कलाकार झाले निर्माते !
मार्चमध्ये कोरोनामुळे सर्व मालिका आणि नव्या सिनेमांचे शूटींग थांबले. लॉक डाऊनच्या काळामध्ये अनेक कलाकार केवळ फोनाफोनी आणि संपर्कातून काही नवीन करता येईल का असा विचार करत होते , आणि जेव्हा खरच लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा लाईट कॅमेरा अँक्शन असा सूर सेटवर घुमायला लागला त्याच्यानंतर असं दिसून आलंय की अनेक कलाकार निर्मात्याच्या भूमिकेत आले आहेत.
अभिनय करत असताना अनेक कलाकारांना नेहमीच दिग्दर्शनाचे किंवा निर्मितीचे स्वप्न खुणावत असते हे आपण आजपर्यंत पाहिले आहे. अभिनयाचा अनुभव गाठीशी घेत असताना पडद्यामागचे अनेक अनुभव देखील कलाकारांना मिळत असतात आणि त्या अनुभवाचं सोनं करण्यासाठी अनेक अभिनेत्यांनी, अभिनेत्रीनी निर्माती म्हणून आपलं करिअर हे लॉकडाऊन नंतर सुरू केल्याचं दिसून येत आहे.
यामध्ये मनवा नाईक, सुबोध भावे, तेजपाल वाघ आणि आदिनाथ कोठारे हे निर्माते मराठी मालिका विश्वात दाखल झाले आहेत.
आपण आजूबाजूला नेहमी पाहतो की वजनाने जाड असलेल्या मुलींचे लग्न ठरवणे ही खरेच आई-वडिलांसाठी एक वेगळीच कसरत असते. सध्या मुलांच्या लग्नाविषयी च्या बद्दलच्या अपेक्षा आणि आपली बायको ही स्लिम असावी ही अपेक्षा वाढत आहे.
अशा या अपेक्षामध्ये जाडजूड असलेल्या मुली बसत नाही आणि मग त्यांचं लग्न मागे पडत जातं. समाजातल्या याच वास्तवावर सध्या, सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मराठी सिनेमा मालिका यामध्ये अभिनयात स्थिरावलेली मनवा नाईक ही या मालिकेची निर्माती आहे. आतापर्यंत अभिनय करत ती कॅमेऱ्यासमोर आपल्याला दिसायची मात्र आता सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची निर्माती म्हणून तिने ऑफ कॅमेरा जबाबदारी सांभाळत एका वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे.
अक्षया नाईक ही हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री या मालिकेची नायिका आहे आणि ती तिने मालिकेसाठी वजन वाढवून व्यक्तिरेखेला कृत्रिमपणा न आणता खरोखरच वजनाने झाड असलेल्या मुलीची या नायिके साठी निवड करून पहिल्याच निर्मिती असलेल्या मालिकेत आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
या मालिकेने पहिल्या भागापासून घेतलेली पकड पाहता मनवा नाईकचा निर्णय निर्माती म्हणून योग्य होता असेच म्हणावे लागेल.
सध्या लग्न ही संकल्पना वेगवेगळ्या अंगाने आपल्यासमोर येत आहे आणि त्या पैकीच एक म्हणजे आता कांदेपोहे हा कार्यक्रम ऑनलाईन व्हायला लागलेला आहे. वेगवेगळ्या मॅट्रिमोनी साइटवर अपलोड केलेले फोटो पाहून आपल्या आयुष्याचा जोडीदार पसंत करणारी पिढी आजच्या तरुणाईचा प्रतीक आहे आणि त्यांच्या लग्नाविषयीच्या कल्पना काय आहेत हा सध्याचा अगदी ताजा विषय शुभमंगल ऑनलाइन या मालिकेमधून समोर आला आहे.
