Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद यांचा लग्नसोहळा थाटामाटात संपन्न…
मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. अलीकडेच अभिनेत्री रेवती लेले (Actress Revati Lele) हिचा विवाहसोहळा पार पडला आणि आता छोट्या पडद्यावरील आणखी एका गोड जोडीने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली एतशा संझगिरी (Aetashaa Sansgiri) हिने अभिनेता निषाद भोईर (Nishad Bhoir) सोबत २२ फेब्रुवारी रोजी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. एतशा आणि निषादची पहिली भेट ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली. कोल्हापूरच्या निसर्गरम्य वातावरणात सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री हळूहळू घट्ट होत गेली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेला संवाद वैयक्तिक आयुष्यातही रंगू लागला. एका खास क्षणी निषादने एतशासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तिथून त्यांच्या प्रेमप्रवासाची सुरुवात झाली. (Aetashaa Sansgiri Wedding)

विशेष म्हणजे, नातं सुरू झाल्यानंतर काहीच महिन्यांत एतशाने घरच्यांशी या नात्याबद्दल खुलासा केला. दोन्ही कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर त्यांनी चार वर्षे एकमेकांना समजून घेत, नातं अधिक मजबूत केलं. ऑक्टोबर २०२५ मध्ये साखरपुडा पार पडला आणि अखेर आता दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नसोहळ्यात एतशा आणि निषाद दोघांनीही पारंपरिक मराठमोळ्या पेहरावाला पसंती दिली. एतशाच्या नऊवारी साडीतला देखणा अवतार आणि निषादचा साधा पण उठावदार लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. फोटोंमधील दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान त्यांच्या नात्याची गोडी स्पष्ट करत होता. या खास सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.

एतशा संझगिरीने ‘राजा राणीची गं जोडी’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ आणि ‘निवेदिता माझी ताई’ यांसारख्या मालिकांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ‘तुझ्या सोबतीने’मधील तिची भूमिका विशेष गाजत आहे.निषाद भोईरही मराठी मालिकांमधील ओळखीचं नाव आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘आई-मायेचं कवच’ यांसारख्या मालिकांतून त्याने आपली वेगळी छाप पाडली आहे. योगायोगाने ‘निवेदिता माझी ताई’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या दोन मालिकांमध्येही ही जोडी एकत्र झळकली होती. (Aetashaa Sansgiri Wedding)
===============================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat यांची भावनिक पोस्ट…
===============================
एतशा आणि निषाद यांची व्यावसायिक आयुष्यातून सुरू झालेली ओळख आता वैवाहिक आयुष्यात रूपांतरित झाली आहे. चाहत्यांकडून या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वजण मनापासून शुभेच्छा देत आहेत.