दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
आव्हान पेलणारी रंजना!
‘नमस्कार माझा या ज्ञानमंदीरा, सत्यम शिवम सुंदरा’ ही प्रार्थना आठवते? किंवा ‘मंगला ग मंगला,’हे ‘गोंधळात गोंधळ’ चित्रपटातील गीत? हे गीत पाहताना आपल्या लक्षात राहते ती या गाण्यातील अभिनेत्री रंजना. अर्थात सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या रंजना देशमुख. त्यांचा जन्म २३ जुलै १९५२ या दिवशी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण परेल इंग्लिश स्कुल मध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण गावदेवी येथील बी एम रुईया गर्ल्स कॉलेज मधून झाले होते. खरे तर आपल्या मुलीने अभिनयात करिअर करण्याला त्यांच्या आई वत्सला देशमुख यांचा विरोध होता.
हेही वाचा : अशी मी ‘मानिनी’
व्ही शांताराम यांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटातून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या आधी त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटात काम केले होते. पुढे ‘झुंज’ चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. त्यातील ‘कोण होतास तू काय झालास तू’ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गीत विशेष लोकप्रिय झालं.
अभिनेते राजा गोसावी आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांनी एकत्र भूमिका केलेला चित्रपट म्हणजे ‘असला नवरा नको ग बाई’. आरती प्रभू म्हणजे चिं त्र्यं खानोलकर यांच्या ‘चानी’ या कादंबरीवर आधारित ‘चानी’ हा चित्रपट आला. यातील कथानक खूप वेगळं होतं यात अर्थातच त्यांनी शीर्षक भूमिका केली. ब्रिटिश अधिकारी आणि मराठी स्त्री यांची मुलगी असलेली ‘चानी’ ची भूमिका त्यांनी उत्तम साकारली.
‘अरे संसार संसार’ या चित्रपटात तर रंजना यांनी खूप मोठा आलेख साकारला होता. कुलदीप पवार हे त्यांचे या चित्रपटातील नायक होते. पत्नी,आई आणि मग सुना आल्यावर त्यांनी साकारलेली वृद्ध सासू असा या भूमिकेचा आलेख होता. या चित्रपटाकरिता त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार मिळाला.
मराठी चित्रपटात विनोदी चित्रपटांचा काळ आला आणि त्यातही त्यांनी आपल्या समर्थ अभिनयाने लोकांचं मन जिंकलं. ‘गुपचूप गुपचूप’ मधील भूमिकेसाठी सुद्धा त्यांना राज्य पुरस्कार मिळाला. गोंधळात गोंधळ चित्रपटात आणि मुंबईचा फौजदार चित्रपटात त्यांच्या धमाल भूमिका होत्या.
‘मुंबईचा फौजदार’ मध्ये त्यांचे नायक होते रवींद्र महाजनी. अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरच्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. हळदीकुंकू, लक्ष्मीची पावले, बिनकामाचा नवरा, एक डाव भुताचा, भुजंग, सासुरवाशीण, गल्ली ते दिल्ली, लक्ष्मी अशा अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका आहेत. ‘खिचडी’चित्रपटातील ‘अहो नऊवारी नऊवारी नऊवारी, ही पैठणी शालू जरतारी’ हे गीतही
लोकप्रिय झालं.
‘झुंजार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांना अपंगत्व आलं.
त्यानंतर खचून न जाता व्हील चेअर वर बसून त्यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकात प्रमुख भूमिका केली. अपंगत्व आल्याने एका मुलीला तिचा प्रियकर सोडून जातो,असे या नाटकाचे कथानक होते. या नाटकाचे त्यांनी जवळजवळ चाळीस प्रयोग केले. खरोखरच त्यांच्या जिद्दीला सलाम करायला हवा.
३ मार्च २००० रोजी रंजना देशमुख यांचं निधन झालं. आपल्या काही वर्षांच्या कारकिर्दीत अनेक आव्हानांना पेलत रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपलं एक सोनेरी पान निर्माण केलं, हे नक्की!