दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
आईची माया असे सर्वत्र, तिच्या भूमिकेसाठी अंकिताच पात्र
सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ ही मंजिरी सुबोध भावे निर्मित मालिका खूप लोकप्रिय होत आहे. यात शर्वरीच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजेच अंकिता जोशी- पनवेलकर. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की अंकितानेच ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मध्ये बाळूमामांच्या आईची भूमिका केली होती.
अंकिताला खरे तर एअर होस्टेस व्हायचे होते. तिचा त्या संदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. ती सहज म्हणून अभिनय क्षेत्राच्या संदर्भातील एका सेमिनारला गेली होती. तिथे गेल्यावर या क्षेत्राची तिला आवड निर्माण झाली आणि तिने सुरुवातीला सह्याद्री वाहिनीवरील ‘समिधा’ मालिकेत तसेच ‘लक्ष्य’ मध्ये देखील छोटी भूमिका केली. ‘असं सासर सुरेख बाई’ मध्ये ‘केतकी’ ची भूमिका केली. ‘जय मल्हार’ मध्ये देखील तिने काम केले होते आणि ते काम सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माते संतोष अयाचित यांच्या लक्षात होते.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत काम करशील का, असे अंकिताला संतोष अयाचित यांच्याकडून विचारण्यात आले. बाळूमामा हे खूप मोठे संत आहेत आणि त्यांच्या आईची भूमिका करणे हे खूप मोठे आव्हान होते. त्यामुळे सुरुवातीला अंकिताला ही भूमिका करताना टेन्शन आलं होतं. अंकिता म्हणाली, “या मालिकेच्या निमित्ताने मला बाळूमामा यांच्याविषयी कळले. अनेक जण बाळूमामांना मानतात आणि त्यामुळे संतांच्या आईची भूमिका करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती. पण जसजशी मालिका सुरु झाली आणि लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, तेव्हा जाणीव झाली की आपले काम लोकांना आवडत आहे. अनेक जण मला म्हणाले की ‘बाळूमामांच्या आईंना आम्ही पाहिले नाही, पण बाळूमामांची आई म्हणून तुम्ही आम्हाला डोळ्यांसमोर दिसत असता’. ही प्रतिक्रिया मला मानसिक समाधान देणारी होती”.
हे हि वाचा : १४८ वर्षांचे अभिजात नाटक : संगीत सौभद्र
बाळूमामा मालिकेतील अंकिताचे काम संपले आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मध्ये सायली संजीव (शर्वरी) च्या आईच्या भूमिकेसाठी तिला विचारले गेले. पुन्हा एकदा आईची भूमिका मिळणार होती. पण बाळूमामांची आई आणि शरयूची आई यात प्रचंड फरक होता. शर्वरी ही आजच्या काळातील मुलगी आहे आणि शरयूची आई ही आत्ताच्या काळातील व्यक्तिरेखा आहे. शर्वरीची आई साकारताना सुद्धा अंकिताला खूप आनंद होत आहे आणि लोकांना सुद्धा ही भूमिका आवडत आहे. दिवाळीच्या दिवसातील आठवण सांगताना अंकिता म्हणाली, “माझ्या लहानपणी मी काही वर्षे मुरुड जंजिरा येथील घरात राहत होते. आमचे नातेवाईक पुण्यात होते. त्यामुळे दिवाळीची सुट्टी लागली की पंधरा वीस दिवस आम्ही पुण्याला जायचो. तिथे आम्ही भावंडं किल्ले तयार करायचो. मग दिवाळीला भेट म्हणून मोठ्यांकडून पाकीट मिळायचे, भावांकडून भाऊबीज मिळायची. मग ते पैसे मी साठवून ठेवायचे. रांगोळी काढणे, पणत्या लावणे, हे सगळं मला आठवत आहे”. वैविध्यपूर्ण भूमिका करत रहाव्यात आणि आपल्या भूमिकांमुळे आपली चांगली ओळख व्हावी, असे अंकिताला वाटते.