ओपरा… मेगन आणि आता प्रियंका…
“इंग्लडच्या राजघराण्यानं रंगभेदावरुन मला त्रास दिला. मी गरोदर असतांना माझ्या मुलाच्या रंगाबद्दल राजघराण्याला शंका होती. या सर्वांचा मला खूप मानसिक त्रास झाला. अनेकवेळा आत्महत्येचे विचार माझ्या मनात आले.” अशी सनसनाटी वाक्ये एका जाहीर मुलाखतीमध्ये बोलून इंग्लडच्या राजघराण्याची धाकटी सून म्हणजेच मेगन मार्कल सध्या भलतीच चर्चेत आली आहे. ओपरा विन्फ्रे यांच्या ओपरा विन्फ्रेस् टॉक शो सुपर सोल मध्ये मेगन मार्कलनं थेट ब्रिटनच्या राजघराण्यावर आरोप केले. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत प्रिन्स हॅरीही उपस्थित होता. मेगन गर्भवती असतांना तिच्यावर अन्याय झाला असा सूर या राजकुमारानं आळवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या सर्वामुळे चर्चांचं मोठं वादळ निर्माण झालं असलं तरी ओपरा विन्फ्रेसच्या शो चा टीआरपी मात्र भलताच वाढला आहे.
२० मार्चला अशीच आणखी एक मुलाखत ओपरा तिच्या शो मध्ये घेणार आहे. ही मुलाखत आहे आपल्या देसी गर्लची…अर्थात प्रियंका चोप्रा जोनासची.(Priyanka Chopra) या मुलाखतीमध्ये ओपरानं प्रियंकाला निकबद्दलही अनेक प्रश्न विचारले आहेत. प्रियंका तिचे बॉलिवूडमधले अनुभवही या मुलाखतीमध्ये शेअर करणार आहे. पण त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेगन मार्कल आणि प्रियंका या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. मेगनच्या शाही लग्नात प्रियंकाची विशेष उपस्थिती होती. त्यामुळे आता प्रियंका नेमंकं कोणाबद्दल काय काय बोलली आहे, याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
ओपरा विन्फ्रे (Oprah Winfrey) ही अमेरिकेची प्रसिद्ध मुलाखतकार. ओपराचं आयुष्य म्हणजे एक धगधगता प्रवास आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्यावर झालेल्या अन्यायाला समर्थपणे तोंड देऊन ओपरा आता किर्तीच्या शिखरावर आहे. जगभरातील काही मोजक्या मुलाखतकारांमध्ये ओपरा विन्फ्रे हे नाव प्रमुख आहे. ओपरानं आपली मुलाखत घ्यावी म्हणून अनेक जण करोडोची माया तिला द्यायला तयार असतात. याच ओपरानं आता तिच्या ओपरा विन्फ्रेस् टॉक शो सुपर सोल या शोमध्ये मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरी यांची मुलाखत घेतली. या शाही दाम्पत्याला आर्ची नावाचा मुलगा आहे. आणि लवकरच त्यांना दुसरं बाळ होणार आहे.
मेगन मार्केल (Meghan, Duchess of Sussex) आणि प्रिन्स हॅरी (Prince Harry, Duke of Sussex) यांचं लग्न झालं तेव्हाही असंच वादळ निर्माण झालं होतं. मेगन ही मुळ अमेरिकन. प्रिन्स हॅरी आणि तिची भेट होण्यापूर्वी ती हॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. त्यातच तिचा घटस्फोट झालेला. मेगनची अशी सर्व पार्श्वभूमी असतांना प्रिन्स हॅरी तिच्या प्रेमात पडला. रुढीवादी आणि परंपरांचे काटेकोर पालन करणा-या राजघराण्यात त्यामुळे वादळ आले. मात्र महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या नातवाच्या प्रेमाला आणि त्याच्या लग्नाला मान्यता दिली. एवढेच नव्हे तर मोठा नातू प्रिन्स विल्यम आणि केंट मिडलटन यांच्या लग्नावर जेवढा खर्च केला होता त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च हॅरी आणि मेगन यांच्या लग्नावर करण्यात आला. वर्षभरानं या दाम्पत्याला आर्ची नावाचा मुलगा झाला.
