अक्षयचा धुमधडाका
खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार दरवर्षी नवा विक्रम करत असतो. यावर्षी संपूर्ण बॉलिवूडला कोरोनाचा फटका बसला असतांना अक्षय कुमार मात्र यशाच्या नव्या शिखरावर पोहचलेला आहे.
वयाची पन्नाशी ओलंडलेल्या अक्षयकडे सध्या बिगबजेट असे सात चित्रपट आहेत. सूर्यवंशी पासून ते पृथ्वीराज अशा अनेक चित्रपटांमध्ये अक्षय सध्या व्यस्त आहे. नुकतेच त्याने स्कॉटलैंडमध्ये त्याच्या बहुचर्चित बेलबॉटम चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं. कोरोनानंतर आलेल्या लॉकडाऊनच्या काळात चित्रपट सृष्टीवर मरगळ आली. मात्र नंतर शुटींगसाठी परवानगी देण्यात आली. याचा फायदा घेऊन अक्षय बेलबॉटमची सर्व टीम घेऊन ऑगस्ट महिन्यात इंग्लडला रवाना झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बेलबॉटमचं सर्व चित्रिकरण पूर्ण करुन ही टीम नुकतीच परत आली. कोरोनाकाळात शुटींग पूर्ण झालेला बेलबॉटम हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
9 सप्टेंबर रोजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमारनं त्याच्या बेलबॉटम या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला लूक जाहीर केला होता. 1980 मधील एका रॉ एजंटच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शक रंजीत एम तिवारी आहेत. वासू भगनानी, जैकी भगनाना, निखिल आडवाणी, मधू भोजवानी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. असीम अरोरा आणि परवेज शेख हे कथालेखक आहेत.
हा चित्रपट जानेवारीमध्ये रिलीज होणार होता. पण आता 2एप्रिल ही त्याची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना काळात जगभर सर्वच व्यवहार बंद झाले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात परदेशात शुटींगसाठी परवानगी देण्यात आली. त्याचा फायदा घेऊन या चित्रपटाचे संपूर्ण शुटींग स्कॉटलॅड येथे करण्यात आले. दोन महिने कोरोना काळात परदेशात शुटींग होणारा बेलबॉटम हा एकमेव चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरैशी या अभिनेत्रीही झळकणार आहेत.
बेलबॉटम ही एका रॉ च्या गुप्तहेरावर आधारीत कथा आहे. याच नावाचा चित्रपट कन्नड भाषेतही झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला अक्षय, कन्नड चित्रपटाचा रिमेक करतोय, अशी चर्चा होती. मात्र स्वतः अक्षय कुमार यांनी या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शक रवी वर्मा यांनाही तशी कल्पना अक्षयनं दिली आहे. या दोन्ही चित्रपटात फक्त नाम साधर्म्य आहे. आणि दोन्हीही चित्रपट गुप्तहेरांच्या जीवनावर आधीरीत असल्याचे अक्षयनं म्हणटलं आहे. अक्षयनं आपल्या सोशल अकाऊंटवरुन नुकतेच या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. दोन महिने आपला 120 जणांचा क्रू व्यवस्थित काळजी घेत होता. त्यामुळे कोरोनापासून सर्वांचा बचाव झाला असल्याचेही त्याने म्हटले आहे.
बेलबॉटम व्यतिरिक्त अक्षय सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम, पृथ्वीराज, बच्चन पांडे, अतरंगी रे, रक्षाबंधन या चित्रपटांमध्येही व्यस्त आहे. हे सर्व चित्रपट बिग बजेट असल्यानं पुढच्या वर्षीही बॉलिवूडवर अक्षय कुमारचाच वरचष्मा असल्याचं बोलल जातंय. कोरोना काळात अक्षयच्या चित्रपटाला फटका बसला तो म्हणजे सूर्यवंशी…मार्च महिन्यात सूर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्याला लाखो लाईक मिळाले. पण हा चित्रपट मात्र कोरोनामुळे लटकला. 24 मार्च रोजी रोहीत शेट्टी यांचा हा दे मार चित्रपट प्रदर्शित होणार होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यासाठी निर्मात्यांनी नकार दिल्यामुळे वेट आणि वॉच यामध्ये त्याचे प्रदर्शन आहे. दिवाळीमध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येईल अशी आशा त्याचा चाहत्यांना होती. मात्र अद्यापही सिनेमागृह पूर्ण क्षमतेनं सुरु होणार नाहीत. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन डिसेंबरच्या अखेरीस होईल असे चित्र आहे. या अॅक्शन चित्रपटात अक्षयसोबत कटरीना कैफ आहे. अक्षयचा असाच एक सर्वाधिक चर्चेचा चित्रपट म्हणजे लक्ष्मी बॉम्ब…अक्षयचा यातील लूक चर्चेत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यात कियारा अडवाणी त्याची सहकलाकार आहे. डीजनी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.
अक्षयचा आणखी एक बीज बजेट चित्रपट म्हणजे पृथ्वीराज…गेल्यावर्षी अक्षयच्या वाढदिवसाला या चित्रपटाची घोषणा झाली होती. पृथ्वीराज या चित्रपटातून अक्षय पहिल्यांदाच ऐतिहासीक भूमिका साकारत आहे. 150 करोड पेक्षा अधिक बजेट असलेल्या या यशराज बॅनरच्या चित्रपटाचे शुटींग अक्षयनं नुकतच सुरु केलं आहे. त्याचे पोस्टरही रिलीज झालेत. बच्चन पांडे हा आणखी एक अक्षयपट 2021 मध्ये रिलीज होणार आहे. बच्चन पांडे अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. तामिल चित्रपट वीरमचा हा रिमेक आहे. यात चार लहान भाऊ मिळून आपल्या मोठ्या भावाचे लग्न ठरवतात. रोमॅंटिक, कॉमेडी आणि अॅक्शन असा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर करोडोची कमाई करेल असा अंदाज व्यक्त होतोय.
2021 मध्ये अक्षय कुमार आनंद राय यांच्याही चित्रपटात झळकणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सारा अली खान यांच्यासोबत अक्षय अतरंगी रे या चित्रपटात दिसणार आहे. अर्थात या चित्रपटात अक्षय पाहुणा कलाकार म्हणून दिसणार असला तरी त्याची भूमिका लक्षवेधी आहे. मोठ्या पडद्यावर राज करणारा अक्षय कुमार वेबसिरीजच्या माध्यमातूनही त्याच्या चाहत्यापर्यंत पोहचणार आहे. द एंड नावाच्या या वेबसिरीजसाठी अक्षयनं 90 करोड मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. एकूण अक्षय कुमार येत्या वर्षातही आपला ठसा बॉलिवूडवर कायम ठेवणार आहे.