Junaid Khan आमिर खानच्या मुलाला ‘लाल सिंग चड्ढा’, ‘लापता लेडीज’साठी
मनोरंजनविश्वाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे ‘स्मिता पाटील’
भारतीय सिनेसृष्टीला ११० वर्ष झाले. या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये या क्षेत्राने अनेक दिग्गज लहान मोठे कलाकार पाहिले. प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा उचलेल्या या क्षेत्राचे जगभर कोट्यवधी चाहते आहेत. याच मनोरंजनविश्वाने आपल्याला असा एक तारा दिला ज्याची चमक आणि ख्याती आजही कायम आहे.
स्मिता पाटील महाराष्ट्राची अस्मिता असलेली ही अभिनेत्री खूप कमी वयात या जगाचा निरोप घेऊन गेली. मात्र जाताना मागे ठेऊन गेली तिच्या अनेक आठवणी, तिच्या बहारदार अभिनयाने परिपूर्ण सिनेमे. आज अभिनेत्री स्मिता पाटील यांची ६८ वी पुण्यतिथी. १३ डिसेंबर १९८६ साली स्मिता पाटील यांचे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया स्मिता यांच्याबद्दल अधिक माहिती.
बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील स्मिता पाटील या एक अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी तरुण वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी केवळ अभिनयानेच नाही तर, आपल्या निखळ सौंदर्यानेही लोकांची मने जिंकली. मात्र, त्यांना मिळणारे यश, लोकांचे प्रेम, नवजात मुलाचा श्वास त्यांच्या नशिबी नव्हता. म्हणूनच वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला.
स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी राजकीयदृष्ट्या मोठ्या आणि सधन कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे हास्य पाहून त्यांच्या आई विद्या ताई पाटील यांनी मुलीचे नाव स्मिता ठेवले. हेच हास्य पुढे त्यांची ओळख आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात आकर्षक पैलू बनले. स्मिता पाटील खऱ्या आयुष्यात खूप खोडकर होत्या.
मोटरसायकल आणि जीप चालवणाऱ्या स्मिता पाटील यांची टॉम बायसारखी प्रतिमा होती. मित्र मैत्रिणींसोबत असताना सहज शिव्या घालणे, टिंगल टवळ्या करणे हे त्यांना खूप आवडायचे. पुढे कौटुंबिक दबावामुळे त्या मुंबईत आल्या. इथे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
मुंबईला आल्यानंतर स्मिता यांच्या एका फोटोग्राफीची आवड असलेल्या मित्राने त्याचे काही फोटो काढले. हे पहातो खूपच सुरेख होते. ते फोटो पाहून स्मिता यांच्या मैत्रिणींनी स्मिता यांच्या नकळत ते फोटो वरळी येथील मुंबई दूरदर्शनच्या ऑफिसमध्ये दाखवण्याचे ठरवले. तिथे गेल्यावर दूरदर्शनचे संचालक पी व्ही कृष्णमूर्ती यांनी ते फोटो पाहिले आणि कृष्णमूर्तींनी स्मिता पाटील यांचे फोटो पाहून विचारले ही मुलगी कोण आहे आणि मला तिला भेटायचे आहे.
पुढे स्मिता यांच्या मैत्रिणींनी स्मिता यांना सर्व सांगितले आणि ऑडिशनसाठी बोलावले आहे देखील सांगितले. मात्र त्या तयार नव्हत्या खूप विनवण्या केल्यावर स्मिता तयार झाल्या आणि त्यांनी ऑडिशन दिली. त्या त्यांची निवडही झाली आणि त्या दुर्दर्शनमध्ये वृत्तनिवेदक म्हणून रुजू झाल्या.
स्मिता या मराठी वार्ताहार बनल्या. त्या काळी कृष्णधवल टीव्ही होते. सावळ्या स्मिता, खोल आवाज, गडद भुवया, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि मोठी टिकली यामुळे स्मिता पाटील खूप चर्चेत आल्या. त्यांच्या चर्चा होण्यास सुरुवात झाली. स्मिता पाटील बातम्या वाचताना पाहण्यासाठी मराठी नसलेले लोकं देखील टीव्ही पाहू लागले. मुख्य म्हणजे स्मिता बातम्या वाचताना साडी नेसायच्या मात्र त्या जीन्सवर साडी नेसायच्या.
दूरदर्शनवर श्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांना पाहिले आणि स्मितासोबत चित्रपट करायचे ठरवले. त्यावेळी मनोज कुमार आणि देवानंद यांनाही स्मिता पाटील यांना त्यांच्या चित्रपटात कास्ट करायचे होते. १९७५ मध्ये त्यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर स्मिताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले देवानंद यांनी त्यांच्या मुलाला सुनीलला घेऊन सिनेमा करायचा ठरवले तेव्हा ‘आनंद और आनंद’ या चित्रपटात साईन केले.
अवघ्या दहा वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये स्मिता यांनी तब्बल ८० चित्रपट केले. त्या एकामागोमाग एक असे सुपरहिट सिनेमे करत होत्या. पदार्पणाच्या चार वर्षांनंतर १९७७ मध्ये ‘भूमिका’ चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर १९८० मध्ये ‘चक्र’साठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी १९८५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या स्मिताने राज बब्बरसोबतच्या नात्यामुळेही खूप चर्चेत राहिल्या. स्मिता आणि राज यांची भेट १९८२ मध्ये ‘भीगी पालके’च्या शूटिंगदरम्यान झाली होती, ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. मात्र जेव्हा हे दोघं प्रेमात होते, तेव्हा राज बब्बर हे आधीच विवाहित आणि वडील देखील होते. स्मिता यांच्यावर तेव्हा घर तोडण्याचे देखील अनेक आरोप झाले.
स्मिता यांच्या घरातून देखील राज यांच्यासोबतच्या नात्याला सुरुवातीला विरोध होता. राज बब्बर विवाहित होते. त्यांचा नादिरा बब्बर यांच्याशी विवाह झाला होता. पण स्मितांसाठी राज यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. लोकांकडे याकडे दुर्लक्ष करत त्यांनी राज यांच्याशी गुपचूप लग्न केले.
पुढे २८ नोव्हेंबर १९८६ मध्ये प्रतीकचा जन्म झाला. त्या घरी आल्या त्यानंतर त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले. छोट्या बाळाला घरी ठेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास स्मिता यांचा नकार होता. म्हणूनच त्यांचे इन्फेक्शन वाढले आणि हे इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहचले. तेव्हा त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर स्मिता यांचे एक एक अवयव एकामागून एक निकामी होऊ लागले. काही दिवसांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता यांचा मृत्यू झाला.