हे देखील वाचा: मेगन मार्केल आणि प्रीन्स हॅरी यांच्या लग्नाची आगळी वेगळी कहाणी…
सर्वकाही अलबेल आहे, असं वाटत असतांनाच या दोघांनीही स्वतंत्र रहाण्याचा निर्णय घेतला. यासोबत ड्यूक ऑफ ससेक्स आणि डचेस ऑफ ससेक्स या शाही पदव्याही सोडून दिल्या. राजघराण्यानं म्हणजेच राणी एलिझाबेथनं आपल्या या नातवाच्या निर्णयाचं स्वागत केलं. राजकुमारी डायनाच्या मृत्यूनंतर राजघराण्याच्या परंपरांवर अनेकांनी जाहीरपणे टीका केली होती. त्यातच डायनाच्या मृत्यूचा प्रिन्स हॅरीवर मोठा परिणाम झाला होता. या सर्वांचा विचार करुन राणीनं या राजकुमाराला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्याची परवानगी दिली. आता ही दोघंही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं रहात आहेत. या दोघांनाही लवकरच एक मुलगी होणार आहे.
इथंपर्यंत बातम्या येत असतांना अचानक ओपरा विन्फ्रेनं घेतलेली मुलाखत सर्वांच्या समोर आली. मुळात ओपरा कोणाही सामान्यांची मुलाखत घेत नाही. तिनं घेतलेली प्रत्येक मुलाखत ही गाजतेच, तशी ही सुद्धा गाजली. त्यातच ती हॅरी आणि मेगन मार्कलची होती.आणि या मुलाखतीमध्ये मेगननं राजघराण्यावर रंगभेदाचे आरोप केले. आपल्या पत्नीच्या म्हणण्याला प्रिंन्स हॅरीनंही पाठिंबा दिल्यानं आणखीच गदारोळ उठला. गरोदर असतांना आपल्याला काळं मुल झालं तर? हा प्रश्न राजघराण्याला पडला होता. त्याबाबत घरात चर्चा व्हायची, यामुळे मेगन खूप काळजीत पडली होती आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचारही आले होते. त्यातच लग्नाच्या वेळी केट मिडलटन तिच्यावर काही कारणांनी रागवली होती हेही मेगननं सांगितलं. या सर्वांमुळे ओपरानं आपल्याला हवं ते साधलं पण नंतर मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले.
त्यातला एक प्रश्न की मेगनला राजघराण्याच्या परंपरांची आधी कल्पना नव्हती का? मग तिनं हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी केलं की पैशांसाठी? कारण राजघराण्यापासून वेगळं झाल्यावर या दोघांनाही आता कमी खर्चात रहावे लागत आहे. त्यामुळे आपल्याकडे राजघराण्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा आरोप तर नाही ना? अशी शक्यताही अनेकांनी व्यक्त केली आहे. इंग्लडमध्ये राणीचे चाहते खूप आहेत. प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन यांचे चाहतेही वाढले आहेत. मेगनच्या मुलाखतीनंतर इंग्लडमध्ये तिच्या प्रसिद्धीमध्ये कमालीची घट झाली. राणी आणि विल्यम-केटच्या प्रसिद्धीमध्ये दुप्पटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे मेगन आणि हॅरीनं नेमकं काय साधलं याची चर्चा होत आहे.
ही चर्चा होत असतानांच ओपरानं घेतलेल्या पुढच्या मुलाखतीची बातमी आली. ओपरानं पुढच्या भागासाठी प्रियंका चोप्रा जोनासची मुलाखत घेतली आहे. प्रियंकाला तिनं तिच्या आणि निकच्या प्रेमाबाबत प्रश्न विचारले आहेत. तसंच बाळाबाबतही विचारले आहे. प्रियंकाचा बेधडक स्वभाव सगळ्यांना माहीत आहे. आता ओपरासारखी महिला मुलाखत घेणार म्हटल्यावर त्यात काहीतर सनसनाटी असणार अशी चर्चा चालू झाली आहे. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेगन आणि प्रियंका खास मैत्रणी आहेत. मेगनच्या शाही लग्नातही प्रियंकाची उपस्थिती नजरेत भरण्यासारखी होती. आता या दोघी मैत्रिणींची मुलाखत पाठोपाठ होत असल्यानं प्रियंका मेगनबद्दलही काही बोलणार की बॉलिवडमध्ये तिला आलेल्या अनुभवांबद्दल बोलणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अर्थात त्यासाठी २० मार्चची वाट पहावी लागणार आहे.
हे वाचलंत का: प्रियंका चोप्रा: एका साध्या घरातील मुलगी ते रेड कार्पेटवरील सेलिब्रिटी