नेहमीच काहीतरी वेगळं करणाऱ्या आणि शोधणाऱ्या अभिनेता अशी ओळख असलेल्या सुबोध भावे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे आणि आजपर्यंत पहिले कधीच एकत्र न आलेली आलेली जोडी सुबोधने या मालिकेसाठी निवडली आहे. यंदा कर्तव्य असलेल्या दोन लग्नाळू तरुण-तरुणींना ऑनलाईन माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये सहजीवन फुलवणे हा हटके विषय सुबोधने या मालिकेच्या निमित्ताने मांडला आहे. ही मालिका देखील वेगळ्या विषयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.
जेजुरीचा दैवत खंडोबा यावर आधारित मालिका लोकप्रिय झाल्यानंतर कोठारे व्हिजन पुन्हा निर्मितीमध्ये उतरले असून यावेळी देखील त्यांनी ज्योतिबा राया ची महती दाखवून देणाऱ्या दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका निर्माण केली आहे.
मात्र या मालिकेच्या निर्मितीची धुरा ही महेश कोठारे यांच्याकडे नसून त्यांचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आतापर्यंत आदिनाथला आपण अभिनय करताना पाहिलेच आहे अर्थात घरीच निर्मिती संस्था असल्यामुळे त्याला निर्माता म्हणून आवश्यक असणाऱ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु स्वतंत्रपणे निर्माता म्हणून आदिनाथ ज्योतिबा या मालिकेच्या निमित्ताने नवी जबाबदारी स्वीकारणार आहे. ज्योतिबा या मालिकेचे सर्व चित्रीकरण कोल्हापुरातील चित्रनगरी येथे होणार असल्याने या ठिकाणी भव्य सेट लागला आहे. ज्योतिबाचे लाखो भक्त असल्यामुळे ज्योतिबाची कथा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांसाठी आदिनाथ निर्माता म्हणून समोर आला आहे. आतापर्यंत अभिनेता म्हणून त्याने काम चांगले केले असले तरी निर्माता म्हणून तो किती यशस्वी ठरतोय हे ज्योतिबाच्या आशीर्वादाने दिसून येईल.
लागिर झालं जी या मालिकेच्या लेखनाची धुरा सांभाळणाऱ्या तेजपाल वाघ यांनी नव्या मालिकेतून निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे. तेजपाल हा अभिनेता लेखक दिग्दर्शक अशा तिन्ही जबाबदारी आजपर्यंत सांभाळत होता, मात्र निर्मितीमध्ये त्याने आत्तापर्यंत काम केलं नव्हतं . कारभारी लय भारी ही नवी मालिका घेऊन तो निर्माता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. राजकारण आणि प्रेम या दोन गोष्टींची सांगड घालणारी ही मालिका त्यांनी निर्मिती करण्यासाठी निवडली आहे . लागिर झालं जी या मालिकेमध्ये विकिची भूमिका करणारा निखिल चव्हाण आणि तेजपाल हे दोघे चांगले मित्र आहेत त्यामुळे आपल्या पहिल्याच निर्मिती असलेल्या मालिकेत निखिलची निवड मुख्य नायक म्हणून केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आपण राजकारण या विषयाला अनेक पैलू असल्याचे पाहतो. राजकारणामध्ये जसे हेवेदावे असतात तसेच प्रेमाचा अंकुर ही फुलताना आपल्याला दिसत असतो. राजकीय नेता म्हणून हजारो लोकांसमोर रोखठोक बोलणारा नेता हा प्रियकर म्हणून किती हळवा असू शकतो हे दाखवणारी ही मालिका आहे, आणि तेजपाल वाघ संवाद लेखनात बाप माणूस असल्यामुळे निर्माता म्हणून तो या मालिकेतील संवादाकडेही विशेष लक्ष देणार आहे. यानिमित्ताने कॅमेरासमोर अभिनय करणारे चार प्रसिद्ध कलाकार निर्माते म्हणून कॅमेऱ्याच्या मागे गेले असले तरी त्यांच्या मालिकेच्या मांडणीतून त्यांच्यातील अभिनेत्याची नजर ही नक्कीच दिसून येणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आता आपले आवडते अभिनेते-अभिनेत्री हे निर्माते म्हणून किती चांगले काम करत आहेत हे पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.
- अनुराधा कदम