
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर प्रेक्षकांची ‘ही’ आवडती मालिका घेणार लवकरच निरोप !
टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी सतत नवनवीन प्रयोग करत असते. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन मालिका झटपट सुरु होतात, तर काही आवडत्या मालिकांना अचानक पूर्णविराम मिळतो. स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडे दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या जुन्या मालिकांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.(Aai Ani Baba Retire Hot Aahet)

ही मालिका म्हणजे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’. ही कौटुंबिक मालिका गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. परंतु आता सोशल मीडियावर मालिकेच्या लवकरच संपुष्टात येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नंतर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ देखील संपणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षक निराश झाले आहेत.

या मालिकेत किल्लेदार कुटुंब दाखवण्यात आलं होतं. घरचे प्रमुख यशवंत किल्लेदार हे निवृत्त झालेलं पात्र, तर त्यांची पत्नी शुभा ही घराची खरी ताकद दाखवण्यात आली होती. निवृत्तीनंतर शांत, निवांत जीवन जगण्याचं यशवंत यांचं स्वप्न असतं, मात्र परिस्थिती अशी निर्माण होते की त्यांना पुन्हा कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतावं लागतं. शुभा प्रत्येक वेळी संकटांना खंबीरपणे सामोरी जाते आणि पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. घरातील सदस्यांमधील मतभेद, जबाबदाऱ्या, नातेसंबंधातील गुंतागुंत यामधूनही ती घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसते.
================================
================================
मालिकेतील सीमा या पात्राला स्वतंत्र घर हवं असतं, परंतु शुभा प्रत्येक वेळी नकार देते आणि घरातील नात्यांची वीण जपते. या सर्व प्रसंगांमुळे मालिकेत प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा आरसा दिसतो. हीच या मालिकेची खरी ताकद ठरली होती.‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका २ डिसेंबर २०२४ पासून दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दुपारच्या वेळेत असूनही मालिकेने एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचला होता. परंतु आता या मालिकेला पूर्णविराम मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या तरी स्टार प्रवाहने मालिकेच्या शेवटच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र ही मालिका संपणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार, त्यांच्या व्यक्तिरेखा आणि किल्लेदार कुटुंबाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम कोरल्या जाणार आहेत.