ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
नम्र, गुणी आणि डॅशिंग जानकी…
सोपं नव्हतं, त्या मादी श्वानाकडून चित्रपटात काम करवून घेणं. एरवी, कित्येक चित्रपटांत प्राण्यांच्या भूमिका आहेत. मात्र, ते प्रशिक्षित असतात. लिसीचं तसं नव्हतं. ती माथेरानमधली लॅब्राडॉर जातीची घरगुती मादी श्वान होती.
सेटवर ती सुरुवातीला आली तेव्हा गोंधळली. मात्र, दोन-तीन दिवसांत ती सर्वांत चांगलीच मिसळली. तिला आपलंसं करण्यात संपूर्ण युनियटचं यश होतं. मात्र, यात मोठा वाटा होता तो जानकीचा. चित्रपटात जानकी अन् लिसीमधील जवळीकच केंद्रस्थानी आहे. जानकी मुळातच कमालीची नम्र, कामाप्रती प्रामाणिक आणि कुणालाही आपलीशी वाटणारी. त्यामुळे लिसीला या सर्वांत सामावून घेणं तिला कठीण गेलंच नाही.
जानकी पाठक… मनोरंजनाच्या क्षेत्रातील आता सुपरिचित चेहरा. जानकी पाठक अन् लिसीची ही जी केमिस्ट्री सांगितली, ती ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची आहे. २०१८ साली आलेला हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. त्यात दोन वेण्या घातलेली तेजूच्या भूमिकेतील जानकी सर्वांना आठवत असेल. तिचा ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘झोंबिवली’ हा प्रवास तेवढाच रोचक आहे.
‘झोंबिवली’तील रिपोर्टर अंजली म्हात्रे हीच ‘व्हॅनिला…’ मधील तेजू आहे, यावर विश्वासही बसणार नाही, एवढा व्यापक बदल तिनं स्वत:त करवून घेतलाय. अर्थात, यामागे प्रचंड मेहनत अन् कामाविषयी असलेली तिची निष्ठा आहे. ‘व्हॅनिला…’चं चित्रीकरण सुरू होतं, तेव्हा ती सतरा वर्षांची होती. वजनही अधिक होतं.
या चित्रपटानंतर तिनं आपलं करिअर अधिक गांभीर्यानं घेतलं. अनुपम खेर यांच्या इन्स्टिट्युटमधून तिनं अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं आहे. सोबतच फिटनेसवर तिनं अधिक भर दिला. शैलेश परुळेकर यांच्या कांदिवलीतील जिममध्ये जाऊन मेहनत घेतली, वजन २० किलोंनी कमी केलं. नंतर जानकी पाठक आपल्यापुढं नव्या दमानं, नव्या रूपात दाखल झाली.
जानकीचे बाबा गिरीश विश्वनाथ हे जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत, तर आई मनीषा पाठक डॉक्टर. आपल्याला अभिनेत्री व्हायचं, हे जानकीनं वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ठरवलं. आई सुरुवातीच्या काळात नाटकांतून कामं करायची. त्यांचंही स्वप्न मनोरंजन क्षेत्रात येण्याचं होतं. मात्र, बारावीला मार्क अधिक मिळाले अन् त्यांना वैद्यकीय क्षेत्राकडे वळावं लागलं.
एके दिवशी जानकीनं ‘मला अभिनेत्री व्हायचंय’, असं घरी जाहीर करून टाकलं. कलाक्षेत्रात कार्यरत बाबा आणि अभिनयक्षेत्राची आवड असलेली आई या दोघांनाही तिच्या या निर्णयानं आनंदच झाला. आपल्या राहून गेलेल्या इच्छा मुलगी पूर्ण करणार, याचं समाधान आई मनीषा यांना होतं. वडील गिरीश यांनाही आता सिनेसृष्टीत प्रवेश करायचा होता. त्यासाठी जाहिरात क्षेत्रातली नोकरी सोडायची का, असा प्रश्न होता. त्यावेळी, ‘काळजी करू नका, मी आहे. तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करा’, असा विश्वास मनीषा यांनी दिला. हा माझ्यासमोर वेगळाच आदर्श होता, असं जानकी अभिमानानं सांगते.
विशेष म्हणजे, ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ हा चित्रपट जानकीचे बाबा गिरीश विश्वनाथ यांनीच दिग्दर्शित केला आहे. नायिका म्हणून जानकीचा आणि दिग्दर्शक म्हणून गिरीश या बापलेकीचा हा पहिलाच चित्रपट.
“सेटवर मुलगी म्हणून तुझे लाड पुरविले गेलेत का”, असं विचारल्यावर जानकी पाठक सांगते, “अजिबात नाही. उलट बाबांनी स्पष्ट सांगितलं की सेटवर मी दिग्दर्शक आहे आणि तू अभिनेत्री. त्यामुळे सगळं वातावरण पूर्णत: शिस्तीचं होतं. काम आणि व्यावसायिकता याचं गांभीर्य मला तिथं शिकायला मिळालं. माझा तो पहिला चित्रपट होता. सिनेमा म्हणजे फक्त कलावंत, दिग्दर्शकाचाच असतो, असं नाही. तर संपूर्ण टीमची त्यात मेहनत असते, हेही तिथं कळलं. खूप शिकता आलं तिथं. काम कसं केलं पाहिजे, कुणाशी कसं वागलं पाहिजे, याचे धडे मिळत गेले.”
जानकी पाठक सांगते, “व्हॅनिला…’नंतर मी स्वत:ला पॉलिश्ड केले नसते, फिटनेसवर लक्ष दिलं नसतं, तर ‘झोंबिवली’ सारखा बिगबजेट चित्रपट मला मिळालाच नसता. शेवटी, मेहनतीशिवाय पर्याय नाहीच!”
