उत्साह व प्रेमाची पहिली वहिली दिवाळी
सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा विवाह तेजस देसाई याच्याबरोबर ११ ऑक्टोबर २०२० या दिवशी झाला. यावर्षीची दिवाळी ही या दोघांसाठी खास असणार आहे. कारण अर्थातच त्यांचा दिवाळसण साजरा होणार आहे.
शर्मिष्ठा म्हणते, “ही दिवाळी खरोखरच आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. लग्नानंतरची ही पहिली दिवाळी असल्याने मोठ्या उत्साहात ती साजरी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा दिवाळसण साजरा होणार आहे माझी बहीण सुप्रिया निरंजन पाटणकर आणि तेजसची बहीण विभूती श्रीतेज खेडेकर या दोघींनी यात पुढाकार घेतला आहे. आमचा दिवाळसण माहेर आणि सासर असा दोन्हीकडून साजरा होतोय. आई बाबा, बहीण सर्वजणच इथे आमच्या घरी आले आहेत. औक्षण करून अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्या ठाण्यातील घरी तसेच तेजसच्या बहिणीकडे देखील दिवाळसण साजरा होईल. तेजसने मला दिवाळीच्या चार दिवसांच्या चार साड्या आधीच गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. मी देखील तेजस साठी पारंपरिक कपड्यांची खरेदी केली आहे.
लग्नाच्या निमित्ताने दागिने, चांदीचे कडे या वस्तूंची आधीच खरेदी झाल्याने दागिने वगैरे सध्या नवीन खरेदी केले नाहीत.”
तेजस म्हणतो, “शर्मिष्ठाचा मनमिळावू स्वभाव मला आवडतो. ती एक उत्तम शेफ आहे. अनेक खाद्यपदार्थ ती करत असते. मी सुद्धा या दिवाळसणासाठी खूप उत्सुक आहे. मी कंदील तयार केला आहे. फटाके वाजवायचे नाहीत, असे आम्ही दोघांनीही ठरवले आहे.”
तेजसच्या स्वभावातील प्रामाणिकपणा हा शर्मिष्ठाला आवडणारा गुण आहे. शर्मिष्ठा फराळाचे पदार्थ उत्तम करते आणि त्याचा तिने एक छोटासा व्यवसाय देखील सुरु केला आहे. बाकरवड्या, गव्हाचे गोड शंकरपाळे हे पदार्थ तिने यावर्षी ऑर्डर घेऊन तयार केले आहेत. शर्मिष्ठाच्या या खाद्यपदार्थांच्या आणि फराळाच्या बिझनेसला तेजसचा खूप पाठिंबा आहे. तेजस स्वतः सेल्स क्षेत्राशी संबंधित असल्याने एखादे उत्पादन चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत कसे पोचवायचे, याचे मार्गदर्शन देखील त्याने केले आहे.
शर्मिष्ठाला संस्कारभारतीची रांगोळी काढायला खूप आवडते. यावर्षी तिने ठिपक्यांची रांगोळी देखील काढण्याचे ठरवले आहे. शर्मिष्ठा आणि तेजस यांच्याकडे त्यांची ‘चिकू’ नावाची एक मनीमाऊ सुद्धा आहे. हे दिवाळीचे क्षण दोघांच्याही आयुष्यात जपून ठेवावे असे असणार आहेत. यावर्षी फटाके वाजवू नका, असे शर्मिष्ठा आणि तेजस या दोघांनीही सर्वांना आवाहन केले आहे.