
अभिनेत्री Madhavi Nimkar पुन्हा झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !
Star Pravah वरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asat) या मालिकेमुळे एक खलनायिका घराघरात ओळखली गेली आणि ती म्हणजे शालिनी. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकरने इतक्या प्रभावीपणे साकारली की खलनायिका म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा उभा राहत असे. नकारात्मक छटा असूनही या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता मात्र माधवी निमकर नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या आगामी तुझ्या सोबतीने या मालिकेत ती ‘तायडी’ नावाची भूमिका साकारणार असून पुन्हा एकदा ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.(Actress Madhavi Nimkar)

या नव्या भूमिकेबद्दल बोलताना माधवी सांगते की, सुख म्हणजे नक्की काय असतं संपल्यानंतर तिला अनेक नकारात्मक भूमिका करण्याच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र तिला काहीतरी वेगळं, अधिक आव्हानात्मक करायचं होतं. त्यामुळे तिने जाणूनबुजून काही काळ अभिनयापासून विश्रांती घेतली आणि हा काळ कुटुंबासोबत घालवला. तुझ्या सोबतीने मधील तायडी ही व्यक्तिरेखा तिच्या लक्षात भरली कारण ती पारंपरिक खलनायिकेपेक्षा वेगळी आहे. तायडी इतरांच्या भावनांशी खेळून त्यांच्याकडून आपलं काम करून घेण्यात निष्णात आहे. नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या ताकदीवर हवं ते मिळवण्यावर तिचा ठाम विश्वास आहे.

याशिवाय तायडी ही प्रचंड फिटनेसची आवड असलेली स्त्री आहे. खाण्याकडे पाहतानाही ती चवीपेक्षा कॅलरीजचा विचार करते. विशेष म्हणजे, फिटनेसबाबत माधवी स्वतःही तितकीच जागरूक असल्यामुळे या बाबतीत तिला या भूमिकेशी सहज नातं जोडता आलं.(Actress Madhavi Nimkar)
===============================
===============================
नव्या वर्षाची सुरुवात एका नव्या मालिकेसह आणि दमदार भूमिकेसह होत असल्याने माधवी खुप उत्साहित आहे. शालिनीनंतर तायडीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून तितकंच प्रेम मिळावं, अशी तिची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे लवकरच तुझ्या सोबतीने ही नवी मालिका स्टार प्रवाहवर पाहायला विसरू नका.