाचा सर्रास फायदा उठवला जातो, पण हे टाळून छत्रपतींच्या दूरदृष्टीचा, त्यांनी जिंकलेल्या, बांधलेल्या आणि जपलेल्या किल्ल्यांचा वापर जनहितासाठी करता यायला हवा हे मर्म हेमंतने जाणलं आणि त्याच्याच सिद्धहस्त लेखणीतून ‘बघतोस काय मुजरा कर!’ कागदावर अवतरला. या चित्रपटाद्वारे लेखन आणि दिग्दर्शनात बाजी मारलेल्या हेमंतने अभिनयातही आपण कमी नाही हे दाखवत समशेर पाटील ही रगेल आणि धूर्त विरोधी पक्षनेत्याची खलनायकी भूमिका साकारली.
२०१९मध्ये हेमंतने संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’चा सिक्वेल दिग्दर्शित केला, जो ‘ये रे ये रे पैसा २’ या नावाने थिएटर्समध्ये रिलीज झाला. अनेक स्टार कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही पण आपल्या विनोदी कथेच्या आणि कलाकारांच्या अभिनयाच्या आधारावर प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित ‘फुगे’ (२०१७) असो वा सतरंगी रे, पोश्टर गर्ल आणि बघतोस काय मुजरा कर’ हे तीन सिनेमे असो, आपल्या पटकथा आणि संवादलेखनातून हेमंत त्याचं वेगळेपण कायमच जपत आलाय. त्याने लिहलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘सातारचा सलमान’ आता प्रदर्शनाच्या मार्गावर असून, त्यासोबतच त्यानेच दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा’ (Zimma) हा मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित नायिकांच्या भूमिका असलेला चित्रपटही लवकरच थिएटर्समध्ये झळकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रंगभूमी आणि नाटक हेच पहिलं प्रेम असलेल्या हेमंतची ‘सावधान! शुभमंगल’, ‘सगळे उभे आहेत’, ‘नवा गडी, नवे राज्य’ आणि ‘घोळात घोळ’सारख्या नाटकांमधली यशस्वी घोडदौड प्रेक्षकांनी याआधीही अनुभवली आहेच. त्याच्या एका नाटकाचं लेखन अंतिम टप्प्यात आलं असून, तेही लवकरच नाट्यप्रेमींना अनुभवता येणार आहे, असा अंदाज त्याने मागील काही मुलाखतींमध्ये व्यक्त केला होता.
वेगवेगळ्या सामाजिक विषयांना त्यांचा मूळ मतितार्थ ढळू न देता मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात हेमंतचा हातखंडा आहे. ताज्या घडामोडींवर तो कायमच उत्कटतेने भाष्य करत, त्याच्यातील कलाकाराचे समाजभान जागृत असल्याची प्रचिती देत असतो. त्याचं श्वानप्रेम, खवैय्येगिरी, दोस्तीयारी आणि प्रगल्भ सामाजिक जाणिवांचं दर्शन मराठी रसिक प्रेक्षकांना कायमच घडून येत असतं. प्रत्यक्षात मनाने हळवा, समजूतदार आणि कलेपायी सच्ची निष्ठा ठेवणारा हा बहुगुणी कलाकार आज पस्तीस वर्षांचा झाला आहे.
कलावंतामधील ‘माणूसपण’ जपणाऱ्या या रंगभूमीच्या उपासकाला कलाकृती मिडियाचा मानाचा मुजरा!!