अवघी दीड वर्षाची असताना गणपतीच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये थर्माकॉलची वजनं बनवून, काळी पिळदार मिशी रंगवून पहेलवान म्हणून जानकी उभी राहिली अन् तिला पारितोषिकही मिळालं. नंतर पुरस्कारांची मालिकाच सुरू झाली.
बाबा गिरीश यांनी तेव्हाच तिच्यातील गुण हेरले होते. अनुपम खेर ॲक्टर प्रीपेअर्समध्ये ती दाखल झाली. रोज अपडाउन शक्य नव्हतं. त्यामुळे पंधराव्या वर्षी चार महिने सांताक्रूझला ती पेइंग गेस्ट म्हणून राहिली. अभिनयाच्या क्षेत्रात काहीतरी करण्याची जिद्द तिथं दिसली. ॲकेडमीतून डिप्लोमा घेणारी सर्वात लहान वयाची मुलगी म्हणून अनुपम खेर यांनी तिची पाठ थोपटली होती.
या क्षेत्रात येण्याआधी अभिनयाच्या प्रशिक्षणाची गरज असते का, या प्रश्नावर ती म्हणते, “मुळात अभिनय अंगभूत असावा लागतो. मात्र, स्वत:ला आणखी पॉलिश्ड करायचं असेल, तर प्रशिक्षण अधिक पूरक ठरतं.”
यादरम्यान तिनं ‘एकलव्य’, ‘अंतर्मुख’ ‘हाजरी’ हे चित्रपटही केले. सध्या ती एका डेली सोपच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. भविष्यातील योजना काय, याबाबत ती म्हणते, “विविधांगी, आव्हानात्मक भूमिका साकारून स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध करायचं आहे. ‘व्हॅनिला…’मधील दोन वेण्या घातलेली तेजू ते ‘झोंबिवली’मधील डॅशिंग रिपोर्टर अंजली असा माझ्यातील बदल मला स्वत:लाच भावतो. त्यात सातत्य ठेवायचं आहे.”
अभिनेत्रींपैकी अनुष्का शर्मा आणि तापसी पन्नू यांचा तिच्यावर प्रभाव आहे. तर सुबोध भावे क्रश असल्याचं ती सांगते. “चित्रपटसृष्टी बदलतेय, सोबत प्रेक्षकही. त्यामुळे प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून कलाकृती निर्माण व्हाव्यात. प्रादेशिक चित्रपट अधिक पुढं जातोय, हे आशादायी आहे”, असं ती सांगते.
=====
हे देखील वाचा: लताजींनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं होतं चक्क एका मराठी चित्रपटात!
=====
आणि हो… जानकी हार्ड श्वानप्रेमी आहे. तिच्याकडे तीन श्वान आहेत. तिघांनाही कसं सांभाळतेस, असं विचारल्यानंतर ती सांगते, “त्यांच्याविषयी कमालीचं प्रेम असलं, तर सांभाळ चांगलाच होतो. शेवटी, मनात प्रेम, माया, आपुलकी महत्त्वाची.”
आम्ही तुमच्यापैकीच…
जानकीच्या नम्रपणाचा आणखी एक गुण दिसतो. ती म्हणते, “मनोरंजन क्षेत्रातील कलावंत खूप मोठे वगैरे असतात, असं इतरांना वाटत असतं. मात्र, आम्ही तुमच्यासारखेच आहोत. कुणी इंजिनीअर असतं, कुणी डॉक्टर. कुणी आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतं. तसंच हेही क्षेत्र आहे. उदरनिर्वाहासाठी हा आमचाही व्यवसाय आहे. आफ्टरऑल, प्रत्येकजण आपापल्या जागी बेस्टच असतो.”
दिग्दर्शक मोलाचे…
कलावंताच्या जडणघडणीत दिग्दर्शकाचा वाटा मोठा असतो, ते मोलाचे असतात, असं जानकी सांगते. तिनं वडील गिरीश विश्वनाथ यांच्यासह किशोर बेळेकर, डॉ. सुधीर निकम, आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनात कामं केलीत. ‘प्रत्येकाकडून शिकत गेले, पॉलिश्ड होत गेले’, असं ती म्हणते. ‘झोंबिवली’च्या चित्रीकरणादरम्यानचा प्रसंग तिनं सांगितला.
“जोही सीन करायचे, त्यावेळी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या प्रतिसादाची वाट पाहायचे. सीन आटोपल्यावर आदित्य सर केवळ ‘ओके’ म्हणत. शेवटचा सीन रिपोर्टिंगचा आणि मोठा होता. मराठीतले भारी शब्द त्यात होते. कित्येकदा त्या सीनची रिहर्सल केली. नर्व्हस होते. मात्र, आत्मविश्वासाने सामोरे गेले अन् सीन ओके झाला.
=====
हे देखील वाचा: मी वसंतराव: अवीट गोडीचा सुरेल प्रवास
=====
त्यावेळी म्हणजे चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी आदित्य सरांनी ‘गूड’ म्हणून तारीफ केली. हे कायम स्मरणात राहील. त्यावेळी आदित्य सरांचं वाक्य आठवतं, ‘सतत चांगलं चांगलं म्हणून तुझ्या डोक्यात हवा जाऊ द्यायची नव्हती.” एका कलाकारासाठी याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.
जानकीचं एक फेव्हरेट वाक्य आहे, “हम यहाँ जानकी बाजी लगाते हैं…” पुढं ती या क्षेत्रात बाजी मारेल, असं तिच्या नम्र वाटचालीवरूनच दिसतंच आहे.